जीएम पिके कृषी पर्यावरण, जैव विविधता, बियाणे सार्वभौमत्व व मानवी आरोग्यासाठी घातक आहेत, हे ३०० देशांतील शास्त्रज्ञांनी, भारतातीलही काही तज्ज्ञांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळविले आहे. तरीही येनकेनप्रकारेण जीएम चाचण्यांना केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात केंद्राच्या दबावाखाली याबाबत जोरदार हालचालीही सुरू झाल्या आहेत.
२००२ मध्ये पहिले जीएम पीक बीटी कापसाला सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाला बळी पडून परवानगी दिली. आता २०१३ मध्ये महाराष्ट्र कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीररीत्या कबूल दिली, की बीटी कापसाचा अनुभव चांगला नाही, फक्त बागायती शेतीसाठी ते उपयुक्त असून, बहुसंख्य जिरायती शेतकऱ्यांना बीटी कापसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कापूस तर अखाद्य पीक (जनावरांसाठी सरकी पेंड वगळता) आहे, परंतु बीटी वांगे पहिले जीएम खाद्य पीक होते. त्याच्या परवानगीसाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला; परंतु जीएम पिकाबाबत साधक, बाधक- दोन्ही बाजू समजावून घेण्यासाठी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी भारतभर जनसुनावणी घेऊन जीएम पिके जोवर संपूर्णपणे सर्वांसाठी सुरक्षित़ असल्याचे सिद्ध होत नाही तोवर परवानगी नाकारली. त्यामुळे भारतभर असणाऱ्या वांग्यांच्या ३९५१ विविध वाणांचे अस्तित्वही धोक्यात येणार होते. कालांतराने त्यांचे खाते बदलून त्यांचा अडसर दूर केला गेला. आता केवळ वांगेच नाही, तर भेंडी, बटाटे, गहू, भातासह ७४ जीएम अन्नपिकांना परवानगी देण्याचे प्रयत्न चालू आहेत.
जीएम तंत्रज्ञान संपूर्णतः अनैसर्गिक, आरोग्यास बाधक व पर्यावरणावर अनपेक्षित व धोकादायक परिणाम करणारे असल्याने जगातील १८० देशांनी जीएम अन्न नाकारले आहे. बीटी कापसाचे घातक जिवाणू आता पशूंच्या शरीरात सरकीपेंडीच्या रूपात व मानवाच्या शरीरात सरकी तेलाच्या रूपात शिरले आहेत.
येनकेनप्रकारेण जीएम पिकांना परवानगी देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने जीएम प्रयोग घेण्याचे ठरवले आहे. राज्य घटनेनुसार कृषी हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने बिहार व केरळ राज्याने विरोध केला; परंतु महाराष्ट्र शासनाने मात्र केंद्राच्या दबावाखाली जीएम पिकांचे शेतावर प्रयोग घेण्याचा निर्णय घेऊन ९ मार्च २०१२ रोजी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. परंतु नंतर जीएमचे तांत्रिक स्वरूप व कामाची व्यापकता लक्षात घेऊन ही समिती रद्द केली. डॉ. अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर २०१२ रोजी नवीन समिती स्थापन केली. या समितीमध्ये डॉ. सी. डी. मायी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. एस. व्ही. सरोदे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. जी. बी. खंडागळे, डॉ. अशोक जाधव, डॉ. एस. एस. अडसूळ, डॉ. उमाकांत दांगट, आयुक्त कृषी, चार कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर येथील शास्त्रज्ञांचा समावेश आहे. राज्य शासनाने ही समिती जीएम पिकाच्या क्षेत्रीय चाचण्या शेतावर घेण्यासाठी, ना हरकत प्रमाणपत्र देण्याविषयी शासनास सल्ला देण्यासाठी स्थापन केली आहे. या समितीच्या एकूण चार बैठका ३ जानेवारी, ११ मार्च, ८ मे व १९ जुलै २०१३ रोजी घेण्यात आल्या.
भात, गहू, मका, वांगे व कापूस पिकावर जीएम तंत्रज्ञानाचे प्रयोग शेतावर घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांसह केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर), नागपूर या संस्थांनी अर्ज केले आहेत.
दिलीपराव देशमुख बारडकर - ९८८१४९७०९२
(लेखक मॉफचे उपाध्यक्ष आहेत.)
अंतिम सुधारित : 7/11/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...