परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यानुसार आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते.
1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा. : फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
2) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.
3)पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत संबंधित जमिनीतून माती नमुना घेऊ नये.
4) निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
5) माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
6) शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.
1) नमुना काढण्यासाठी शेतात गेल्यानंतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. हे विभाग पाडताना जमिनीची रंग, खोली, पोत, उंच-सखलपणा, पाणथळ किंवा टोपण जागा इ., बाबींचा विचार करावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.
2) एका हेक्टरमधून 15 ते 20 ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी (व्ही) आकाराची हंगामी पिकासाठी 25 सें.मी., तर फळपिकासाठी 60 सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.
3) खड्ड्याच्या सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून, ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी.
4) अशा तऱ्हेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत आणि पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत.
5) अशा तऱ्हेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे. मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे नंबर/ गट नंबर व पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून मातीपरीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.
लेखक - रवी सारोदे, दहिवडी, जि. सातारा
संपर्क - 02426- 243209
मृदशास्त्र व कृषी रसायन विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
माहिती संदर्भ :अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...
जमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...