"जनुकीय सुधारित तंत्रज्ञान हे निसर्गाच्या विरोधात आहे', "अनेक पर्याय असताना केवळ याचा वापर का?', "चाचण्या घ्याव्यात; पण अगोदर 10 वर्षे प्रयोगशाळांत घ्याव्यात', "बीटी कापसाने मला आर्थिक दृष्ट्या उभे केले', "तंत्रज्ञानाला विरोध करणे चुकीचे', अशा मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया राज्यातील शेतकरी, सेंद्रिय अभ्यास, पर्यावरणवादी, शेतकरी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारकडे जनुकीय चाचण्या रद्द करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या मागणीनंतर राज्यासह देशात सर्व बाजूंन प्रतिक्रिया उमटल्या.
निसर्गाच्या विरोधात... ""आम्ही सेंद्रिय शेतीच्या बाजूने असल्याने "जीएम'ला आमचा विरोधच आहे. जीएममुळे पुढील काही पिढ्यांवर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. निसर्गाच्या विरोधात काही केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतातच. यामुळे जीएमला आमचा विरोधच आहे.''वसुधा सरदार, सेंद्रिय शेती अभ्यासक
""जीएमचे दीर्घकालीन परिणाम होतात. यामुळे याला आमचा विरोध आहे. शेतमालाची उत्पादकता वाढीसाठी अनेक पर्याय असताना, त्याचा अवलंब करण्याची गरज आहे.''
दिलीप बारडकर""जनुकीयदृष्ट्या सुधारित वाणांच्या चाचण्या कमीत कमी 10 वर्षे प्रयोगशाळांमध्ये घ्याव्यात. नंतर त्या प्रत्यक्ष शेतावर घेण्याची मागणी आहे. आताच थेट शेतात घेतल्या तर जीएम पिकांचे परागीभवन इतर पिकांबरोबरच जैवविविधतेवर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. आमचा जीएम पिकांच्या थेट शेतावर होणाऱ्या चाचण्यांना विरोध आहे, प्रयोगशाळेतील चाचण्यांना नव्हे. दुसरीकडे जीएम कापसाच्या वाणांतदेखील बोंड अळींची प्रतिकारक्षमता वाढली आहे. त्यामुळे जीएम कापसाच्या नवनवीन जाती निर्माण होत आहेत.''
दिनेश कुलकर्णी, अखिल भारतीय संघटन मंत्री, भारतीय किसान संघ.
देशमुख, सेंद्रिय शेती अभ्यासक
शेतकऱ्यांच्या हितासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यकच आहे आणि म्हणूनच जीएम पिकांच्या चाचण्या थांबवणे योग्य होणार नाही. जीएम पिकांच्या चाचण्यांना स्थगिती द्यायची की नाही याबाबतचा निर्णय पूर्णतः धोरणात्मक व पूर्ण विचार करून सरकारने द्यायचा असतो. त्यासंबंधीचा निर्णय ही कोणी व्यक्ती सहजपणे घेईल, असे मला वाटत नाही. जीएम पिकांविषयी आपले प्राधान्य कोणत्या पिकांना हवे ते आपण निश्चित केले पाहिजे. केवळ खासगी कंपन्यांना रस आहे म्हणून एखाद्या पिकाला प्राधान्य देणे उचित ठरणार नाही. हवामान बदलाच्या काळात हवामानाला सुसंगत ठरतील, अशा जीएम वाणांना प्राधान्य द्यायला हवे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने याबाबतच्या संशोधनाला गती द्यायला हवी.
अतुल देऊळगावकर,
पर्यावरण अभ्यासक.
कृषी क्षेत्रात जेव्हा नवीन तंत्रज्ञान आले तेव्हा पासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली. 2002-03 मध्ये बीटी तंत्रज्ञान आले अन् आम्हा शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या बराच बदल झाला. उत्पन्नात भरीव वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. जीएम विरोध कशासाठी होतो हे आम्हा सामान्य शेतकऱ्यांना समजत नाही. जे कोणी विरोध करत असतील, त्यांनी प्रथम कापसाची शेती करावी. बीटीमुळे खरच काही नुकसान होते का, हे पाहावे. मी 2002-03 पासून बीटी कापसाची शेती करत आहे. तसा मी पारंपरिक कापसाचा शेतकरी, त्या अगोदर पूर्वापार कापसाची शेती करीत आलो. बीटी कापसाच्या लागवडीमुळे ना माझ्या शेताचा पोत बिघडला, ना आम्हाला किंवा आमच्या जनावरांना आरोग्याच्या दृष्टीने काही दुष्परिणाम झाला. बीटी तंत्रज्ञान येण्याअगोदर बोंड अळींसाठी फवारणी करायचो. त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जाणवायचा नाही. ती औषधे वापरणे बंद केले. त्यामुळे रसशोषक किडींचा थोडाफार प्रादुर्भाव जाणवतो. प्रथमपासून नियोजनबद्ध फवारणी केल्यास त्रास कमी होतो.
बीटी कपाशीमुळे जमिनीचा पोत बिघडतो हासुद्धा हास्यास्पद आरोप आहे. तंत्रज्ञान येण्याअगोदर एकरी 3-4 क्विंटल उत्पादन मिळायचे. आता उत्पादन तिप्पट-चौपट वाढले आहे. उत्पादन कमी असल्यामुळे जमिनी पोत राखून असायच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे पिके जास्त अन्नद्रव्ये घेतात. त्यासाठी जमिनीला परतफेड करावी लागणार ही समजण्यासारखी गोष्ट आहे. आम्हा शेतकऱ्यांचे हेच दुर्दैव आहे, की आम्हाला चार पैसे जास्तीचे मिळतात हेच उच्चभ्रू लोकांना सहन होत नाही.
गणेश श्यामराव नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी.
निंभारा, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला.
9579154004
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जैवतंत्रज्ञान नियंत्रण कायदा अर्थात ‘बायोटेक्नॉलॉज...
जगातील इतर देशांनी जीएम तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिक...
कुठलीही व्यक्ती असो, ती व्यक्ती वस्तूंची मागणी करत...
शेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्व आहे. कडधा...