कोणतेही तंत्रज्ञान चाचणी न घेता नापास ठरविणे योग्य नाही. मात्र जेव्हा देशातील जैव विविधता, पर्यावरण, मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा शास्त्रज्ञांसह शासनानेही अधिक दक्ष असायला हवे.
आज अन्नधान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण आहोत. मागील एका दशकामध्ये अन्नधान्य, फळे-भाजीपाल्याचे उत्पादन वाढले आहे. देशाने निर्यातीतही आघाडी घेतली आहे. मात्र शेती क्षेत्र मर्यादित आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. देशाच्या वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे हे मोठे आव्हान शासन आणि शास्त्रज्ञांपुढे उभे आहे. अन्नधान्याच्या उत्पादन वाढीकरिता जीएम वाण आणण्याची केंद्र शासनाला घाई झालेली दिसते. पर्यावरण मंत्री वीरप्पा मोईली आणि आता जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने गहू, भात, मका आणि कापूस या पिकांच्या १० जीएम वाणांच्या शास्त्रशुद्ध प्रक्षेत्र चाचण्यांस मान्यता दिली आहे. इतर वाणांच्या चाचण्यांचा मार्गही लवकरच खुला होण्याचे चित्र दिसत आहे.
कापसात बीटी वाणांच्या आगमनानंतर या पिकातील स्थानिक वाण मागे पडलेत. आज ९० टक्क्यांच्या वर कापसाचे क्षेत्र बीटी वाणांनी व्यापलेले आहे. बीटी वाणांच्या बियाण्याच्या दरावर शासनाचे नियंत्रण असले तरी कृत्रिम तुटवडा आणि त्यातून ब्लॅकमध्ये विक्री करून शेतकऱ्यांची लूट चालू आहे. बीटी वाणांमध्ये रसशोषक किडी आणि लाल्या विकृतीचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे आहे. बीटी कापूस जिरायती शेतीस अनुकूल नाही, हेही मागील दहा-बारा वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे. बहुतांश अन्नधान्य पिके ही देशात जिरायती पद्धतीने घेतली जातात. या पिकांत वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक स्थानिक वाण गुणवत्ता आणि उत्पादकतेतही सातत्यामुळे आपले अस्तित्व टिकवून आहेत. अशा स्थानिक वाणांचे घरचेच बियाणे शेतकरी दर वर्षी वापरतो. अन्नधान्य पिकांत जीएम वाणांच्या आगमनाने स्थानिक वाण आणि शेतकऱ्यांची बियाणे स्वयंपूर्णता हे दोन्ही धोक्यात येऊ शकते.
अन्नधान्य पिके ही थेट खाद्य म्हणून वापरली जातात. त्याच्या मानवी आरोग्यावरील दुष्परिणामांचा सर्वांगाने अभ्यास व्हायला हवा. आपल्या देशात तर जीएम वाणांच्या शास्त्रशुद्ध चाचण्यांबाबत अद्ययावत प्रयोगशाळा आणि तज्ज्ञांचाही अभाव असल्याचे बोलले जाते. तेंव्हा अशा प्रकारच्या चाचण्यांना जगातील अद्ययावत सोईसुविधा शासनाने पुरवाव्यात. २००९ मध्ये बीटी वांग्याच्या व्यावसायिक लागवडीस देशात परवानगी देण्यात आली होती. मात्र तेव्हा बीटी वांगे मानवी आरोग्यास असुरक्षितच, असा देशभरातील जनतेने कौल दिला होता. कोणतेही तंत्रज्ञान चाचणी न घेता नापास ठरविणे योग्य नाही. मात्र जेव्हा देशातील जैव विविधता, पर्यावरण, मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा शास्त्रज्ञासह शासनानेही अधिक दक्ष असायला हवे. जीएम वाणांच्या चाचण्या नियंत्रित वातावरणात आणि विद्यापीठ प्रक्षेत्रावरच व्हायला हव्यात, असे काही तज्ज्ञ सुचवितात. त्याचा आदर व्हायला हवा. जीएम पिकांच्या चाचण्यांबाबत पर्यावरणवादी, विविध तज्ज्ञ समित्या यांच्या आक्षेपांचीही दखल घ्यायला हवी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता जीएम वाणांचा कसून तपास होऊन सत्य बाहेर यायला हवे. यातच सर्वांचे हित आहे.
स्त्रोत: अग्रोवन- संपादकीय
अंतिम सुधारित : 10/7/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...