অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदलानुसार संशोधन हवे

हवामान बदलानुसार संशोधन हवे

हवामान बदलाचे अनेक चांगले - वाईट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी, व्यापारी यांच्यामध्ये हवामानाच्या आकडेवारीविषयी जागरूकता निर्माण होत आहे. जागतिक हवामान दिन साजरा करताना याबाबत सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.
सतत होणाऱ्या जंगलतोडीमुळे जंगलांखालील एकूण क्षेत्र 20 टक्‍क्‍यांपेक्षा खाली आले आहे. याचा मोठा परिणाम हवामानबदलावर झाला आहे. शहरांमधून प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरांतील नद्यांचेही प्रदूषण वाढत आहे. गरजेनुसार मानवाने नवनवीन शोध लावले आणि जीवनमान सुरक्षित आणि सुखकर कसे होईल याकडे पाहिले; मात्र हवामानबदलाकडे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम हवेची गुणवत्ता, दर्जा घसरण्यात होत आहे.
विविध वायूंचे प्रदूषण ः कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्‍साईड वायू हवेत सोडला जातो. दुसऱ्या बाजूला वाहनांतूनही कार्बन-डाय-ऑक्‍साईड आणि कार्बन मोनोऑक्‍साईड मोठ्या प्रमाणात हवेत मिसळला जातो. विमानाद्वारे क्‍लोरोफ्लुरो कार्बन सोडला जाऊन प्रदूषण काही उंचीपर्यंत सुरू झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 1950च्या दरम्यान हवेत कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण केवळ 280 पी.पी.एम.व्ही. होते, ते 21 व्या शतकाच्या सुरवातीस 370 पी.पी.एम.व्ही. एवढे झाले असून, हे दुष्टचक्र असेच सुरू राहिल्यास आणखी 25 वर्षांत हेच हवेतील कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण 500 पी.पी.एम.व्ही.पर्यंत पोचेल.
तापमानवाढीचा राक्षस - हवेत वाढणारा कार्बन-डाय-ऑक्‍साईड वायू सूर्याच्या प्रकाशापासून मिळणारी उष्णता धरून ठेवतो, त्यामुळे पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे तापमान वाढतेय. तापमानवाढीचा हा राक्षस एखाद्या मोठ्या युद्धापेक्षा भयानक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; तसेच मिथेन वायूचे हवेतील प्रमाण वाढत असून, हा वायू हवेतील ओझोन या उपयुक्त वायूच्या थरास घातक ठरत आहे. याचबरोबर हवेत धुळीचे कणही वाढत आहेत, त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फाचे जाड थर वितळत आहेत. बर्फाचे पाणी होऊन ते नद्यांच्याद्वारे समुद्रात वाहून जात आहे, त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. समुद्रकिनाऱ्यांलगतच्या वस्तींना समुद्रपातळीत होणारी वाढ घातक ठरणार आहे, तसेच समुद्रकिनाऱ्यांलगतच्या जमिनी पाणथळ होऊन रोगराई पसरू शकेल. यावरून हवामानाच्या अभ्यासाचे धोरण ठरवून त्याची उपयुक्तता सामान्य शेतकरी आणि नागरिकांना कशी होईल, यासाठी पुढील काळात अभ्यासाचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत सन 2025 पर्यंतचे हवामान अभ्यासाचे धोरण ठरवणे आवश्‍यक आहे.

करावयाच्या उपाययोजना

  • जंगलांखालील क्षेत्र 33 टक्के वाढविणे आवश्‍यक आहे.
  • सोलर एनर्जीचा वापर वाढवणे आवश्‍यक आहे. उपलब्ध सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करावयास हवा.
  • विंड एनर्जीवर वीजनिर्मिती करण्यावर भर देऊन सध्याचा इंधनवापर कमी करता येईल.
  • प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावयास हवा.
  • शेती क्षेत्रात नवीन जातींवर संशोधन करून, वाढत्या तापमानास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड वाढवावी लागेल.

- डॉ. साबळे ः 9890041929
(लेखक राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

महत्त्व "जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे"

23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा होतो. या विशेष दिवसासाठी चालूवर्षी जागतिक हवामानशास्त्र संघटनेने CLIMATE FOR YOU म्हणजे "तुमच्यासाठी हवामान'हा विषय निवडला आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटना ही संयुक्त राष्ट्र संघाच्या अंतर्गत काम करते. ही संघटना वातावरणाचा सखोल अभ्यास करते. हवामान बदलाचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा या संघटनेच्या अभ्यासाचा विषय आहे. विविध देशांतील पर्यावरणविषयक बदल, जल व्यवस्थापन, हवामान बदलाच्या शेती आणि लोकांवर होणाऱ्या परिणामांच्या माहितीचे एकत्रीकरण करून त्या अनुषंगाने या संस्थेतील तज्ज्ञ संशोधन करतात. विविध देशांना हवामान बदलाच्या संभाव्य धोक्‍यांबाबत या संस्थेद्वारे माहिती पुरविली जाते.

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate