অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदलाचा मातीवर प्रभाव

प्रस्तावना

जमिनीची निर्मिती होत असताना हवामान या घटकांचा फार मोठा सहभाग राहिलेला असतो. म्हणूनच निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशात विविधतापूर्ण जमिनी असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता इत्यादी घटकांचा जमिनीवर सतत प्रभाव पडत असतो. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनीची सुपीकता त्यामुळे वेगवेगळी असते. हवामानातील आकस्मित बदल हेदेखील जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम करतात.
अलीकडच्या काळातील हवामान बदलाच्या आपातकालीन संकटांमुळे पिकाचे आणि शेतीचे नुकसान होत आहे. त्या मध्ये पावसाचे एकूण दिवस कमी होऊन अवर्षणाचे खंड वाढत आहेत. हवामान बदलाच्या परिणामांचा हा सर्वांत गंभीर आणि शेतीसाठी सर्वांत धोकादायक प्रभाव आहे. कोरडावाहू शेतीमध्ये वाढत असलेली पावसाची अनियमितता पिकांसाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनीतील ओलाव्याचे या आवर्षणामुळे घट होऊन नुकसान होते आणि परिणामी पिकांना पाण्याचा आणि उपलब्ध स्वरूपातील अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होत नाही.

गारपीट, पाऊस आणि वारा यामुळे जमिनीची धूप

कमी कालावधीत एकदम जास्त तीव्रतेने होणाऱ्या पावसामुळे मातीची अपधाव होते आणि सुपीक जमीन पाण्यासोबत वाहून जाते. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्र या राज्यांच्या तीनही विभागांतील काही प्रदेशात गारपीट, पाऊस आणि वारा इत्यादी घटकांच्या आकस्मित बदलामुळे या भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या मध्ये मातीचे होणारे नुकसान हे कधीही भरून न निघणारे नुकसान असते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहत्या पाण्याच्या वेगामुळे सतत सुपीक माती वाहून जात असते. अशा अवेळी येणाऱ्या पावसामुळे सध्या जमिनीवर पिके कमी असल्यामुळे कोरडवाहू भागात मातीची धूप जास्त होते. गारपीट आणि पावसामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक मातीचे कण वेगळे होऊन धुपीस बळी पडतात. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळेसुद्धा काही प्रमाणात धूप होते.

जमिनीची सुपीकता अशी खालावते

  • जमिनीची सुपीकता तिच्या पृष्ठभागावरील आच्छादनावर अवलंबून असते.
  • सेंद्रिय कर्ब, आवश्‍यक अन्नद्रव्ये, जिवाणूंचे प्रमाण उपलब्ध ओलावा आणि योग्य सामू इत्यादी बाबींच्या योग्य प्रमाणावर मातीची सुपीकता अवलंबून असते.
  • हवामानाच्या जास्त आणि कमी अशा पावसाच्या दोनही बाबींचा जमीन सुपीकतेवर निरनिराळा प्रभाव असतो.
  • कमी पाऊस आणि आवर्षण यामुळे सेंद्रिय कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. जमिनीतील कर्बाच्या ऱ्हासामुळे सुपीकतेचे मोठे नुकसान होते.
  • सततच्या अवर्षणामुळे जमिनींचा सामू वाढत जातो. परिणामी, अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होत जाते.
  • जास्त तापमान आणि वाढते आवर्षण यामुळे जमिनीत चूनखडी नोडूल्स म्हणजे टणक खड्यांच्या स्वरूपात वाढत जाते. आवर्षण आणि तापमानाचा आणखी गंभीर परिणाम जमिनीतील क्षारांच्या प्रमाणावर होतो. अशा परिस्थितीत क्षारांचे प्रमाण वाढून जमिनी क्षारयुक्त होतात. या जमिनीची सुपीकता आणखीच खालावत जाते.
जमीन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जास्त महत्त्वाच्या ठरतात. पिके आणि पीक पद्धती, उतारास आडवी पेरणी, जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी केलेल्या उपाययोजना, शेतांची बांधबंदिस्ती, आच्छादनाचा वापर, कव्हर क्रॉप्स म्हणजे जमीन झाकून टाकणारी पिके, धुपीस प्रतिबंधक पिके यांसारख्या व्यवस्थापनाचा फायदा होतो.जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी केलेल्या अशा पर्यायाचा वापर केलेला असल्यास नैसर्गिक संकटापासून होणारे नुकसान कमी होईल. एकूणच जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन आणि पुनर्भरण होईल असे उपाय अमलात आणण्याची गरज आहे.आपत्तीच्या काळात होणाऱ्या नुकसानामध्ये सुपीकतेला हानी होणार नाही यासाठी प्रत्येक भागातील स्थानिक परिस्थितीनुसार उपाययोजना करावयास हव्या. प्रत्येक ठिकाणची जमीन ही वेगवेगळ्या समस्यांना बळी पडत असते. काही
जमिनी मुळातच धुपीस संवेदनक्षम असतात. तर काही जमिनींवर निचराच होत नाही; तर काही जमिनी मुळातच पाणथळ असतात. उतारावरील जमिनीस, घाटमाथ्यावरील जमिनी, खोऱ्यामधील सपाट जमिनी, गाळाच्या जमिनी अशा प्रत्येक भूपृष्ठावरील जमिनीसाठी निरनिराळ्या उपाययोजनांची गरज असते. तीव्र शेती पद्धती, सिंचन, खते, मशागत, पीक पद्धती इत्यादींसोबतच नैसर्गिक आपत्तींचा परिणाम मातीच्या समस्यांवर होत असतो. --------मातीचे गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक गरजेनुसार संशोधन शिफारशींच्या स्वरूपात उपलब्ध असलेले सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे----------- त्यानुसार वेळीच त्याची अंमलबजावणी केल्यास बर्‍याच प्रमाणात आपत्तीपासून होणारे नुकसान कमी होईल. आपत्ती नियोजनासाठी फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा वापर, निचरा व्यवस्थापन, पेरणीच्या वेळा, सुधारित सिंचन, गरजेनुसार बांधबंदिस्ती, खतांच्या मात्रातील बदल, बियाण्यांतील बदल, पेरणीच्या अंतरातील बदल इत्यादी आपत्ती व्यवस्थापन शिफारशी स्थानिक गरजेनुसार वापरण्याची गरज आहे.

मातीची सुपीकता जोपासण्यासाठी उपाययोजना

  • स्थानिक गरजेनुसार शिफारशींची अंमलबजावणी.
  • शेताची बांधबंदिस्ती, चर खोदणे इत्यादी उपाययोजना.
  • योग्य पीक पद्धतीची निवड, फेरपालट गरजेची.
  • उतारास आडवी पेरणी.
  • रुंद सरी- वरंबा पद्धतीमुळे जास्तीचे पाणी निचरा सुधारेल आणि ओलाव्याचे संवर्धन होईल.
  • धूप प्रतिबंधक पिकांचा वापर.
  • सुधारित सिंचनाचा वापर.
  • भू-सुधारकांचा गरजेनुसार वापर.
  • आपत्कालीन पीक व्यवस्थापन शिफारशींची अंमलबजावणी.
  • खतांच्या मात्रा, फवारणी, पेरणी इत्यादींबाबत गरजेनुसार करावयाच्या उपाययोजना.

वरील उपलब्ध बाबींचा सुपीकता जोपासण्यासाठी फायदा होईल. मातीचा ऱ्हास होऊन अन्नद्रव्यांची जमिनीतील होणारी तूट भरून काढण्यासाठी या सर्वच व्यवस्थापन घटकांच्या योग्य वापराची गरज आहे.

 

स्त्रोत : अग्रोवन, २२ मार्च २०१४

माहितीदाता : पृथ्वीराज गायकवाड

 


अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate