ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी उसाला पाणी देताना एक आड एक सरीतून द्यावे. पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
पुढील वर्षाच्या गाळपासाठी साखर कारखान्यांना या वर्षीपासूनच उसाचे क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पावसाळा लांबला तर जुलैपर्यंत ऊस पिकास ताण बसतो. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. उन्हाळ्यात तापमान कधी 44 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक जाते. त्याचबरोबर वेगवान व कोरडी हवा यामुळे जमिनीतील आणि पिकाच्या पानांतील पाण्यात झपाट्याने घट होते. बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने मार्च ते जून या काळात संपूर्ण वर्षातील बाष्पीभवनापैकी सुमारे 40 ते 45 टक्के बाष्पीभवन होते.
दिवसाचा कालावधीही जास्त असतो. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो, म्हणजेच रात्रीचे तापमान वाढलेले असते. जमिनीचे तापमान जास्त राहते, त्यामुळे मुळाद्वारे पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. पिकाच्या काही महत्त्वाच्या शरीरक्रिया शास्त्रीय व जीवरासायनिक क्रियांवर परिणाम होऊन बाष्पीभवनाचा वेग वाढतो. पेशीअंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. त्यामुळे या काळात योग्य ते व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते. अशा आपत्कालीन परिस्थितीत काही विशिष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात येणारी संभाव्य घट कमी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
1) पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.
2) मुळाच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळाद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊन प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते.
3) पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कांड्याची लांबी व उसाची जाडी कमी होऊन वजनात घट येते.
4) उसामध्ये तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते.
5) सुरू आणि खोडवा उसात फुटव्याचे प्रमाण कमी होऊन तोडणीच्या वेळी गाळण्यालायक ऊस संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते.
6) पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. उत्पादनात लक्षणीय घट होते. आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कारण या काळात हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो.
1) ठिबक अथवा तुषार सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
2) को-86032, कोएम-0265, को-740, कोव्हीएसआय-9805 या जाती इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी या जातींचीच लागवड करावी.
3) ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी पाणी देताना एक आड एक सरीतून पाणी द्यावे.
4) पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो.
5) पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी (21 दिवसांनी) दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
6) पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी सहा ते आठ टक्के केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
7) ऊस पीक तणविरहित ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन ऊसवाढीसाठी उपयुक्त ठरेल.
8) शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
9) लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी सहा टन पाचटाचे आच्छादन करून प्रतिटन पाचटासाठी आठ किलो युरिया, 10 किलो सुपर फॉस्फेट व एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
10) ऊस लागवड करताना ऊस रोपांचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची कमतरता भासली तरी रोपे तग धरून राहतील.
11) खतांची शिफारशीत मात्रा देऊन 25 टक्के पालाश खत अधिक द्यावे. पालाश वनस्पतीच्या पर्णरंध्रांची उघडझाप करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवले जाते, तसेच मुक्त प्रोलीनचे प्रमाण वाढविण्यास मदत करते, त्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते.
12) लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर दोन महिन्यांनी आणि दुसरी फवारणी तीन महिन्यांनी द्यावी हे फारच महत्त्वाचे आहे.
13) सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते, पीक आवर्षणास तोंड देते.
14) उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत पाण्याची प्रत्येक पाळी दोन-तीन दिवसांनी वाढवत न्यावी. त्यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढत जाते.
15) उसाची लागण करताना बेणे दोन तास चुनखडीच्या पूर्ण विद्राव्य स्वरूपातील द्रावणात बुडवून मगच लावावे.
1) आडसाली -
सध्या आडसाली लागणीचा ऊस जोमदार वाढीच्या (सहा ते सात महिने) अवस्थेमध्ये आहे. अशा उसास पाण्याचा ताण कमी करण्यासाठी एक आड सरीस पाणी द्यावे, वाळलेली उसाची पाने काढून सरीमध्ये आच्छादन करावे.
2) पूर्वहंगामी -
पूर्वहंगामी उसाची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व काही प्रमाणात मराठवाड्यात केली जाते. सद्यःस्थितीत पूर्वहंगामी ऊस हा जोमदार वाढीच्या (दोन ते तीन महिने) अवस्थेमध्ये आहे. या हंगामातील उसासाठी एक आड सरीतून पाणी द्यावे. उसाची खालील पक्व पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पिकास तणविरहित ठेवावे.
3) सुरू हंगाम -
सुरू उसाची लागवड सर्वत्रच सुरू आहे. या उसाला एक आड सरीतून पाणी द्यावे. उसाचे पीक तणविरहित ठेवावे. उसाच्या सरीमध्ये बाष्पीभवन कमी करण्यासाठी उसाचे पाचट उपलब्धतेनुसार आच्छादन म्हणून वापर करावा. ज्या क्षेत्रात उसाची बांधणी झालेली नसल्यास अशा उसाच्या बांधणीच्या वेळेस पालाश खताची मात्रा शिफारशीपेक्षा 25 टक्के जास्त द्यावी. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर 21 दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी. पिकास तणविरहित ठेवावे. ज्या ठिकाणी पट्टा पद्धतीने लागण केलेली आहे अशा ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
4) खोडवा -
राज्यात खोडव्याखाली 35 ते 40 टक्के क्षेत्र आहे. या उसाला एक आड सरीतून पाणी द्यावे. खोडव्यामध्ये पाचट आच्छादन म्हणून वापरावे. खोडव्यास पहारीच्या साह्याने पालाशची मात्रा शिफारशीपेक्षा 25 टक्के जास्त द्यावी. दर 21 दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी. पीक तणविरहित ठेवावे. पट्टा पद्धतीने उसाची लागण केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
संपर्क - 02169- 265336
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव
ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...