অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बीटी कपाशीवर वाढतोय तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

बीटी कपाशीवर वाढतोय तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

देशी वाणापेक्षा बीटी कपाशीवर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव अधिक आढळत असून, उत्पादनामध्ये सर्वसाधारण 10 ते 40 टक्के घट येऊ शकते. 
विदर्भात कोरडवाहू कापूस पिकावर तुडतुडे (शास्त्रीय नाव - Amrasca beguttula beguttula ) या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटी सुरू होऊन ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरचा 1 ला पंधरवडा या कालावधीत अधिक प्रमाणात असतो.

तुडतुडे किडीची ओळख व जीवनक्रम

अंडी - अंडी वक्राकार, लंबुळकी व पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. एक मादी साधारणतः 15 ते 29 अंडी पानाच्या मध्य शिरेमध्ये घालते. अंडी उबवण्याचा काळ साधारणतः 4 ते 11 दिवसांचा असतो 
पिल्ले - पिल्ले पिवळसर हिरव्या रंगाची, पाचरीच्या आकाराची असतात. त्यांची चाल तिरपी असून, पानाच्या खालील बाजूला समूहाने राहतात. पिल्लावस्थेचा कालावधी 7 ते 21 दिवसांचा असून, हा कालावधी हवामानावर अवलंबून असतो. पिल्ले 5 वेळा कात टाकतात. 
प्रौढ - प्रौढ 3.5 मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे, फिक्कट हिरव्या रंगाचे असतात. समोरच्या पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो. प्रौढ खूप सक्रिय असून, स्पर्श केल्यास चटकन हवेत उडी मारतात. 
सर्वसाधारण एका वर्षामध्ये या किडींच्या 11 जीवनक्रम होतात.

तुडतुड्यामुळे पिकाचे नुकसान कसे होते?

  • प्रौढ व पिल्ले समूहाने पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. या प्रक्रियेमध्ये पानामध्ये विषारी लाळ मिसळतात. त्यामुळे पानातील अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते.
  • पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील पिल्ले पानाच्या शिरेच्या आजूबाजूला राहून रस शोषण करतात. नंतरच्या पिल्लावस्था सर्वदूर पानांवर पसरतात. परंतु, त्या प्रामुख्याने पानाच्या खालच्या बाजूनेच रस शोषण करतात.

लक्षणे

  • प्रादुर्भाव ग्रस्त पाने खालच्या बाजूने वाकतात. पानाच्या कडा प्रथम हलक्‍या पिवळसर होऊन नंतर तपकिरी होतात.
  • अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पान तपकिरी रंगाचे दिसते. या अवस्थेला आपण "हॉपर बर्न' म्हणतो. अशी पाने कडक होतात. कालांतराने पाने वाळून गळतात.
  • झाडाची वाढ खुंटते. अशा झाडांना पात्या व बोंड्या फारच कमी प्रमाणात लागतात. अधिक प्रादुर्भावामुळे संपूर्ण झाड वाळते.

कपाशीवरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव मोजण्यासाठी लक्षणांची प्रतवारी

1) प्रतवारी 1 - झाडांवरील संपूर्ण पाने चांगली, न चुरगळलेली. 
2) प्रतवारी 2 - मुख्यतः झाडाच्या खालच्या बाजूची अगदी थोडीशी पाने चुरगळलेली, पिवळसर कडा असलेली. 
3) प्रतवारी 3 - झाडावरील जवळपास संपूर्ण पाने चुरगडलेली व झाडाची वाढ खुंटलेली. 
4) प्रतवारी 4 - झाडावरील संपूर्ण पाने चुरगळलेली, आक्रसलेली, पिवळी, तपकिरी, वाळलेली. पानगळ व झाडाची वाढ एकदम खुंटलेली.
शिफारशीनुसार नियंत्रणाचे नियमित उपाय करूनही आपल्या बीटी कपाशीचे वाण III किंवा IV प्रतवारी गाठत असेल तर पुढील हंगामात हे वाण तुडतुड्यांसाठी संवेदनशील असल्याने वापरू नये.

हंगामी प्रादुर्भाव व हवामानाचा परिणाम

किमान तापमानात वाढ, अधिक आर्द्रता व ढगाळ वातावरणामध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हमखास वाढतो.

  • पीक हंगामात रात्रीच्या तापमानात सरासरी (18.91 अंश सेल्सिअस) पेक्षा 4.39 अंश सेल्सिअसने वाढ तर दिवसाचे सरासरी तापमान 31.10 अंश सेल्सिअस राहिल्यास.
  • रात्रीच्या आर्द्रतेच्या सरासरीपेक्षा (82.81 अंश सेल्सिअस) 5.55 टक्केने वाढ तर दिवसाच्या आर्द्रतेत सरासरी (44.55 टक्के) पेक्षा 15.89 टक्के वाढ व सूर्यप्रकाशाचे तास सरासरी (5.89) पेक्षा 1.34 तासाने कमी असल्यास असे वातावरण तुडतुड्यांच्या वाढीसाठी पोषक असते.

किडींच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण कसे करावे?

  • कपाशी पिकावरील तुडतुडे प्रादुर्भाव पातळीसाठी आठवड्यातून किमान एक वेळ व प्रादुर्भाव अधिक असलेल्या, संवेदनशील जात लागवडीखाली असल्यास आठवड्यातून दोन वेळा सर्वेक्षण करावे.
  • सर्वेक्षणासाठी शेताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 20-24 झाडांची निवड करावी. निवडलेल्या प्रत्येक झाडावरील वरच्या, मधल्या व खालच्या भागातील पानावरील तुडतुड्यांची संख्या मोजावी.
  • आर्थिक नुकसान संकेत पातळी - निवडलेल्या सर्व झाडांवरील सरासरी संख्या 2-3 तुडतुडे (पिल्ले) प्रति पान.

अधिक प्रादुर्भाव असलेल्या भागात करावयाच्या उपाययोजना

1) किडींचा अखंड अन्नपुरवठा टाळण्यासाठी कपाशीचे पीक हंगामाबाहेर घेण्याचे टाळावे. 
2) कापूस पिकाची योग्य फेरपालट करावी. 
3) तुडतुड्यांना प्रतिकारक अशा पानावर लव असलेल्या बीटी कपाशीच्या संकरित जातीची निवड करावी. 
4) बीटी कपाशीला बियांणाना इमिडाक्‍लोप्रीड (70 टक्के) किंवा थायामेथोक्‍झाम (70 टक्के) या कीटकनाशकांची प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे उगवणीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यांपर्यंत संरक्षण मिळते म्हणून या काळात कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी करू नये. 
5) मृद परीक्षण करून शिफारशीत खत मात्रेचा वापर करावा. जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. 
6) दोन ओळीतील व दोन झाडांतील अंतर योग्य तेच ठेवावे. कपाशीत चवळीचे आंतरपीक घेतल्यास मित्रकिटकांचे (उदा. लेडी बर्ड बिटल, क्रायसोपा, सिरफीड माशी इ.) पोषण होईल. 
7) वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. बांधावरील पर्यायी खाद्य वनस्पती (विशेषतः रान भेंडी) वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात. शक्‍यतो भेंडीचे पीक कपाशी शेजारी घेऊ नये. 
8) ऍझारिडीक्‍टीन (300 पीपीएम तीव्रता) 30 मिली प्रति 10 लिटर किंवा निंबोळी अर्क (5 टक्के)ची फवारणी करावी. 
9) या नंतरही किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी (2-3 पिल्ले/ पान) गाठलीच तर पुढीलपैकी एका शिफारशीत कीटकनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • ऍसिटामीप्रिड (20 टक्के) 1 ग्रॅम
  • किंवा ऍसिफेट (75 टक्के) 7.8 ग्रॅम
  • किंवा डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 13.20 मिली
  • किंवा थायामेथोक्‍झाम (25 टक्के दाणेदार) 2 ग्रॅम
  • किंवा इमिडाक्‍लोप्रिड (30.5 टक्के) 1.5 मिली
  • गरजेनुसार पुढील फवारणी 10-12 दिवसाने सल्ला घेऊन करावी.

संपर्क - डॉ. ए. व्ही. कोल्हे, 9922922294 
(लेखक कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

 

 

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate