অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळबाग - रिंग पद्धतीने ठिबक

फळबागांसाठी ऑनलाइन आणि इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर योग्य पद्धतीने करावा. समांतर पद्धती अथवा रिंग पद्धतीमध्ये झाडाच्या जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रात कायम वाफसा ठेवता येतो. त्यामुळे फळांची संख्या वाढते. फळांना वजन चांगले प्राप्त होते. तसेच फळांच्या गुणवत्तेत ही सुधारणा होते. 

फळबागांमध्ये ऑनलाइन ड्रीपरचा वापर अधिक होत आहे. पाण्याची गुणवत्ता बघून योग्य फिल्टरची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. जेवढे पाणी चांगले तेवढा संच अधिक दीर्घकाळ सुरळीत सुरू राहतो. फिल्टरमध्ये हायड्रोसायक्‍लॉन (शंकू), सॅंड (वाळू), स्क्रीन (जाळी), डिस्क (चकत्या) फिल्टर उपलब्ध आहे. ठिबक सिंचन संचाची निवड करताना उच्चतम गुणवत्तेची निवड करावी. रासायनिक खते पिकांना ठिबक सिंचनातून द्यावीत. त्यामुळे खते वापरण्यात 25 ते 30 टक्के बचत होते. रासायनिक खतांची कार्यक्षमता 90 टक्‍क्‍यांहून अधिक मिळते. ठिबक सिंचनामधून खते देण्यासाठी व्हेंच्युरी अथवा फर्टिलायझर टॅंक आवश्‍यक आहे.

फळबागांसाठी ठिबक सिंचन तंत्राचा वापर -

फळबागांमध्ये शेतकरी ऑनलाइन ठिबकचा वापर करतात. त्याचबरोबरीने टोमॅटो, मिरची, ऊस, कापूस टरबूज, काकडी, गुलाब, कार्नेशन प्रमाणेच फळ पिकासाठी इनलाइन ठिबक सिंचन पद्धती फायदेशीर आहे. मोसंबी, संत्रा, द्राक्षे, डाळिंब पिकांमध्ये इनलाइन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सहज करता येणार आहे.

ठिबक सिंचनाच्या पद्धती

ऑनलाइन पद्धती

या पद्धतीमध्ये ठिबकच्या साध्या नळीवर ड्रीपर अथवा मायक्रोट्यूब बसविली जाते. नवीन लागवडी वेळी झाडाजवळ एक अथवा झाडांच्या दोन्ही बाजूंस एक असे दोन ऑनलाइन ड्रीपरचा वापर करावा. नळी 16 मि.मी. तर ड्रीपर चार किंवा आठ लिटर/ तास असावा. झाडांची वाढ जसजशी वाढेल त्याप्रमाणे झाडांची पाण्याची गरज वाढेल. त्यासाठी ड्रीपरची संख्या वाढवावी त्यासाठी खालील पद्धतीने ड्रीपर लावावेत. 

या पद्धतीमध्ये पूर्ण वाढलेल्या झाडाची दुपारी 12 वाजता पडलेल्या सावलीच्या क्षेत्रात कडेला जेथे पांढरी मुळे आहेत, त्या जागी सरळ नळीवर दोन ड्रीपर असावे. दोन ड्रीपर एक्‍स्टेंशन ट्यूबला लावून बसवावेत म्हणजे पांढऱ्या मुळांचे जास्तीत जास्त क्षेत्र वाफसा अवस्थेत ठेवून पिकाची पाण्याची गरज भागविता येईल.

समांतर पद्धती -

अ) ऑनलाइन -

या पद्धतीमध्ये पूर्ण वाढलेल्या झाडांच्या खोडापासून एक ते दीड मीटर अंतरावर सावलीच्या क्षेत्रात खोडाच्या दोन्ही बाजूंस ठिबकच्या दोन नळ्यांचा वापर करावा. यामध्ये ऑनलाइन ठिबक पद्धतीचा वापर करता येतो. 16 मि.मी. जाडीच्या नळीवर 75 ते 90 सें.मी. अंतरावर तीन ते चार ड्रीपर लावावेत. ड्रीपरचा प्रवाह चार लिटर/ तास निवडावा. म्हणजे पिकाची पाण्याची गरज सहज पूर्ण करता येईल.

ब) इनलाइन ठिबक पद्धती

या पद्धती मध्येही फळझाडांसाठी ऑनलाइन पद्धती प्रमाणेच पूर्ण वाढलेल्या झाडांच्या खोडापासून एक ते दीड मीटर अंतरावर सावलीच्या क्षेत्रात जेथे पांढरी मुळे वाढलेली आहेत. अशा क्षेत्रात खोडाच्या दोन्ही बाजूंस ठिबकच्या दोन इनलाइन नळ्यांचा वापर करावा. 16 मि.मी. जाडीची नळी वापरावी. नळीतील दोन ड्रीपरमध्ये 75 ते 90 सें.मी. अंतर निवडावे. ड्रीपरचा प्रवाह चार लिटर/ तास निवड करावा. 


रिंग पद्धती -

अ) ऑनलाइन रिंग पद्धती -

या पद्धतीमध्ये पूर्ण वाढलेल्या झाडाची दुपारी 12 वाजता पडणाऱ्या सावलीच्या क्षेत्रात कडेला ज्या ठिकाणी पांढरीमुळे आहेत त्या जागी साध्या 12 मि.मी. जाडीची नळीची रिंग ठिबकच्या नळीवर बसवावी. त्या नळीवर 75 ते 90 सें.मी. अंतरावर चार लिटर/तास प्रवाहाचे ड्रीपर बसवावेत. त्यामुळे जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रात वाफसा ठेवून पिकाची पाण्याची गरज भागविता येईल. 16 मि.मी. जाडीच्या नळीवर 12 मि.मी. जाडीची रिंग बसविता येते.

ब) इनलाइन रिंग पद्धती

या पद्धतीमध्ये पूर्ण वाढलेल्या झाडाची दुपारी 12 वाजता पडणाऱ्या सावलीच्या क्षेत्रात कडेला ज्या ठिकाणी पांढरीमुळे वाढलेली आहेत, त्या जागी 12 मि.मी. जाडीच्या इनलाइन नळीची रिंग 16 मि.मी. जाडीच्या साध्या नळीवर बसवून घ्यावी. इनलाइन नळीतील ड्रीपरमधील अंतर 75 ते 90 सें.मी. निवडावे. ड्रीपरचा प्रवाह चार लिटर/ तास निवडावा, म्हणजे जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रात वाफसा ठेवून पिकाची पाण्याची गरज भागविता येईल. 
समांतर पद्धती अथवा रिंग पद्धतीमध्ये झाडाच्या जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रात कायम वाफसा ठेवता येत असल्यामुळे पिकांना पाण्याचा अजिबात ताण बसत नाही. पाण्याची गरज सहज भागविता येते त्यामुळे फळांची संख्या वाढते. फळांना वजन चांगले प्राप्त होते. तसेच फळांच्या गुणवत्तेत ही सुधारणा होते. अशा पद्धतीचा वापर आंबा, संत्रा, चिकू, मोसंबी, पेरू, आवळा, सीताफळ, डाळिंब, काजू इ. फळझाडांना करता येईल. जवळच्या अंतरावरील फळपिके उदा. केळी, अननस, पपई, स्ट्रॉबेरी या पिकासाठी इनलाइन ठिबक पद्धतीचा अवलंब करावा.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate