অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामानबदलाचा फटका

हवामानबदलाचा फटका

उत्तराखंडावरील ढगफुटी आणि महापूर

मॉन्सूनचे आगमन आणि मॉन्सूनचा प्रवास याच्या सर्वसाधारण तारखा निश्‍चित आहेत. मुळात मॉन्सून या शब्दाचा वापर ब्रिटिश काळापासून सुरू झाला. ठराविक हंगामात निश्‍चितपणे जमीन म्हणजेच भूपृष्ठ आणि समुद्र यांचे सूर्याच्या उष्णतेने तापणे आणि थंड होणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हवेच्या दाबातील फरकामुळे समुद्राच्या पाण्याची होणारी वाफ भूपृष्टाकडे वाहून आणून त्यातून ढगनिर्मिती होऊन होणारा निश्‍चित हंगामातील पाऊस म्हणजेच मॉन्सून होय. त्यात नेहमीच खंडाचाही भाग असतो. प्रामुख्याने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांच्यापासून नैर्ऋत्य दिशेने हे वारे प्रवेश करतात. मध्य भारतातून ते डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही दिशांना वळून हिमालय पर्वतापर्यंत पोचतात. ते १ जूनच्या सुमारास केरळ, तर १० जूनच्या सुमारास मुंबईपर्यंत प्रवास करतात.

  • सर्वसाधारण तारखांनुसार १ जुलैपर्यंत उत्तराखंडमध्ये पोचणारा मॉन्सून सन २०१३ च्या जून महिन्यात १४ जूनलाच पोचला आणि त्याची गती ही सर्वसाधारण नव्हती. ती केवळ असाधारण अशीच होती. तेथे अतिवृष्टी सुरू झाली आणि चारधाम यात्रेस गेलेले यात्रेकरू ढगफुटी व त्यानंतर महापूर अशा दुष्टचक्रात अडकले.
  • सर्वसाधारण होणाऱ्या पावसाच्या प्रमाणापेक्षा तो पाऊस ३७५ टक्के अधिक होता. समुद्रसपाटीपासून ३८०० मीटर उंचीवर असलेल्या ठिकाणी डोंगराच्या कडा खचू लागल्या. त्या रस्त्यावर कोसळल्याने रस्ते बंद झाले. नद्यांना महापूर आले. मंदाकिनी नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीच्या किनाऱ्याच्या इमारती १६ व १७ जून रोजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या.
  • पाऊस १५ जून ते १७ जून २०१३ या काळात सतत कोसळला. वीजनिर्मितीसाठी बांधलेली धरणे फुटली आणि पाण्याचा लोट वाढला. असंख्य यात्रेकरू दगावले. सैन्याच्या मदतीने १,१०,००० यात्रेकरूंचे प्राण वाचवण्यात यश आले. या सर्व परिस्थितीत गोविंद घाट, केदारनाथ, रुद्रप्रयाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्‍चिम नेपाळ त्याचबरोबर या प्रदेशाच्या जवळचा भाग म्हणजे दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश तसेच तिबेटचा काही भाग या सर्व भागाला आपत्तीचे स्वरूप प्राप्त झाले.
  • डेहराडून येथे सततचे पावसाचे प्रमाण मोजले असता, ते गेल्या ५० वर्षांतील कमी कालावधीतील जास्तीत जास्त पाऊसमानाचे प्रमाण ठरले. केदारनाथ आणि बद्रिनाथ या स्थळांना या आपत्तीचा फार मोठा तडाखा बसला. रस्ते बंद झाल्यामुळे, हायवे नं. ५८ बऱ्याच जागी वाहून गेल्याने रस्ताच उरला नव्हता. जवळपास ७०,००० यात्रेकरी या परिस्थितीत अडकून पडले. केवळ हेलिकॉप्टरच्या साह्याने माणसांची वाहतूक करावी लागली. हे सर्व काम २१ जूनपर्यंत सुरूच ठेवले होते.
  • असंख्य मोटारी, घोडे, माणसे पुरात वाहून गेली. लोकांना शोधण्याचे काम सप्टेंबरपर्यंत सुरूच होते. तेव्हा ५६६ मृतदेह मिळाले. या सर्व परिस्थितीत केदारनाथ मंदिर बचावले. केदारनाथ येथील पर्वतावरील बर्फाचे भाग वितळले आणि तेही खाली कोसळले. सर्वसाधारणपणे मे ४ रोजी हे मंदिर उघडले जाते. तेथे त्यानंतर यात्रेकरी दर्शनास जातात. जवळपास ६०८ गावे की जिथे ७ लाख नागरिक राहतात त्याचे मोठे नुकसान झाले. एवढी मोठी आपत्तीही पर्यावरणात झालेल्या बदलामुळे घडली.

 

गारपीट- महाराष्ट्रातील २०१४ सालातील मोठी आपत्ती

  • महाराष्ट्रात २२ फेब्रुवारी ते १२ मे या काळात २८ जिल्ह्यांत गारपीट झाली. साधारणपणे १३.७० लाख हेक्टर क्षेत्रातील फळपिके, गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फुलपिके, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आणि एकूण २८ जणांचा मृत्यू झाला. त्यांत बीड जिल्ह्यातील पाच आणि नागपूर जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच हिंगोली, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी ३ जण मृत्युमुखी पडले.
  • एकूण १२.७१ लाख हेक्टर क्षेत्र अन्नधान्य पिकाखालील होते, तर ९८,२२२ घरांचे नुकसान झाले. तसेच ७५५९ कोंबड्या आणि १६२१ जनावरे दगावली. जास्तीत जास्त १.४१ लाख हेक्टर क्षेत्र नागपूर जिल्ह्यातील असल्याचे आढळले. त्यात द्राक्ष, संत्रा, केळी आणि टरबूज पिकाचा समावेश आहे. प्रामुख्याने नाशिक, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, जळगाव, नांदेड, नंदुरबार, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, बीड, सातारा, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पिके भुईसपाट झाली आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
  • या सर्व नुकसानामुळे धक्का सहन न झाल्याने ३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील १६ जणांचा समावेश आहे.
  • उत्तरेकडील कर्नाटकाचा भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने आपत्तीजनक झाला. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्याची धान्याची पिके गेली, नगदी पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अरिष्‍ट ओढवले. हवामानबदलाचा फटका आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, ते या प्रकाराने जाणवून दिले.

कोरडवाहू भागातील रब्बी ज्वारीचे नुकसान

कोरडवाहू भागात रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बीड, सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली भागात या पिकाखाली मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. गारपिटीने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारी कोलमडून पडल्याने ज्वारीचे दाणे बारीक राहिले. ताटे मोडून पडली, पाने तुटून ताटे शिल्लक राहिली. पावसाचे पाणी कणसात राहिल्याने दाणे काळे पडले. आणि त्यावर काळी बुरशी वाढली. धान्याचे आणि चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्वारीचे एका पेंडीचे वजन ३ किलोपर्यंत असायचे, ते एक किलोपर्यंतच भरू लागले. तसेच ज्वारीच्या ताटांची पाने तुटली. उरलेली पाने काळी पडल्याने जनावरांना निकृष्ट चारा द्यावा लागणार, अशी स्थिती झाली. कोरडवाहू प्रदेशातील या प्रमुख पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पीक विमा योजनेचा पुनर्विचार करण्याची वेळ

हवामानबदलाने नुकसान झाल्याने पीक विमा योजनाही अपुरी वाटू लागली. पिकाच्या परिपक्वतेच्या काळात हे घडल्याने, तो भाग पीक विमा योजनेत यापुढे समाविष्ट करावा लागेल. द्राक्षपिकाचे नुकसान झाले, द्राक्षमंडपही कोलमडले; परंतु द्राक्षमंडपांचा पीक विमा योजनेत समावेश नाही. अशा प्रकारे पीक विमा योजनेचाही पुनर्विचार करण्याची वेळ आली असून, गारपिटीचा कालावधी अधिक होताच; परंतु त्याशिवाय गारांचा आकारही मोठा होता आणि प्रमाणही फार अधिक होते. एप्रिल महिना संपतानाही काही भागांत अल्पशा प्रमाणात अद्याप गारपीट होत असल्याचे दिसून येत आहे.

स्त्रोत : अग्रोवन
© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate