गेल्या सप्ताहातील लेख वाचून बऱ्याच वाचकांनी स्पॉट व फ्युचर्स किमतीविषयी कसा अंदाज करावा याबाबत माहिती विचारली होती. त्यानिमित्ताने आजच्या लेखात या दोन किमतीविषयी अधिक सविस्तर विवेचन केले आहे.
स्पॉट किंमत म्हणजे आजची रोख किंमत. या किमतीला आपण आपला माल विकतो व त्याची डिलिव्हरी पण लगेच देतो. मालाची किंमत ठरवणे, त्याची डिलिव्हरी देणे व त्याचे पैसे घेणे या तिन्ही गोष्टी स्पॉट व्यवहारात एकाच वेळी होतात.
फ्युचर्स किंमत म्हणजे भविष्य काळाची किंमत. फ्युचर्स व्यवहारात किंमत आज ठरवली जाते. पण डिलिव्हरी मात्र भविष्यात दिली जाते. उदाहरणार्थ, सोयाबीन 20 एप्रिल 2011 फ्युचर्स किंमत आज रु. 2445 आहे. जर आपण हा फ्युचर्स व्यवहार विक्रीसाठी केला तर आपण या किमतीला आपला मात्र 20 एप्रिल 2011 रोजी देण्याचे मान्य करतो. थोडक्यात, फ्युचर्स व्यवहारात किंमत आज ठरते. पण डिलिव्हरी मात्र भविष्यातील दिवसासाठी असते. (अर्थात, फ्युचर्स मार्केटमध्ये डिलिव्हरी देण्याऐवजी खरेदीचा उलटा व्यवहार करून या करारातून मोकळे होण्याची सवलत असते.)
यामुळे साहजिकच स्पॉट व फ्युचर्स किमतीत एक नाते निर्माण होते. फ्युचर्स किंमत ही स्पॉट किमतीपेक्षा नेहमी जास्त हवी. कारण साठवणुकीचा खर्च, व्याज व मालाचा मध्यं तरीच्या कालावधीत होणारा तोटा या दोन किमतीतील फरकात दिसावयास हवा. उदाहरणार्थ, हा खर्च जर मासिक 30 रुपये धरला तर पुढील महिन्यातील फ्युचर्स किंमत ही आजच्या स्पॉट किमतीपेक्षा 30 रुपयाने जास्त हवी; तसेच दोन महिन्यांनंतरची फ्युचर्स किंमतसुद्धा आजच्या स्पॉट किमतीपेक्षा 60 रुपयाने व पुढील महिन्याच्या फ्युचर्स किमतीपेक्षा 30 रुपयाने जास्त हवी.
अर्थात, फ्युचर्स किंमत फक्त साठवणुकीचा खर्च वगैरे गोष्टीवर अवलंबून नसते. स्पॉट किंमत जशी सध्याच्या मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. जर सध्या पुरवठा फार कमी असेल व मागणी त्या मानाने अधिक असेल तर स्पॉट किंमत वाढते. पण त्याचबरोबर भविष्यात पुरवठा सुधारणार असेल तर फ्युचर्स किंमत कमी झालेली दिसेल. अशा प रिस्थितीत फ्युचर्स किंमत स्पॉट किमतीपेक्षा कमी असेल. या उलट जर सध्या खूप आवक असेल तर स्पॉट किंमत पडलेली असेल, पण जर भविष्यात मागणी बरीच वाढणार असेल, तर फ्युचर्स किंमत त्या मानाने अधिक असेल व या दोन्हींतील फरक साठवणुकीच्या खर्चापेक्षा बराच अधिक असेल.
फ्युचर्स व स्पॉट किमतीतील फरक साठवणुकीच्या खर्चापेक्षा बराच अधिक असेल.
फ्युचर्स व स्पॉट किमतीतील फरकाला स्प्रेड म्हणतात. जर स्प्रेड लहान असेल व तो फक्त साठवणुकीचा खर्च भागवणारा असेल तर त्याचा अर्थ या किमतीतील सध्याचा कल जर इतर गोष्टी (उदाहरणार्थ, "ओपनिंग इंटरेस्ट'चा कल) त्याला पुष्टीकारक असतील तर भविष्यात कायम राहील. हा कल बघून विक्रीचे धोरण ठरवावे. जर स्प्रेड घन व मोठा असेल, म्हणजे स्पॉट किंमत ही फ्युचर्स किमतीपेक्षा फारच कमी असेल तर त्याचा अर्थ सध्या पुरवठा जास्त आहे व त्यामुळे स्पॉट किंमत पडलेली आहे; मात्र भविष्यात किंमत वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी विक्रेत्यांनी शक्य असल्यास स्पॉट किमतीला न विकता फ्युचर्स किमतीवर विकण्याचा करार करून हेजिंग करावे. हा स्प्रेड किती आहे हे आपणास रोज "एनसीडीईएक्स'च्या संकेत स्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या "स्प्रेड गॅप' अहवालावरून कळू शकते.
उदाहरण म्हणून आपण तीन वस्तू घेऊ. त्यासाठी आपण 1 मार्च 2011 रोजीच्या "एनसीडीईएक्स'मधील स्पॉट व फ्युचर्स किमती बघू. सोयाबीन, मिरची व हळद यांच्या किमती व त्यातील स्प्रेड लेखातील तक्त्यात दिला आहे. या किमती आलेख 1 ते 3 मध्ये पण दाखविलेल्या आहेत.
सोयाबीनमधील फरक हा घन आहे; पण त्या मानाने कमी आहे. सोयाबीनच्या किमती अलीकडील काळात पडत आहेत; त्यातील "ओपनिंग इंटरेस्ट'चा कल वाढता आहे. याचा अर्थ किमतीतील कमी होण्याचा कल पुढे काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी थांबून राहण्याची सध्याची परिस्थिती अनुकूल दिसत नाही. मिरचीमधील फरक सुद्धा घन आहे; पण तो बराच मोठा आहे. सध्या आवक जोरात आहे. त्यामुळे स्पॉट किमती घसरत आहेत. "ओपनिंग इंटरेस्ट'चा कल सुद्धा वाढता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस किमती घसरतील; पण नंतर वाढतील. यामुळे फ्युचर्समधून विक्री करणे व हेजिंग करणे हे स्पॉट विक्रीपेक्षा फायदेशीर ठरावे.
गेला सप्ताहात (ता. 22 फेब्रुवारी 2011 ते 1 मार्च 2011) फक्त गूळ, कपाशी व बटाटा यांच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढल्या. इतर किमती एक ते चार टक्क्यांनी घसरल्या. मिरचीतील घसरण चार ते सात टक्के होती.25 फेब्रुवारी 2011 पासून बहुतेक सर्व शेतीमालाच्या "ओपनिंग इंटरेस्ट' वर काही मर्यादा घातलेल्या आहेत. किमती फार वाढू नयेत यासाठी ही पावले उचलली असावीत.
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी - 9420177348
सध्या हळदीचा तुटवडा आहे; त्यामुळे किमती चढत्या आहेत. पण या वर्षी उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे; त्यामुळे पुढील महिन्यात आवक वाढेल व किमती पडतील असे दिसतेय. किमती सध्या स्थिर आहेत. "ओपनिंग इंटरेस्ट' पण स्थिर आहे. याचा अर्थ किमती काही दिवसांनी पडतील असे दिसतेय. पण ज्यांना सध्याच्या फ्युचर्स किमती योग्य वाटत असतील त्यांनी हेजिंग करणे इष्ट ठरेल.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020