অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदलाचा उसावर परिणाम

हवामान बदलाचा उसावर परिणाम

महाराष्ट्रातील एकूण 170 साखर कारखान्यांपैकी 23 साखर कारखाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्राच्या एकूण साखर उत्पादनापैकी 40 टक्के साखर या 23 कारखान्यांत तयार होते. या जिल्ह्यांतील हवामान उसातील साखरउताऱ्यास अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे येथील कार्यक्षेत्रास हाय रिकव्हरी झोन असे संबोधले जाते.

शुगरकेन या ब्लॅकबर्न यांनी 1950मध्ये लिहिलेल्या पुस्तकात उसात साखरउतारा कमाल असणारे हवामान विषुववृत्ताच्या उत्तरेस मुंबई आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेस फिजी असे संबोधले आहे. त्यामुळेच त्यापुढे महाराष्ट्रात उसाची कारखानदारी वाढली, त्यातून पुढे हाय, मीडियम आणि लो साखर उतारा झोन निश्‍चित झाले, त्यानुसार कोल्हापूरचे हवामान साखरउताऱ्यासाठी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे. तेथे हिवाळ्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या जवळपास राहते. त्याखालोखाल सांगली, सातारा या जिल्ह्यांचे क्रमांक लागतात, त्यामुळे कोल्हापूरकडून उत्तरेस साखरउतारा कमी होताना दिसतो.

उसाच्या उत्तम वाढीसाठी उष्ण हवामानाची गरज असते, त्यामुळे कमाल तापमान महत्त्वाचे ठरते. जानेवारी ते ऑक्‍टोबर या कालावधीत उसाची काईक वाढ होते. खते, पाणी, तणनियंत्रण व्यवस्थापन उत्तम प्रकारे केल्यास आणि कमाल तापमान आणि उष्ण हवामान लाभल्यास उसाच्या वाढीस अनुकूल वाढ चांगली होते. काही वेळा 22 ते 30 कांड्यांपर्यंत उसाची वाढ दिसून येते. 15 ते 18 कांड्या असलेल्या उसाचे उत्पादन कमी भरते. कांड्यांची लांबी आणि जाडी यावरही हवामान परिणाम करते. पावसात खंड पडला आणि पाटाचे पाणीही देण्यास चुकले, तर कांड्यांच्या लांबीवर आणि जाडीवर परिणाम होतो आणि कांड्या आखूड राहतात. कांड्यांचे सहज निरीक्षण केल्यास कोणते कांडे आखूड अथवा कमी लांब आहे, यावरून पाण्याची पाळी चुकल्याचे दिसून येते.

पाण्याची गरज न भागल्यास कांड्यांची लांबी कमी झाल्याचे लक्षात येते. एकूणच उसाची काईक वाढ ही हवामान आणि व्यवस्थापन यावर अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षात म्हणजे सन 2009-2010 आणि 2010-2011मध्ये ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने उसाची काईक वाढ चालूच राहिली, त्यामुळे अपेक्षेपेक्षा उत्पादनात अधिक वाढ झाली. साखर कारखान्यांचा व्यवस्थापनाचा अंदाज चुकला आणि बराच ऊस क्रशिंगअभावी उरला. काही शेतकऱ्यांना नाइलाजाने ऊस पेटवावा लागला. जळीत म्हणून कारखान्यास तातडीने तो न्यावा लागला. थोडक्‍यात हवामानबदलाने ऋतूचक्रात बदल झाल्याचे जाणवले.

थंडीतही पावसाळी वातावरणाने तापमान अधिक राहिले आणि उसाच्या उत्तम वाढीसाठी ते अनुकूल ठरले; मात्र साखरउतारा वाढण्यास प्रतिकूल ठरले. हवामानबदलाचा फटका फारसा ऊस पिकाला आणि त्याच्या वाढीस बसला नाही. त्यामुळे उसाखालील क्षेत्र वाढत असल्याचे दिसून आले, त्यामुळे यापुढे उसाचे क्षेत्रात वाढ होत जाईल. उसाखालील क्षेत्र सहसा कमी होणार नाही. हवामानबदलाला उत्तम प्रतिसाद देणारे ते पीक आहे असे सध्याच्या परिस्थितीत तरी दिसून आले आहे.

गेली दोन वर्षे उत्तम पाऊस झाल्याने, तसेच 2005-2006 आणि 2007 मध्येही उत्तम पाऊस झाला. सन 2003मध्ये लोकरी माव्याने केलेला उद्रेक आता फारसा पाहण्यास मिळत नाही. सन 2000, 2001-2002 आणि 2003मध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने लोकरी माव्याचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला, मात्र पुढे पाऊसमान वाढल्याने लोकरी माव्याचा प्रादुर्भाव कमी झाला. या समस्येने हैराण झालेल्या शेतकरीवर्गास ऊसपिकाचे काय होणार, साखर कारखानदारी कशी चालणार असे एक ना अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. ते हवामानबदलाने पुढे निकाली निघाले. थोडक्‍यात हवामानबदलाचे हे वेगवेगळे परिणाम ऊस बागायतदार आणि ऊस कारखानदार यांना विचारात घेऊन पाहणे क्रमप्राप्त राहणार आहे.

दुष्काळी वर्षात पाणी व्यवस्थापन आणि लोकरीमाव्याच्या नियंत्रणासाठी सज्ज असणे, तर अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाळा काळात उसाची तोडणी आणि क्रशिंग यासाठी उत्तम व्यवस्थापनावर यापुढे भर द्यावा लागेल. जगातील साखर उत्पादन आणि जगातील साखरेची गरज आयात-निर्यात या बाबींकडे शासन पातळीवरून दिशा देण्याचे आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारी भक्कम बनवण्याचे कार्य जोमाने करावे लागेल. या वर्षी आजपर्यंतचा कोल्हापूर जिल्ह्यातील साखरउतारा 10.5 ते 11.5 टक्के इतका आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या जवळपास राहिले असते तर उसात साखरनिर्मितीचे काम वेगाने झाले असते.


डॉ. रामचंद्र साबळे - 9890041929
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate