অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळमाशी नियंत्रणासाठी प्रलोभन सापळ्यांचा वापर

सध्या आंब्याला मोहोर येत असून, पुढील टप्प्यामध्ये आंबा फळ तयार होण्यास सुरवात होईल. या कालावधीत येणाऱ्या किडींपैकी फळमाशी ही महत्त्वाची कीड आहे. आंबा तयार होण्याआधीपासूनच सापळ्यांचा वापर केल्यास फळमाशी आटोक्‍यात ठेवता येईल.

आंबा, चिकू, पपई, सफेद जांबू, जांभूळ, बोर, केळी या फळपिकांवर फळमाशीच्या विविध जाती आढळतात. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात बॅक्‍ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्‍ट्रोसेरा झोनॅटा, बॅक्‍ट्रोसेरा करेक्‍टा व बॅक्‍ट्रोसेरा टाऊ या चार जाती आढळून आल्या आहेत, तसेच वेलवर्गीय भाज्या कारली, तोंडली, दोडके, कलिंगड, काकडी इत्यादी पिकांवर बॅक्‍ट्रोसेरा कुकरबीटी ही फळमाशीची जात आढळून आली आहे. या सर्व फळमाश्‍यांचा सुमारे 25 ते 40 टक्के प्रादुर्भाव होतो.

फळमाशीची ओळख व जीवनचक्र

  • फळमाशी पिवळसर सोनेरी असून, आकाराने घर-माशीपेक्षा थोडी मोठी असते.
  • अळ्या फिकट पांढऱ्या रंगाच्या असतात. फळमाशीची एक मादी तिच्या जीवनकाळात फळाच्या सालीखाली पुंजक्‍यात 500 ते 1000 अंडी देते. अंडी घातल्यानंतर त्यातून 3 ते 4 दिवसांत पांढऱ्या रंगाच्या आणि डोक्‍याकडे निमुळत्या अशा अळ्या बाहेर येतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. अशी फळे कुजतात. फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. अळी अवस्था 11 ते 15 दिवसांची, तर कोष अवस्था 8 ते 11 दिवसांची असते. प्रौढ माशी 4 ते 5 महिने जगते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या 8 ते 10 पिढ्या पूर्ण होतात.

उपाययोजना

  • या किडीची अळी अवस्था ही फळाच्या आत असते. फवारणीद्वारा कीटकनाशक अळीपर्यंत पोचू शकत नाही.
  • तसेच नेमका फळ अवस्थेमध्ये किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने, फवारणी केल्यास फळामध्ये कीडनाशकांचे अंश राहण्याची शक्‍यता वाढते. अशी फळे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात.
  • या किडीच्या नियंत्रणासाठी सापळे लावणे हा सोपा व पर्यावरणपूरक पर्याय होऊ शकतो.

रक्षक सापळा

या सापळ्यामध्ये एक कुपी असून, त्यात मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा ठेवला जातो. मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्‍या खिडकीतून सापळ्यामध्ये येतात. आतमध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात.

  • दर 20 ते 22 दिवसांनी मिथाईल युजेनॉलचा बोळा नवीन टाकावा. तसेच सापळ्यामधील मेलेल्या माश्‍या काढून सापळ्याची स्वच्छता ठेवावी.
  • हा सापळा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे.

नौरोजी स्टोनहाउस सापळा

या सापळ्यामध्ये एक प्लायवूडचा ठोकळा ठेवला जातो. फळमाशीला आकर्षित करून मारण्यासाठी या ठोकळ्याला मिथाईल युजेनॉल/ क्‍युल्युर वापरल्या जातात. तसेच माशीला मारण्यासाठी कीटकनाशकाची प्रक्रिया केलेली असते.

  • सापळ्यामध्ये एकदा माशी आली म्हणजे कीटकनाशक तिच्या शरीरात जाते व माशी ताबडतोब मरून पडते.
  • या सापळ्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही, त्यामुळे स्वच्छता ठेवणे सोपे जाते.
  • नवसारी येथील कृषी विद्यापीठाने हा सुधारित सापळा विकसित केला आहे.

फ्लॉय टी ट्रॅप

फळमाशीच्या नियंत्रणासाठी बाजारात काही खासगी कंपन्यांचे पिवळे गोल घुमटाकार सापळे उपलब्ध आहेत. रक्षक सापळ्याप्रमाणे यात पाणी टाकावे लागते. सापळ्यात ठेवलेल्या गंधाकडे नर माश्‍या आकर्षित होऊन सापळ्याच्या गोल भांड्याच्या आतल्या बाजूने आत शिरतात व पाण्यात बुडून मरतात. यातील पाणी वरचेवर बदलावे लागते.
एकदा लावलेला क्‍युल्युर (गंध गोळी) दोन महिन्यांनी बदलावी.

असे होते फळमाशीचे नियंत्रण

वरील तिन्ही सापळ्यांमध्ये नर फळमाशी आकर्षित होऊन मरते. सापळे लावलेल्या भागातील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. परिणामी, मिलन प्रक्रियेसाठी नर उपलब्धता कमी होते. मादीची यौनअवस्था ही नरापेक्षा 8 दिवस जास्त असल्याने नराच्या शोधात माद्या अन्य ठिकाणी जातात किंवा अफलित अंडी राहण्याचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे फळमाशी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

सापळे लावण्याची पद्धती व प्रमाण

वरीलपैकी उपलब्ध सापळे एकरी 4 या प्रमाणात शेतामध्ये 4 ते 5 फूट किंवा पिकाच्या उंचीप्रमाणे शेतात अथवा झाडावर टांगून द्यावेत.

प्रलोभन सापळ्याचे फायदे

  • फळे येण्यापूर्वीच सापळे लावल्यास शेतातील प्रौढ माशीची संख्या कमी होते. पर्यायाने प्रादुर्भाव कमी होतो. निर्यातक्षम उत्पादन घेणे शक्‍य होते.
  • पर्यावरणपूरक असल्याने सुरक्षित.
  • कीडनाशकांच्या तुलनेत स्वस्त.
  • बनविण्यास सोपे असल्याने शेतकरी उपलब्ध साहित्यात घरगुती पद्धतीने सापळे तयार करू शकतात.


संपर्क - प्रा. उत्तम सहाणे, 8087985890
(कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, ता. डहाणू, जि. ठाणे.)
स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate