অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कीटकनाशकांच्या विषबाधेवर प्रथमोपचार

विषारी कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्याने विषबाधा होऊ शकते. तेव्हा त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना संबंधित कीडनाशकांच्या प्रभावांची व लक्षणांची माहिती असणे आवश्‍यक आहे.

कीटकनाशकांचा वापर करताना

योग्य काळजी न घेतल्यामुळे अथवा त्यांचा अचानक शरीरात प्रवेश झाल्यामुळे विषबाधा होऊ शकते. अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी. कीटकनाशकांची विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये मळमळणे, उलटी, जीव घाबरणे, चक्कर येणे, थकवा, श्‍वासोच्छ्वास करण्यास अडचण, मूर्च्छा, घाम येणे, भूक न लागणे, थरथरी सुटणे, मांसपेशी आखडणे इत्यादी आढळल्यास ही कीटकनाशकांच्या विषारी प्रभावाची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत रोग्याला ताबडतोब दवाखान्यात न्यावे. खालीलप्रमाणे प्राथमिक उपचार करावेत ः

विशेष बाबी

  • वापरलेल्या कीटकनाशकांच्याविषयी डॉक्‍टरला आवश्‍यक माहिती द्यावी, ज्यामुळे अतिप्रभावी उपचार ताबडतोब केले जाऊ शकतील. म्हणजे ज्या कीटकनाशकामुळे विषबाधा झाली असेल तो डबा, बाटली अथवा पुडा त्वरित डॉक्‍टरांना दाखवावा.
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषबाधा झाल्यानंतर रोग्यास मानसिक आधार द्यावा. कीडनाशके हाताळताना अथवा वापरताना योग्य ती दक्षता घ्यावी.

प्राथमिक उपचार

श्‍वासोच्छ्वासामुळे झालेली विषबाधा 
  • रोग्याला त्वरित त्या जागेवरून मोकळ्या जागेवर हलवावे.
  • रोग्याला आरामपूर्वक पडून राहण्यास सांगावे व रोग्यास जास्त हालचाल करू देऊ नये.
  • रोग्यास मोकळ्या हवेमध्ये श्‍वास घेऊ द्यावे.
  • रोग्याची श्‍वास गती संथ झाल्यास कृत्रिम श्‍वासोच्छ्वासास प्रारंभ करावा.

डोळ्यांस विषबाधा झाल्यास

  • औषध अनवधानाने डोळ्यांमध्ये गेले असल्यास डोळ्यांची उघडझाप कमीत कमी करावी.
  • शक्‍य असल्यास दवाखान्यात जाईस्तोवर डोळे सतत उघडे ठेवावे.
  • डोळे ताबडतोब स्वच्छ पाण्याने पंधरा मिनिटांपर्यंत पुन:पुन्हा पाण्याचे सपकारे मारून धुवावे.
  • कुठलेही औषध डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत टाकू नये.

स्पर्शाने झालेली विषबाधा

  • रोग्याचे सुरक्षात्मक व प्रदूषित कपडे बदलून टाकावे.
  • रोग्याला वाहत्या थंड पाण्याच्या धारेखाली १० ते १५ मिनिटे बसवावे, असे केल्यास विषबाधा ६० ते ७० टक्के कमी होते.
  • रोग्याचे शरीर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे; पण रोग्याचे अंग पांघरुणाने झाकून न घेता रोग्याला शुद्ध हवेशीर वातावरणात बसवावे.

यंत्राचे नोझल साफ करताना झालेली विषबाधा

  • विषारी औषध थोड्या प्रमाणात जरी तोंडावाटे शरीरात गेले असल्यास एक पेला कोमट पाण्यात दोन चमचे मीठ टाकून हे द्रावण रोग्याला पाजल्यानंतर त्याला घशामध्ये बोटे घालून उलटी करण्यास लावावे.
  • रोग्याचे शरीर आखडायला प्रारंभ झाल्यास रोग्याच्या तोंडात रुमालाचा बोळा बनवून ठेवावा, अथवा एखाद्या कठीण लाकडाचा तुकडा दातांमध्ये ठेवावा, ज्यामुळे रोग्याची जीभ दातांमध्ये दबणार नाही.
  • रोग्याला लवकरात लवकर दवाखान्यात पोचविणे आवश्‍यक आहे.

टीप - विषबाधा झाल्यास रोग्यास त्वरित डॉक्‍टरकडे न्यावे व त्यांच्या सांगण्याप्रमाणे उपचार करावेत.
- ०७२३२-२४८२३५
कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ
स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate