स्वस्तात शेडनेट हाऊस
नव्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. शेती व्यवसायातही ती होणे क्रमप्राप्त आहे. नव्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती मोठय़ा फायद्याची नक्कीच होऊ शकते. ते नवे तंत्र म्हणजे पॉलीहाऊस, शेडनेटहाऊस सौरऊर्जा वगैरेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रथम ते तंत्र शिकावे लागते. सध्या तरी ते शिकण्याची योग्य सोय नाही. नंतर कर्ज उभारणी करावी लागते. कर्ज माफीच्या सरकारी विचित्र धोरणांमुळे सध्या कुठेही शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. हे सर्व जमले नाही तर सर्वस्व पणाला लागण्याची शक्यता असते. असे असले तरी नव्या तंत्रामधील काही उपतंत्रे सर्वानाच वापरणे शक्य असून त्यामुळे आपल्या पारंपरिक शेती व्यवसायात अमुलाग्र बदल होऊ शकतो. शेतकऱ्यांचे मुख्य शत्रू म्हणजे तण व रोगराई. त्यांचे उच्चाटण केल्यास उत्पादन खर्चात प्रचंड बचत होऊ शकते. म्हणजेच फायद्यात तेवढीच वाढ होते. म्हणूनच नव्या तंत्रांमधील आपल्या सोयीची व सोपी तंत्रे आत्मसात करून वापरणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
अलीकडे खूप शेतकरी मल्चिंग पेपरचा उपयोग करतात. त्याचे अनेक फायदे आहेत. मल्चिंग पेपरमुळे पिकामध्ये अजिबात तण वाढत नाहीत. त्यामुळे खुरपणीचा प्रचंड खर्च पूर्णत: वाचतो. मजुरांची टंचाई व मजुरीचे वाढलेले दर यामुळे खुरपणीचा खर्च अवास्तव वाढला असून तणांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. एक एकरातील मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांच्या चार खुरपण्या कराव्याच लागतात. प्रत्येक खुरपणी सरासरी दोनच हजार रुपयांत झाली तर एकरी ८ हजार रुपये खर्च कमीत कमी येतोच. मल्चिंग पेपरसाठी एकरी ३ बंडल लागतात. त्यासाठी बाजारात ४ फूट रुंदीचा मल्चिंग पेपर उपलब्ध आहे. त्याचे दोन फूट रुंदीचे दोन भाग करून वापरल्यास मल्चिंग पेपर निम्माच लागतो. १२०० फुटाचा प्रत्येक बंडल २ हजार रुपयांना बाजारात मिळतो. म्हणजेच एकरी सहा हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच खुरपणीपेक्षा येथेच २ हजार रुपये वाचतात.
याखेरीज अनेक फायदे मल्चिंग पेपरपासून मिळतात. दिवसभर मातीमध्ये लपून रात्री पिकांवर हल्ला करणारे काही उपद्रवी जिवाणू दिवसा मल्चिंग पेपरवर पडलेल्या उन्हामुळे आतील बेडमध्ये दमट हवेत गुदमरून नष्ट होतात. तसेच मल्चिंग पेपरच्या वरच्या भागावर असलेल्या विशिष्ट चमकदार रंगामुळे प्रकाश परावर्तीत होऊन उपद्रवी जीवाणूंना प्रतिबंध होतो.
पूर्वी साध्या सपाट वाफ्यात भाजीपाल्याची रोपे केली जात. त्यानंतर गादी वाफ्यांवर रोपे तयार करणे फायदेशीर ठरल्याने गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यास सुरुवात झाली. अलीकडे प्लॅस्टिकच्या ट्रेमधून कोकोपीट वापरून तयार केलेली रोपे अधिकच फायद्याची असल्याची सिद्ध झाले आहे. गादी वाफ्यातून उपटून लावलेल्या रोपांच्या सर्व मुळ्या मोकळ्या होतात व सुक्ष्म सफेद मुळ्या जमिनीतच राहतात. त्यामुळे लागवडीनंतर पुन्हा पांढऱ्या मुळ्या येऊन रोपे जीवण्यासाठी १० ते १५ दिवसांचा वेळ वाया जातो. या काळात रोपे कोमेजुन त्यांची वाढ थांबते. तसेच या प्रक्रियेत काही रोपे तरी हमखास दगावतात. ट्रेमधील रोपांच्या बाबतीत असे घडत नाही. ट्रेममधील पेल्यातून सर्व मुळांसह अलगद रोप निघून येते. व लागवडीनंतर अजिबात न कोमेजता दुसऱ्याच दिवसापासून रोपांची नव्या ठिकाणी जोमदार वाढ सुरू होते. त्यामुळे रोपे दगावण्याची शक्यता अजिबात राहत नाही.
संकरीत भाजीपाल्याचे बियाणे खूपच महाग असल्याने त्याची प्रत्येक बी उगवणे अत्यावश्यक असते. ट्रेमध्ये ९५ टक्के उगवण करणे शक्य असून गादीवाफ्यावरील रोपांची उगवण जास्तीत जास्त ७५ टक्केपर्यंतच होऊ शकते. गादीवाफ्यावरील रोपांपेक्षा २५ टक्के कमी दिवसात ट्रेमधील रोपे लागवडीस योग्य तयार होतात. म्हणजेच ट्रेमधील रोपे वापरल्यास पीक कमीत कमी २१ दिवस आधी काढणीस येते हा फायदा सर्वात मोठा असून त्यामुळे उत्पादन खर्चही मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.
एक एकरामध्ये भाजीपाला लागवडीसाठी सुमारे १० ते १५ हजार रोपांची गरज असते. तितक्या रोपांसाठी सुमारे २०० ट्रे आवश्यक असतात. ट्रे चांगले घेतल्यास १२ रुपयास १ मिळतो व वापरा आणि फेकाचे ६ रुपयांस १ मिळतो. चांगले ट्रे घेतल्यास व त्यांची योग्य काळजी घेतल्यास त्यांचा ८ ते १० वेळा पुनर्वापर होऊ शकतो. २०० ट्रे भरण्यासाठी ४० किलो कोकोपीट व २० किलो गांडुळखताची आवश्यकता असते. या मिश्रणात ट्रायकोडर्माचा आवश्य वापर करावा. हे ट्रे ठेवण्यासाठी ७ मीटर लांब व ८ मीटर रुंद बांबूचा मांडव तयार करावा लागतो. त्यास वरून व चहुबाजूंनी शेडनेट लावण्यासाठी जास्तीत जास्त सुमारे ५ हजार खर्च होऊ शकतो. घरचे बांबू व वासे असल्यास हा खर्च खूपच कमी होऊ शकतो. ट्रे मांडलेल्या दोन वाफ्यांमध्ये ६ मायक्रो स्प्रिंकलर १६ एम.एम. लेट्रलला जोडून रोपांना तुषारसिंचनद्वारे हवा तसा पाणीपुरवठा करता येतो.
संकरीत भाजीपाल्याची ट्रेमधील रोपे १ ते २ रुपयास एक या प्रमाणे जातीनुसार बाजारात मिळतात. म्हणजे एक दोन वेळा रोपे तयार केल्यानंतर मांडव व ट्रे वगैरे सर्व खर्च वसूल होतो. त्यानंतर अनेक वर्षे या साहित्याचा उपयोग होतो. म्हणजेच ही पद्धत अतिशय फायद्याची व सोयीची आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या आवश्यकतेनुसार लहान मोठे खास रोपगृह उभारले पाहिजे. रोपगृहास चारही बाजूंनी अल्ट्रा व्हायलेट फिल्म लावून चांगले बंद केल्यास आणखीही खूप फायदा होऊ शकतो. पॉलीहाऊसचे परिणाम मिळू शकतात. अशा रोपगृहांसाठी सरकारी अनुदान मिळाल्यास सामान्य शेतकरीही रोपगृहे उभारू शकतील. कमीत कमी खर्चात व वेळेत जोमदार रोपांच्या निर्मितीसाठी हे तंत्र अतिशय फायद्याचे आहे.
मिरची, टोमॅटो वगैरे पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर केल्यास प्लॅस्टिक ट्रेमधील रोपे वापरणे अत्यावश्यक आहे. कारण वाफ्यातून उपटून लावलेली रोपे मल्चिंग पेपरवर आडवी पडतात व दिवसा उन्हाने पेपर तापल्याने ती तापून वाळून जातात. म्हणूनच उपटलेली रोपे लावताना मल्चिंग पेपरचा वापर मुळीच करू नये. ट्रेमधील रोपे मात्र मल्चिंग पेपर वापरून किंवा न वापरताही लावणे फायद्याचे आहे.
आंब्याची कलमे ३ मीटर बाय ३ मीटर लाऊन झाडांची संख्या वाढविणे व पर्यायाने जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयोग कृषी उद्योगपती भंवरलाल जैन यांनी जळगावमध्ये जैनहिलवर मोठय़ा प्रमाणात यशस्वी केला आहे. त्याच तंत्राचा वापर करून मिरची, टोमॅटोची एकरी जास्तीत जास्त रोपे लावून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न गुजराथमधील शेतकऱ्यांनी केला व तोही प्रयोग खूपच यशस्वी झाला आहे. अशा प्रकारच्या यशस्वी तंत्रांचा योग्य प्रकारे वापर प्रत्येक शेतकऱ्याने केल्यास शेती व्यवसाय नक्कीच मोठय़ा फायद्याचा होईल. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे मात्र अत्यावश्यक आहे.
संपर्क :
मो. ९९७०७४६१८८
माणिक विश्वनाथ वाळेकर
ओतूर (ढमाले मळा), ता. जुन्नर, जि. पुणे.
स्त्रोत: लोकसत्ता: सोमवार, ३० मार्च २००९
अंतिम सुधारित : 8/27/2020
कृषी क्षेत्रात नियंत्रित शेतील अनन्यसाधारण महत्व आ...
शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंग...