द्राक्ष पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनाचा दर्जा घटण्यासोबतच उत्पादनामध्येही घट होते. भुरीच्या परिणामकारक नियंत्रणासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील.
द्राक्ष पिकावर मण्यांवर व पानांवर भुरी येते. पानांवर भुरी आल्यावर पानांचा अन्ननिर्मितीचा वेग कमी होतो व पानांचा टिकाऊपणा कमी होऊन पाने लवकर खराब होतात. परिणामी एकरी वजनात घट येते. मण्यांवर भुरी आल्यावर फुगवट कमी होते व दुय्यम दर्जाचा माल तयार होऊन नुकसान होते. भुरी प्रतिबंधात्मक उपाय हीच भुरी नियंत्रणाची सर्वांत योग्य पद्धत. एकदा आलेली भुरी नियंत्रित करण्यास अवघड असते. भुरी नियंत्रित झाली की नाही हे उघड्या डोळ्यांनी बघून ठरवणे तसे अवघडच असते.
हवामानानुसार छाटणीपासून 20 दिवसांनी भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात केली पाहिजे.
हवामानानुसार दर 6 ते 10 दिवसांनी प्रतिबंधात्मक फवारणी केली पाहिजे. फुलोऱ्यात हे आवश्यक असते. फुलोऱ्यामध्ये भुरी नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा. फुलोऱ्याच्या आतच भुरी घडावर आल्यास भुरी नियंत्रित करणे अवघड जाते. मणी 6-7 मि.मि. आकाराचे होईपर्यंत भुरी नियंत्रणाकरिता केलेल्या फवाऱ्याचे कव्हरेज चांगले मिळते. यानंतर पुढील काळात मणी मोठे झाल्याने फवारणीचे कव्हरेज मिळत नाही म्हणूनच मणी 6-7 होईपर्यंत भुरी नियंत्रित ठेवली पाहिजे व पुढील काळात मण्यात पाणी भरेपर्यंत भुरी नियंत्रणाचे फवारे दिले पाहिजेत.
भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात फळछाटणीनंतर 20 ते 25 दिवसांनी केली पाहिजे.
टेट्राकोनॅझोल, मायक्लोबुटेनिल या बुरशीनाशकासोबतच 2.5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात पोटॅशिअम बायकार्बोनेटचा वापर फायदेशीर ठरतो. गरजेनुसार एका हंगामामध्ये पोटॅशिअम बायकार्बोनेट 3-4 वेळा वापरावे. पानात पोटॅशची कमतरता असल्यास भुरी नियंत्रणात येत नाही. या फवारणीने पानातील पोटॅशची कमतरता भरून निघते व भुरीचे नियंत्रण मिळते.
मणी 6-7 मि.मि.पेक्षा मोठे झाल्यावर अनेक वेळा भुरी नियंत्रित होत नाही. अशा वेळी बुरशीनाशकांचे एकरी प्रमाण 25 टक्क्यांनी वाढवावे. फवारणी द्रावण एकरी 800 लिटर घेऊन चांगले फवारावे. (उदा. मायक्लोबुटॅनिल एकरी 160 ग्रॅम अधिक 25 टक्के जादा म्हणजे 40 ग्रॅम म्हणजे 800 लिटर पाण्यात 200 ग्रॅम घेऊन फवारावे.)
संपर्क - वासुदेव काठे, 9922719171
(लेखक दाभोळकर प्रयोग परिवाराचे महाराष्ट्रासाठी समन्वयक आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आजकाल आजूबाजूला शेतीला नावे ठेवणा-यांची कमी नाही, ...
अन्न कचरा म्हणजे काय? अन्न कचऱ्याचे व्यवस्थापन कसे...
एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्...
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...