অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नियंत्रण उझी माशीचे

उझी माशी ही उपद्रवी कीड असून, तिच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये नुकसान होत असल्याचे दिसून येते. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 10 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

या माशीच्या जीवनचक्रातील 1) अंडी, 2) मॅगट, 3) प्युपा, 4) माशी या चार अवस्था आहेत. नर उझी माशी मादी उझी माशीच्या तुलनेत आकाराने मोठी असते. पाठीवर गडद काळ्या रंगाचे चार उभे पट्टे असतात. ही माशी 300 ते 1000 पर्यंत अंडी घालू शकते. ही माशी शक्‍यतो चॉकी अवस्थेतील रेशीम कीटकांवर अंडी घालण्याचे टाळते, तर आकाराने मोठ्या असलेल्या प्रौढ रेशीम कीटकांना भक्ष्य बनवते. अंडे घातल्यापासून एक-दोन दिवसांत अंड्यातून मॅगट बाहेर येतो, ज्याचा रंग पिवळसर पांढरा असतो. मॅगट रेशीम कीटकाच्या नाजूक त्वचेला छिद्र पाडून कीटकाच्या शरीरात प्रवेश करतो. ज्या ठिकाणाहून तो प्रवेश करतो, त्या ठिकाणी काळ्या रंगाचा डाग दिसून येतो.

परिपूर्ण वाढ झालेला क्रीम व्हाइट रंगाचा मॅगट संगोपनगृहातील रॅकमध्ये, जमिनीला असलेल्या भेगांमध्ये अथवा कीटक संगोपनगृहातील कोपऱ्यांमध्ये अंधाऱ्या जागी वाटचाल करतो. या ठिकाणी त्याची पुढील प्युपा अवस्था सुरू होते. प्युपा अवस्था 10 ते 12 दिवसांची असते. प्युपाचा आकार लंबगोलाकार/दंडाकृती असून, प्रौढ प्युपाचा रंग गडद तपकिरी असतो. या प्युपामधून मादीच्या तुलनेत नर उझी माशी अगोदर बाहेर येते. उझी माशीचा जीवनाचा कालावधी 17 ते 18 दिवसांचा असतो. या एकूण कालावधीपैकी चौथ्या ते सातव्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात अंडी घालते. नर माशीपेक्षा मादी माशीचा जीवनकाल अधिक असतो. उझी माशी 1000 ते 2000 मीटरपर्यंत उडू शकते.

नियंत्रण


कीटक संगोपनगृह, कोष खरेदी केंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्र इ. ठिकाणांवरील मॅगट व प्युपा गोळा करून जाळून नष्ट करावा किंवा 0.5 टक्का साबणाच्या द्रावणात नष्ट करावा. जमिनींना असलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. उझी माशीच्या प्रादुर्भावास बळी पडलेले रेशीम कीटक गोळा करून नष्ट करावेत.

पाचव्या अवस्थेतील रेशीम कीटकांस प्रादुर्भाव झाला असेल, तर असे प्रादुर्भावित रेशीम कीटक इतर रेशीम कीटकांच्या तुलनेत दोन दिवस अगोदर कोष बांधतात. असे कोष मॅगट बाहेर येण्यापूर्वीच गोळा करून त्यांवर कोष ड्राय करण्याची प्रक्रिया करावी, ज्यामुळे कोषातील मॅगट मरून जाईल व कोषांचे नुकसान होणार नाही.

उझी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून कोष, मॅगट, प्युपा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या गावांतील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एक-दीड महिना पीक बंद ठेवावे, ज्यामुळे उझी माशीच्या जीवनचक्रात निसर्गतःच अडथळा निर्माण होऊन तिच्या प्रसारावर नियंत्रण मिळविता येईल. कीटक संगोपनगृहाच्या खिडक्‍या व तावदाने इत्यादींना नायलॉन जाळीने झाकून घ्यावे, यामुळे जवळपास 20 ते 22 टक्के नियंत्रण मिळविता येते. चॉकी ट्रे, तसेच रॅक नायलॉन जाळीने झाकून ठेवावे, यामुळे उझी माशीला अंडी घालणे शक्‍य होणार नाही.

किडीची लक्षणे

रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी असणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर येतात. 
उझी माशीचा प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेला असल्यास रेशीम कीटक कोषावस्थेपूर्वीच मृत होताना आढळतात, जर प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या पाचव्या अवस्थेत झालेला असेल, तर पोचट कोषांची निर्मिती होते. होणारे नुकसान 10 ते 30 टक्के असते.
रेशीम अळ्यांचे मस्कार्डीनपासून संरक्षण
मस्कार्डीन हा रोग पावसाळी, तसेच हिवाळी हंगामात आढळून येतो. हा रोग परजीवी बुरशीमुळे होत असून, या रोगाने अळ्यांचे नुकसान होते. त्यासाठी प्रादुर्भाव दिसताक्षणी वेळीच नियंत्रण करायला हवे. या रोगामुळे रेशीम कीटकांस विविध रंग प्राप्त होतात, त्यावरून मस्कार्डीनचे विविध प्रकार पाडले आहेत. जसे लाल मस्कार्डीन, पिवळा मस्कार्डीन, काळा मस्कार्डीन, हिरवा मस्कार्डीन, पांढरा मस्कार्डीन. यांपैकी पांढऱ्या व हिरव्या मस्कार्डीनचा प्रादुर्भाव इतर प्रकारच्या मस्कार्डीनच्या तुलनेत जास्त होतो. पांढरा मस्कार्डीन
या रोगात मेलेल्या रेशीम अळ्यांच्या शरीराचा रंग पांढरा होत असल्याने या रोगास पांढरा मस्कार्डीन असे म्हटले जाते. भारतात पांढरा मस्कार्डीन मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

रोग होण्याची कारणे

  1. हा रोग प्रामुख्याने बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीमुळे होतो.
  2. कीटक संगोपनगृहातील कमी तापमान व जास्त आर्द्रता या बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते.
  3. या रोगाचा प्रादुर्भाव बहुतांश दूषित कीटक संगोपन साहित्य निर्जंतुकीकरण न करता वापरल्याने होतो.
  4. रोगिष्ट अळ्यांचा योग्यरीत्या नायनाट न केल्यास, रोगिष्ट अळ्या उघड्यावर फेकून दिल्यास हवेच्या झोताबरोबर या बुरशीचे बीज (स्पोअर्स) कीटक संगोपनगृहात प्रवेश करतात व निरोगी रेशीम कीटकांस या रोगाची लागण होते.
  5. हा रोग संसर्गजन्य असल्याने रोगिष्ट अळ्या निरोगी अळ्यांच्या सान्निध्यात आल्यास या रोगाचे बीज (स्पोअर्स) निरोगी अळ्यांना चिकटून शरीरात प्रवेश करतात व रोगाची लागण होते.
  6. कीटक संगोपनापूर्वी व कीटक संगोपनानंतर निर्जंतुकीकरण कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यानेदेखील हा रोग उद्‌भवू शकतो.

रोगाची लक्षणे

  1. कीटकाची भूक कमी होऊन हालचाल मंदावते.
  2. कीटकाच्या त्वचेचा तण्यता गुणधर्म नाहीसा होऊन शरीराला चकाकी येऊन शरीर ओलसर होते.
  3. मृत्यूपूर्वी कीटक उलट्या करते, विष्ठाही पातळ होते.
  4. रोगाची लागण झालेले कीटकाचे मृत शरीर दहा तासांनी कडक होऊन पांढऱ्या खडूसारखे दिसते.

करावयाचे उपाय

  1. कीटक संगोपनापूर्वी व कीटक संगोपनानंतर परिसर, कीटक संगोपन साहित्य इत्यादींचे निर्जंतुकीकरण करावे.
  2. कीटक संगोपनगृहात तापमान, आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवावी व पुरेशी वायुविजनाची व्यवस्था असावी.
  3. कीटक संगोपन चालू असताना वातावरण निरोगी ठेवावे.
  4. रोगिष्ट कीटक बेडमधून वेळीच गोळा करून नष्ट करावेत.
  5. केंद्रीय रेशीम मंडळाने विकसित केलेल्या विजेता पावडरची योग्य प्रमाणात धुरळणी करावी.
  6. कीटकांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला व विष्ठा खत खड्ड्यात गाडून नष्ट करावे.
  7. प्रत्येक कातावस्था संपल्यावर बेडवर एकसारख्या प्रमाणात फॉर्म्यालिन चाफची धुरळणी करून बेड वर्तमानपत्राने अर्धा तास झाकून ठेवावा, ज्यामुळे बुरशीचे बीज (स्पोअर्स) नष्ट होतील.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate