माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.
माती कारखान्यांत तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला. खडकांची झीज होऊन माती तयार झाली. लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू होती. साधारण 1 सेंमी. मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष प्राण्यांची विष्टा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. जमिनीतील 10 ते 15 सेंमी. मातीची थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असतो.
शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. जमिनीच्या धुपीमुळे सुपीक माती वाहुन जाते. सुपीक जमिनीबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळू, खडकांचे बारीक तुकडे वाहत येतात व सुपीक भागात पसरतात. यामुळे सुपीक जमीन नापिक होण्याची शक्यता असते. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, धरण, रस्ते, इ. विविध कारणांमुळे सुपीक जमीन जात असल्याने लागवडीलायक क्षेत्रात घट होत आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
वर्षानुवर्ष शेतकरी जमिनीत विविध पिके घेत आला आहे. पुर्वीच्या काळात सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणांत उपलब्ध होते व ते जमिनीत टाकण्याचे प्रमाणसुद्धा जास्त होते. त्यामुळे जमिनीत पोत टिकण्यांस आपोआपच मदत होत असे. देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढू लागली त्या प्रमाणात शेतामधून अधिक उत्पादन वाढविण्याकडे कल वाढत गेला. हरित क्रांतीनंतर अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच संकरीत वाणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत गेला. अधिक उत्पादन देण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध झाल्यामुळे बागायत क्षेत्रात सर्व हंगामात पिके घेण्यात येऊ लागली. पर्यायाने पीक घनता वाढून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. तसेच रासायनिक खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरी कमी किंमतीच्या खतांचा वापर करु लागला. रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे काही मुलद्रव्यांची जमिनीत कमतरता जाणवु लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करुनही उत्पादकता वाढीस मर्यादा आलेल्या आहेत.
शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सेंद्रीय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत पुरवठा, पीक फेरपालटीचा अभाव इत्यादीमुळे जमिनींचे गुणधर्म बदलत असून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. जमिनीची सुपीकता खालावत चाललेली असून तिचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे. सेंद्रीय कर्बाचे जमिनीतील प्रमाण गांभीर्याने घटत चाललेले आहे. हवामान बदलाचा परिणाम म्हणून काही विपरीत बदल देखील जमिनीच्या गुणधर्मात होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी वापरण्यांत येणाऱ्या किंमती निविष्ठांचा प्रभावी वापर होत नसून फक्त खर्चात वाढ होऊन शेतीचा किफायतशीरपणा कमी होत आहे.
जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरत आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.
भविष्यात जमीन आरोग्याचे निदान करण्यासाठी माती परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर अपरीहार्यच होणार असुन या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे गंभीर परीणाम फक्त शेतीवरच न दिसता मानवी शरीर आणि प्राणी इत्यादींना सुद्धा जाणवणार आहेत. ते लक्षात घेऊनच केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राज्यात मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम सन 2015-16 पासून राबविण्यांत येत आहे. या कार्यक्रमात टप्प्याटप्प्याने आगामी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व गावांची निवड करुन सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. मृद आरोग्य पत्रिकेमध्ये जमिनीतील उपलब्ध अन्न द्रव्यांचे प्रमाण समजणार आहे. या बाबतच्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना विविध पिकाना योग्य प्रमाणात संतुलीत खते देण्याकरीता होणार आहे. माती परीक्षणानुसार खताचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास व पिकांचे उत्पादन वाढण्यास व खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात सन 2015 -16 पासुन मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविले जात असून यामध्ये बागायत क्षेत्रातून 2.5 हेक्टरला 1 प्रातीनिधीक मृद नमुना व जिरायत क्षेत्रातुन 10 हेक्टरला 1 प्रातीनिधीक नमुना घेतला जातो व त्या परीघ क्षेत्रामध्ये सामाविष्ट सर्व शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्यात येते. सन 2015-16 मध्ये जिल्ह्यातील 423 गावातुन एकुण 40 हजार 613 मृद नमुने संकलीत करुन व त्याची तपासणी करुन 1 लाख 26 हजार 212 शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका वितरीत केलेल्य आहेत. त्याच प्रमाणे सन 2016-17 या वर्षात जिल्ह्यातील उर्वरीत 1 हजार 78 गावातुन एकुण 81 हजार 226 मृद नमुन संकलीत केले असुन आतापर्यत त्यापैकी 62 हजार 709 मृद नमुन्याची तपासणी पुर्ण झालेली आहे. व त्याच्या 1 लाख 87 हजार 43 मृद आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येत आहे.
सर्व शेतकरी बंधुना विनंती आहे की, आपण आपल्या शेत जमिनीचे नियमीत माती परिक्षण करुन आपल्या जमिनीची सुपिकता जाणुन घ्यावी व त्यानुसारच पिकाना खताची मात्रा द्यावी जेणे करुन जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवुन आपणास आधिक उत्पादन घेत येईल. व जमीनीच्या आरोग्य बरोबरच मानवी आरोग्याचे ही जतन होईल. चला तर मग आपण सारे मिळुन शासनाच्या मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमात सहभागी होवुन साजरा करुया मृदा दिवस !
लेखक - सचिन बऱ्हाटे
जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, जळगाव
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/26/2023
ही तक्रार मुख्यत: लहान मुलांमध्ये, पण कधीकधी मोठया...
या विभागात जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हे कमी ख...
या विभागात गावाचा सुपीकता निर्देशांक कसा काढतात तस...
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमा...