ठिबक सिंचनातून खते दिल्याने उसाच्या मुळांजवळ मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. खतांचा पीक वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो. खते देण्याच्या मजुरी खर्चात व ऊर्जेत बचत होते. खतातील क्षारांच्या निचऱ्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येतो. जमिनीची सुपीकता कायम राखून पीक उत्पादन क्षमता वाढवता येते.
ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खतेच वापरता येतात. बाजारपेठेमध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये एकत्रित किंवा वेगवेगळी असणारी खते उपलब्ध आहेत.
नत्रयुक्त खते -
नत्रयुक्त खते ठिबक सिंचनातून दिल्यास मृदा द्रावणात त्याची जलद हालचाल होऊन ती खते तोटीच्या बाजूस मुळांच्या सान्निध्यात ताबडतोब पसरतात. पिकाची मुळे ती त्वरित शोषून घेतात. पिकाच्या आवश्यकतेनुसार ठराविक ओलित क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात, परंतु जास्त वेळा कमी होऊन वापर अधिक कार्यक्षम होतो. अमोनियायुक्त, नायट्रेटयुक्त आणि अमाईडयुक्त अशा चार प्रकारांमध्ये नत्रयुक्त खतांचे वर्गीकरण करता येते.
नत्रयुक्त खते -
युरिया हे खत सर्वांत उत्कृष्ट व पाण्यात विरघळण्याची जास्त क्षमता असलेले खत आहे. युरिया खताची पाण्याशी कोणत्याही प्रकारची संयुगे तयार होत नसल्यामुळे ठिबक सिंचनातून देणे अधिक फायदेशीर आहे.
ऊस पिकासाठी नत्रयुक्त खते दर पंधरा दिवसांनी सहा महिने वयाचे ऊस पीक होईपर्यंत दिल्यास उसाची उगवण चांगली होते, फुटवे भरपूर येतात, पिकाची वाढ जोमदार होते. नत्रयुक्त खताची 30 टक्क्यांपर्यंत बचत करता येते.
स्फुरदयुक्त खते -
स्फुरदयुक्त खते ठिबक सिंचनातून देण्याअगोदर पाण्यातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे प्रमाण तपासावे. पाण्याची कॅल्शिअम व मॅग्नेशिअम बरोबर फॉस्फरसची रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होणारा पांढरा साका ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद करण्यास कारणीभूत ठरतो. उपलब्ध स्फुरदयुक्त खतांपैकी फॉस्फॅरिक आम्लाचा उपयोग ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खत पिकाच्या मुळाजवळ उपलब्ध होऊन त्याचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.
स्फुरदयुक्त खते -
उसासाठी स्फुरदयुक्त खत ठिबक सिंचनातून वापरणे हे अधिक खर्चिक असल्याने स्फुरदयुक्त खतांची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून 50 टक्के लागणीच्या वेळी आणि 50 टक्के मोठ्या खांदणी/भरणीचे वेळी जमिनीमध्ये उसाच्या मुळालगत ओलाव्यामध्ये मिसळून द्यावी. त्याचप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेल्या प्रयोगावरून आपण फॉस्फरिक आम्लाचा वापर स्फुरद खत ऊस पिकास देण्यासाठी करता येतो. त्यामुळे स्फुरद खतमात्रेमध्ये 30 टक्के बचत होते.
पालाशयुक्त खते -
पालाशयुक्त खतांचा वापर ठिबक सिंचनातून करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे पोटॅशिअम क्लोराईड हे खत उपयुक्त आहे. रेड पोटॅशचा वापर केल्यास त्यातील लोहामुळे ठिबक तोट्या बंद होण्याचा धोका असतो.
खतांच्या ग्रेड्स -
रासायनिक खते ठिबक सिंचनातून वापरण्यासाठी पाण्यात विरघळणाऱ्या सरळ खतांमध्ये युरिया, अमोनिअम नायट्रेट, डाय अमोनिअम फॉस्फेट, पोटॅशिअम क्लोराईड, तर मिश्र खतांमध्ये 20-20-20, 20-9-20, 15-4-15 आणि द्रवरूप खतामध्ये 4-2-8, 6-3-6, 6-4-10, 12-2-6, 9-06 अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत.
ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती -
ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध आणि मात्राबद्ध पद्धतीने देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर राहते. खतमात्रा व पाण्याचा प्रवाह सतत एकसारखा राहतो. उदा. एक लिटर खत द्रावण आणि 100 लिटर पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरूपात म्हणजेच "पीपीएम'मध्ये मोजली जाते. मात्राबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खत मिश्रित व खत विरहित पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खतमात्रा कि. ग्रॅम/हेक्टर या स्वरूपात मोजली जाते.
खते देण्याची उपकरणे -
फर्टिलायझर टॅंक (बायपास टॅंक)-
फर्टिलायझर टॅंकमध्ये खत व पाण्याचे द्रावण तयार होऊन ठिबक संचातील तोट्यांद्वारे पिकाच्या मुळाशी पोचते.
फायदे -
1. देखभालीवरील खर्च कमी, सुलभ वापर.
2. पाण्यात विरघळणारी खते देण्यासाठी उपयुक्त
4) खते देण्यासाठी वाढीव ऊर्जेची आवश्यकता नाही.
तोटे -
1) फक्त मात्राबद्ध (क्वांटिटेटिव्ह) पद्धतीने खते देता येते.
2) खतांची तीव्रता एकसारखी राहत नाही, ती कमी होत जाते.
3) पाण्याचा दाब व प्रवाह यातील बदलानुसार खत मात्रा व तीव्रता बदलते.
4) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फर्टिगेशन करण्यासाठी वाहून नेण्यावर निर्बंध येतात.
5) स्वयंचलित सिंचन प्रणालीमध्ये वापरासाठी मर्यादा आहेत.
व्हेंच्युरी इंजेक्टर -
या उपकरणाच्या साहाय्याने पाइपमध्ये पोकळी निर्माण करून खत द्रावण ओढून घेतले जाते.
फायदे -
1) देखभालीवरील खर्च कमी. वजनाने हलकी व अनेक ठिकाणी वापरण्यास शक्य होते.
2) खताची तीव्रता एकसमान राहते.
3) बाहेरील वाढीवर ऊर्जेची आवश्यकता नाही.
4) स्वयंचलित सिंचनप्रणालीमध्ये वापरता येते.
तोटे -
1) मोठ्या प्रमाणावर दाबातील घट (हेड लॉस-30 टक्क्यांपर्यंत)
2) दाबातील फरकानुसार कार्यक्षमतेत बदल होतो.
फर्टिलायझर इंजेक्शन पंप -
यामध्ये हायड्रॉलिक व इलेक्ट्रिक पंपाचा अंतर्भाव होतो. हायड्रॉलिक पंपामध्ये ऍमेआईड व डोसाट्रोन तर इलेक्ट्रिक पंपामध्ये डायफ्रॅम व पिस्टन पंपाचा वापर केला जातो.
फायदे
1) प्रमाणबद्ध (प्रपोर्शनल) पद्धतीने खत देता येते. मूळ किंमत व देखभालीवरील खर्च कमी.
2) खतमात्रा अतिशय काटेकोरपणे व एकसमान तीव्रतेने देता येते.
3) पाण्याच्या दाबातील फरकाचा परिणाम होत नाही, हेड लॉस नाही.
4) वजनाने हलका व अनेक ठिकाणी वापर शक्य होतो.
5) स्वयंचलित सिंचन प्रणालीसाठी उपयुक्त आहे.
6) बाहेरील वाढीव ऊर्जेची आवश्यकता नाही.
तोटे -
1) मूळ किंमत जास्त आहे.
2) काही पंपांसाठी वाढीव ऊर्जा आवश्यक असते.
फर्टिगेशन उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास -
...अशी ठरवा खतांची मात्रा
खतांची मात्रा ही जमिनीचा प्रकार, त्यातील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, पीकवाढीच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन ठरविता येते. ऊस पिकासाठी खते द्यावयाची असल्यास सहा महिन्यांपर्यंत दर 15 दिवसांनी म्हणजे एकूण तेरा वेळा खते विभागून दिल्यास फायदेशीर ठरतात.
उदा. - एक हेक्टर ऊस क्षेत्रास सुरू उसासाठी नत्र, स्फुरद व पालाशची खतमात्रा अनुक्रमे 250ः115ः115 कि./हे द्यावयाच्या झाल्यास दर 15 दिवसांनी युरिया व पोटॅशिअम क्लोराईड किती द्यावा लागेल?
पोटॅशिअम क्लोराईडमध्ये पालाशचे प्रमाण = 60 टक्के
1. कि. पालाशसाठी = 100/ 60=1.7 कि. पोटॅशिअम क्लोराईड
1 हे. क्षेत्रासाठी पोटॅशिअम क्लोराईडची गरज = 115 x 1.7 = 195.50 कि./हे.
दर 15 दिवसांसाठी = 195.50/ 13 = 15 कि/ हे./ 15 दिवसांनी.
ऊस पिकासाठी द्रवरूप खताचा वापर करण्यासंदर्भात उदाहरण -
ऊस पिकासाठी द्रवरूप खताचे नियोजन (प्रति हेक्टर क्षेत्रासाठी)
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ठिबक सिंचनाद्वारे खतांच्या वापराबाबतच्या संशोधनावरून असे दिसून येते, की पाण्यात विरघळणारी अथवा द्रवरूप खते ठिबक सिंचनातून ऊस पिकास दिली असता खताच्या मात्रेमध्ये 30 टक्क्यांपर्यंत बचत करता येते. उदाहरणादाखल एका प्रयोगाची निरीक्षणे पुढे दिली आहेत.
* टी 1 - ठिबक सिंचनाखाली शिफारशीत खत मात्रा
टी 2 - ठिबक सिंचनाद्वारे 100 टक्के शिफारशीत खत मात्रा (4 वेळा)
टी 3 - ठिबक सिंचनाद्वारे 100 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा - 15 दिवसांनी)
टी 4 - ठिबक सिंचनाद्वारे 85 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा - 15 दिवसांनी)
टी 5 - ठिबक सिंचनाद्वारे 70 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा - 15 दिवसांनी)
टी 6 - ठिबक सिंचनाद्वारे 55 टक्के शिफारशीत खत मात्रा (13 वेळा- 15 दिवसांनी)
ठिबक सिंचनातून द्यावयाच्या खतांची निवड आणि कार्यक्षम वापर -
1) खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्याचे प्रमाण जास्तीत जास्त असावे.
2) शेतीतील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत.
3) खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.
4) खतातील क्षारामुळे गाळप यंत्रणा व ठिबक सिंचनातील तोट्या बंद पडू नयेत, तसेच संचातील कोणत्याही घटकावर खतातील क्षारामुळे गंज चढणार नाही, किंवा इतर अनिष्ट परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
5) खते वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत.
6) खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर रसायनांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये.
7) एकाच वेळी एकापेक्षा अधिक खते एकत्रित द्यावयाची असल्यास त्यांची आपापसांत कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत.
8) ठिबक संचातील तोट्यांवर खतातील अथवा पाण्यातील क्षार, शेवाळ, लोह, गंधक इ. साचू न देणे जरुरीचे आहे.
संपर्क - अरुण देशमुख - 9822278894
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन