অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदलाचे नवे संकट

हवामान बदलाचे नवे संकट

हवामान बदलाचे नवे संकट व परिणाम

वाढते प्रदूषण तसेच अन्य कारणांनी हवामान बदलाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या बदलाचे अनेक क्षेत्रांवर होत असलेले दुष्परिणाम समोर येत आहेत. त्यातील कृषीक्षेत्रावरील दुष्परिणाम हा गांभीर्याने विचार करण्याजोगा मुद्दा आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाय योजायला हवेत. त्यादृष्टीने बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या निर्मितीवर भर द्यायला हवा.
वाढत्या प्रदूषणाचे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. त्यातून हवामानातही कमालीचे बदल घडत आहेत आणि ही परिस्थिती शेती, कृषी उद्योग आणि इतर उद्योगधंदे यांच्यासाठी अतिशय बाधक ठरणारी आहे. तसेच ही परिस्थिती कीड-रोग यांच्या उत्पत्तीला अनुकूलसुद्धा आहे. सृष्टीच्या हवामानात वेगवेगळे घटक असतात, त्यातील कमी-जास्तपणा म्हणजेच हवामान बदल होय. परंतु अशा बदलांमागील कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय यावर संशोधन करणे आणि त्यानुसार पावले उचलणे ही सध्याच्या काळाची प्रमुख गरज बनली आहे. खरे तर हवामानबदल ही ताबडतोब घडणारी किंवा परिणाम दाखवणारी बाब नाही. ती सातत्याने बदलणारी गोष्ट आहे. मानवाने स्वत:च्या विकासासाठी नैसर्गिक बाबींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. थोडक्यात निसर्गचक्रात ढवळाढवळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हापासूनच हवामान बदलाच्या संकटाचे बिगुल वाजले, असे म्हणावयास हरकत नाही. त्याचे परिणाम आता कुठे दिसू लागले आहेत. त्यामुळे आता तरी हवामान बदल कशामुळे होतो, त्यावर नियंत्रण कसे मिळवता येईल आणि झालेल्या दुष्परिणामांचा सामना कसा करायचा, यावर गंभीरपणे विचार करावा लागत आहे.

गुंतागुंतीची प्रणाली


पृथ्वीची हवामान प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यात वातावरण, हिम आणि बर्फ, नद्या, सागर तसेच महासागर, इतर जलयंत्रणा तसेच अनेक सजीव यांची परस्परावलंबी आणि महत्त्वाची भूमिका असते. या संपूर्ण हवामान प्रणालीस ऊर्जा पुरवण्याचे काम सूर्य करतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर आली असती तर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती. परंतु सूर्याच्या सरळ येणाऱ्या किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम पृथ्वीवरील वायूंच्या पडद्यामुळे शक्य होते. वाढत्या औद्योगिकरणामुळे या वायूंच्या पडद्यावर  वाईट परिणाम होत आहे आणि त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान हळुहळू वाढत आहे. आता तर 21 वे शतक संपेपर्यंत हवामान बदलामुळे जागतिक तापमान सुमारे चार ते सहा अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे. म्हणूनच की काय हवामान बदलाच्या दुष्परिणामांनी प्रत्यक्ष आपल्या जीवनावर विपरित प्रभाव टाकायला सुरूवात केली आहे. पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे सृष्टीच्या हवामानात कमालीचे बदल घडत आहेत. म्हणूनच हवामान बदलाचे आव्हान मानवजातीपुढील पर्यावरणीय आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे आणि ही समस्या सर्व जगाला भेडसावत आहे. अन्न उत्पादन, नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य अशा सर्वच महत्त्वाच्या बाबींवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यासोबत त्याचे शेतीवर आणि कृषीशी निगडित इतर उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहेत. अगोदरच शेतीच्या उत्पादन वाढीच्या तंत्रात किडी आणि रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचा महत्त्वाचा अडथळा आहे. त्यात या हवामान बदलामुळे तापमान वाढ, अनियमित पाऊस, हवेतील आर्द्रतेचा आणि तापमानाचा अचानक चढ-उतार अशा बाबींची सुरूवात झाली आहे. भविष्यात किडी-रोगांच्या उत्पत्तीमध्ये निश्चित वाढ होण्याची किंवा काही वेळा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हवामान बदल होण्याची कारणे आणि त्याचे शेतीवरील दुष्परिणाम काय आहेत, हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. हवामान बदलाचे संभाव्य दुष्परिणाम समस्त मानवजातीसाठी विशेषत: भारतासारख्या इतर विषुववृत्तीय प्रदेशांतील विकसनशील देशांसाठी घातक ठरू शकतील. हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जनावरांवर होणारे परिणाम

हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून पशुपक्षीसुद्धा सुटले नाहीत. काही भागात 45 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान वाढल्याने गाभण जनावरांचा गर्भपात झाल्याचे दिसून आले आहे. तसेच जनावरांच्या हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छ्‌वासाचा वेग वाढणे, भूक मंदावणे, जनावरांची हालचाल मंदावणे, उन्हाळ्यात हगवणीचे प्रमाण वाढणे, प्रजोत्पादनात 20-25 टक्के घट होणे असे परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. तसेच शेळ्या-मेंढ्यामंध्ये लोकर गळणे आणि कोंबड्यांचा मृत्यूदर वाढणे अशा परिणामांनाही सुरूवात झाली आहे. या बदलामुळे रोग आणि कीड निर्मितीस पोषक ठरेल अशी परिस्थिती निर्माण होते. वनस्पतींच्या पृष्ठभागावरील प्रकाशाची तीव्रता, तापमान, आर्द्रता असे घटक वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकत्रित परिणाम दाखवत नाहीत. उदा. खरिपातील तूर, एरंडी पिकांची वाढ खूप वाढली आणि शेंगा तसेच बोंडे कमी लागली. काही ठिकाणी रब्बी ज्वारीतील पानातील हरितद्रव्य नाहिसे होऊन पाने लाल-पिवळी पडली आणि वाळली. त्यामुळे ज्वारीचा उतारा कमी आला. फळपिकांमध्ये फूलगळ आणि फळगळीचे प्रमाण असाधारणरित्या वाढले. आतापर्यंत बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले गेलेले किरकोळ नुकसान करणाऱ्या वर्गात मोडणारे कीड आणि रोग आता भरपूर प्रमाणात नुकसान करत आहेत. तसेच नियंत्रण करणाऱ्या औषधांनासुद्धा ते दाद देत नाहीत.

अशा परिस्थितीत नेहमीच्या संशोधन पद्धतीत बदल करून हवामानातील बदल आणि पाणी उपलब्धतेनुसार पीक उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासोबत कमी, मध्यम तसेच जास्त कालावधीच्या हवामान अंदाजाची अचुकता आणि व्याप्ती वाढवणे, हवामान बदलासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे, जैवतंत्राचा उपयोग करून हवामान बदलाला सहन करू शकतील असे वाण निर्माण करणे, बदलत्या हवामानाला तोंड देणारे वाण विकसित करणे अशा उपयायोजना करायला हव्यात. तसेच जनावरांच्या गोठ्यात गारवा निर्माण करणाऱ्या उपाययोजना विकसित करणे, उच्च तापमानामध्ये तग धरू शकतील अशा जनावरांच्या जातींची निवड पद्धतीने पैदास करणे हे उपायही महत्त्वाचे ठरतील. त्यासोबत उच्च तापमानामुळे पशुपक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर होणारे विपरित परिणाम तसेच उपाय यावर संशोधन करणे, वातावरणातील बदलामुळे जनावरे आणि पक्षी यांच्यामध्ये दिसून येणारे आजार यावर संशोधन करावे लागणार आहे. तरच या समस्येचा यशस्वीरित्या सामना करता येईल.© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate