অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीस (हेलिकोवर्पा आर्मिजेरा) पोषक आहे. प्रादुर्भाव दिसून येत आहे. या वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

शेंगा पोखरणऱ्या अळ्या सुरवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास 60-80 टक्के नुकसान होते.

नियंत्रण व्यवस्थापन

  1. तुरीमध्ये एकरी 4 गंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकांच्यावर एक फूट उंचीवर लावावेत.
  2. तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
  3. पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
  4. घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. (250 एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी प्रमाणे हेक्‍टरी 500 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी आणि त्यामध्ये नीळ 100 ग्रॅम टाकावी.
  5. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आल्यास क्‍लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 25 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 टक्के प्रवाही) 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 5 टक्के इमामेक्‍टीन बेन्झोएट 4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डीयामाईड (39.35 एस.सी.) 2 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.

हरभऱ्यावर हेलीकोव्हर्पा अळीचा प्रादुर्भाव

सध्याचे ढगाळ वातावरण हरभऱ्यावरील घाटेअळीस पोषक ठरत आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकाच्या कोवळ्या पानांवर आढळून येत आहे. डिसेंबर-जानेवारीत या किडींचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. सुरवातीस लहान अळ्या कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागताच अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडतात व आपले डोके आत खुपसून दाणे खातात. दर दिवशी एक अळी 5 ते 16 घाट्यांचे नुकसान करते. या अळीमुळे पिकाचे 5 ते 38 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते.

नियंत्रण व्यवस्थापन

  1. पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा अधिक उंचीची टी (T) आकाराचे 50 पक्षी थांबे प्रति हेक्‍टर या प्रमाणात लावावेत.
  2. 1 ते 2 अळ्या प्रति मि. ओळ किंवा 8 ते 10 प्रति कामगंध सापळ्यात सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी समजून खालील उपाय करावेत.
  3. पिकास फुले येत असताना सुरवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. किंवा अझाडिरेक्‍टीन घटकावर आधारित कीडनाशक 1500 पीपीएम 40 मि.लि. किंवा 3000 पीपीएम 25 मि.लि. प्रति 10 लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  4. घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. (250 एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात हेक्‍टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि त्यामध्ये नीळ 100 ग्रॅम टाकावी.
  5. जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा अधिक असल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

क्‍लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 20 मि.लि. किंवा 
क्विनॉलफॉस (20 टक्के प्रवाही) 20 मि.लि. किंवा 
अधिक प्रादुर्भाव असताना इमामेक्‍टीन बेन्झोएट (5 टक्के) 4 ग्रॅम.

 

संपर्क - 
डॉ. बी. बी. भोसले, (संचालक विस्तार शिक्षण), 9423437894. 
डॉ. पी. आर. झंवर (विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग), 3420848483. 
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate