অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदल परिणाम ज्वारीवर

हवामान बदल परिणाम ज्वारीवर

राज्यातील रब्बी ज्वारीची हेक्‍टरी उत्पादकता केवळ सहा क्विंटलचे जवळपास कित्येक वर्षे आहे. त्यामध्ये वाढ करण्यास लागवडीच्या तंत्रज्ञानात सुधारणा, खत व्यवस्थापन, तण नियं त्रणासंदर्भात संशोधन झाले आहे. त्याचे निष्कर्ष प्राप्त होऊनही उत्पादकतेत फारसा फरक न दिसल्याचे प्रमुख कारण हवामानातील बदल हेच असल्याचे दिसून येते.
राज्यामध्ये रब्बी ज्वारीचे पिकाखाली 35 लाख हेक्‍टर क्षेत्र असते. नोव्हेंबर-डिसेंबर महिने आणि जानेवारी महिना रब्बी ज्वारीचे पिकासाठी महत्त्वाचा ठरतो. रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आणि ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते. पेरणीपासून फुलोऱ्यापर्यंतचे आणि काही वेळा काढणीपर्यंतचे हवामान ज्वारीची प्रत आणि उत्पादकता ठरवते. प्रामुख्याने कुटुंबातील माणसांसाठी धान्य आणि जनावरांसाठी चारा असा दुहेरी अन्नपुरवठा करणारे हे पीक असल्याने आपल्या पीक पद्धतीत ज्वारी पिकास महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः परतीचा मॉन्सून सुरू होताच या पिकाची पेरणी प्रामुख्याने कोरडवाहू भागात केली जाते. कोरडवाहू आणि दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी वर्गासाठी हे महत्त्वाचे पीक मानले जाते. राज्यातील रब्बी ज्वारीची हेक्‍टरी उत्पादकता केवळ सहा क्विंटलचे जवळपास कित्येक वर्षे आहे. त्यामध्ये वाढ करण्यास लागवडीचे तंत्रज्ञानात सुधारणा. खत व्यवस्थापन, तण नियंत्रणासंदर्भात संशोधन झाले आहे. त्याचे निष्कर्ष प्राप्त होऊनही उत्पादकतेत फारसा फ रक न दिसल्याचे प्रमुख कारण हवामानातील बदल हेच असल्याचे दिसून येते.

...असे झाले परिणाम

1) पाऊस

परतीचा मॉन्सून व्यवस्थित झाल्यास या पिकाची पेरणी वेळेवर होते. पुढे उगवण आणि वाढ होत असताना हा मॉन्सून पाऊस लांबल्यास आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस झाल्यास या पिकाची वाढ जोमाने होते. या वर्षी सन 2010 - 2011 चे रब्बी हंगामात परतीचा मॉन्सून लांबल्याने ज्वारी पिकाची वाढ उत्तम झाली होती. त्या वेळी पिकांचे उत्पादनाचे अंदाज बांधता या पिकाचे उत्पादन विक्रमी येईल असे सर्वांनाच वाटत होते.

2) थंडी व तापमान

जानेवारी महिन्याचे पहिल्या पंधरवड्यात रब्बी ज्वारीचे पीक फुलोऱ्यात होते. सकाळी सूर्य उगवल्यानंतर पुंकेसरांना सूर्यप्रकाश मिळून पुंकेसर बाहेर पडून स्त्रीबीजांडात फलधारणा होते. त्याच वेळी तापमानात मोठी घट झाली. तापमान महाराष्ट्रातील बऱ्याच भागात चार अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. ज्वारी पिकाचे बेस टेंपरेचर आठ अंश सेल्सिअस आहे, म्हणजेच क्रयशक्ती थांबते. त्याचमुळे फळधारणेत व्यत्यय आला. कणसातील दाणे भरण्यावर त्याचा विपरीत परिणाम जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सलग झाला, त्या मुळे कणसात एकूण दाण्यांचे प्रमाण कमी भरले. काही ठिकाणी कणसे पोचट राहिली. त्यामुळे ज्वारीचा उतारा कमी पडला.
ज्या ठिकाणी एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन यायचे त्याच ठिकाणी ते तीन क्विंटल प्रति एकरापर्यंत कमी आले. केवळ फुलोऱ्यात असता किमान तापमानात झालेली घट ज्वारीचे उत्पादन 50 टक्के घटण्यास कारणीभूत झाली. ज्वारी उत्पादनात या वर्षी उच्चांकी उत्पादकता मिळेल असे वाटत असताना केवळ थंडी आणि तापमानाने उत्पादकतेवर एवढा परिणाम होऊ शकतो हे या वर्षातील उत्तम उदाहरण आहे. आजपर्यंत शेतकरी उताऱ्याबद्दल बोलत असत. उतारा कमी का होतो, त्यास कोणता घटक किती प्रमाणात कारणीभूत आहे हे या उदाहरणावरून लक्षात घेण्यासारखे आहे. याच काळात काही भागांत सकाळी धुके पडल्याने पिकाच्या फ ळधारणेवर परिणाम झाला.

3) सकाळची आर्द्रता आणि धुके

जानेवारी महिन्यात जेथे कणसात दाणे भरले होते, त्या ठिकाणी सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 टक्‍क्‍यांवर आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता 60 टक्‍क्‍यांवर आणि दररोज सकाळी धुके पडणाऱ्या भागात ज्वारीच्या कणसातील दाण्यावर "ब्लॅकमोल्ड' काळी बुरशी वाढण्यात झाला. त्याचा प रिणाम दाण्यांच्या प्रतीवर झाला. एकूणच हवामान घटकांचा परिणाम हा वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारे होतो हेच यावरून दिसून येते.
काळे दाणे पडल्यास अशा ज्वारीची प्रत खराब होऊन बाजारात भार कमी मिळतो. एकूणच ज्वारीसारख्या हुकमी पिकासहित हवामानबदलाशी सध्या सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील या पिकाखाली क्षेत्राचा विचार केल्यास या पिकाचे नुकसान झाल्या अन्नसुरक्षेस धोका असल्याचे चित्र निर्माण होत आहे. नैसर्गिक असंतुलन मानवाचे अस्तित्वासाठी घातक ठर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

4) गारपीट, वारा आणि पाऊस

फेब्रुवारी महिन्यात रब्बी ज्वारी काढणीचे अवस्थेत असताना जेव्हा 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2011 या कालावधीत विदर्भ, मराठवाडा पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र वादळीवारे, गारपीट आणि पाऊस झाला त्याचा परिणाम उभ्या ज्वारी पिकावर झाला. बऱ्याच भागात काढणीस आलेले ज्वारीचे पीक प्रचंड वाऱ्यामुळे कोलमडून पडले. एकदा ताटे मोडल्यानंतर पुन्हा पीक उभे करणे हे निश्‍चितच कठीण असते. अशा नैसर्गिक आपत्तीनंतर पीक वाळते आणि त्याची काढणी अथवा कापणी करणेही जिकिरीचे असते. मजुरांची संख्या अधिक लागते, कडब्याच्या कणसांची आणि दाण्याची प्रत खालावते. अशा वेळी हातातोंडाशी आलेले पीक नैसर्गिक आपत्तीमुळे आपत्तीग्रस्त होते. त्या वेळी कणसे काढून मळणी केल्यास उतारा कमी पडतो.
अशा प्रकारे लागवडीपासून काढणीपर्यंत एक-एक हवामान घटक आणि त्याचे परिणाम अभ्यासणे आता गरजेचे झाले असून, त्यांचे उत्पादन, उत्पादकतेवरील परिणाम तसेच दाण्याचे आणि कडब्याच्या प्रतीवर होणारे परिणाम अभ्यासणे आवश्‍यक आहे. कमीत कमी मोठ्या क्षेत्रावर लागवड होणाऱ्या पिकांसाठी हा अभ्यास गरजेचा वाटतो या पिकाबरोबर इतर पिकांचा अभ्यासही त्याच प्रकारे करावा लागेल. त्यातून अन्नसुरक्षा आणि त्यामधील समस्या पुढे येतील, त्यातूनच उपाययोजनांचा विचार होईल.


डॉ. रामचंद्र साबळे - 9890041929
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले 
कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र
विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

स्त्रोत:अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate