অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माशी

माशी

(घरमाशी). डिप्टेरा या गणातील म्युसिडी कुलात या कीटकाचा समावेश होतो. हे कीटक जगात सर्वत्र आढळतात. माश्यांच्या निरनिराळ्या जाती आहेत व त्यांपैकी सर्वसाधारणपणे मस्का डोमेस्टिका ही जात सर्वत्र आढळते. शेकडा नव्वद माश्या मानवाच्या निवासस्थानांच्या आसपास आढळतात. घरात किंवा घराच्या आसपास आढळणाऱ्या कीटकांत माशी ही सर्वांना परिचित आहे. समशीतोष्ण हवामान व उत्सर्ग (टाकाऊ) द्रव्य ज्या ठिकाणी आढळते तेथे या माश्या अंडी घालतात. उत्सर्ग द्रव्यात प्रामुख्याने मैला किंवा इतर सडक्या व कुजक्या पदार्थाचे ढीग त्यांना विशेष पसंत पडतात.

पूर्ण वाढ झालेल्या माशीचा रंग मळकट करडा असतो. वक्षाच्या पृष्ठभागावर चार अनुदैर्घ्य (लांबीला समांतर) काळे पट्टे असतात व उदरावर चित्रविचित्र पिवळे ठिपके असतात. शरीराची लांबी ५ ते ७ मिमी. असते. प्रत्येक बाजूस एक असे दोन ठळक संयुक्त डोळे असतात. प्रत्येक संयुक्त डोळ्यात सु. ४,००० नेत्रिका असतात. यांशिवाय ती साधे डोळेही असतात. पुढील जोडीतील पंख पापुद्र्यासारखे पण पूर्ण वाढलेले असतात. मागील जोडीतील पंखांचे रूपांतरण होऊन त्याचे दोन गोळे बनलेले असतात व त्यांना संतोलक म्हणतात. याचा उपयोग माशीला उडताना आपला तोल सांभाळण्यासाठी होतो. माशीला पायाच्या तीन जोड्या असतात व त्या इतर कीटकांप्रमाणे वक्षाच्या अधर (खालील) भागावर असतात. सहाही पायांच्या तळव्यांवर बारीक बारीक केस असतात आणि तळव्यांतून एक प्रकारचा चिकट स्त्राव बाहेर पडतो. यामुळे माशीला खाली पाठ वर पाय अशा अवस्थेत गुळगुळीत भिंतीच्या पृष्ठभागावर किंवा खोलीच्या छतावर चालता येते. ही हालचाल गुरूत्वाकर्षणाच्या प्रेरणेविरुद्ध होते. तळव्यांतून स्त्रवणाऱ्या चिकट पदार्थाच्या पृष्ठताणामुळे हे शक्य होते. संयुक्त डोळ्यांमुळे डोक न हलविता तिला कोणत्याही बाजूचे दृश्य सहज दिसते व म्हणून ती सहजगत्या पकडली जात नाही. मुखांगे चूषी असल्यामुळे ती अन्न द्रवरूपात शोषून घेत. खाद्यपदार्थ घनरूपात असेल, तर माशी आपल्या तोंडातील लाळेचा थेंब त्यावर सोडून त्याचे द्रावण तयार करते व मग ते शोषून घेते. मुखांगात विस्तार पावणारी शुंडा असते. या शुंडेचे टोक द्विखंडी असते व त्याच्या अधर भागावर पुष्कळ खाचा असतात. या खाचांतून अन्नाचे द्रावण एका ठिकाणी जमा केले जाते व तेथून ते ग्रसनीय (घशातील) पंपाने आहारनालात (अन्नमार्गात) घेतले जाते.

नरमादी संयोगानंतर मादी पांढऱ्या रंगाची, लांबट आकाराची अंडी उत्सर्ग द्रव्यात, शेणात, लिदीत किंवा सडणाऱ्या वनस्पतीत घालते. ही अंडी पुंजक्यानी घातली जातात. एका पुंजक्यात सु. १०० अंडी असतात. तीस दिवसांच्या अवधीत एक मादी सु. २,७०० अंडी घालू शकते. प्रत्येक अंडे ०·८–१·० मिमी. लांबीचे असते. अंड्यांची संख्या अन्नाचा पुरवठा व तापमान यांवरही अवलंबून असते. २४°–३५° से. या तापमानात सु. आठ तासांत अंड्यांतून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येतात व सु. २४–३६ तासांत डिंभाचे पहिले निर्मोचन (बाह्य आवरण गळून पडण्याची क्रिया) होते. नतंर आणखी दोनदा निर्मोचन होऊन चार ते पाच दिवसांत डिंभाची लांबी सु. १२ मिमी होते. हे डिंभ घाणीच्या बाहेर येऊन कोशावस्थेत जातात. कोश दाट तपकिरी रंगाचे असतात. थोड्याच दिवसांत पूर्ण वाढ झालेली माशी बाहेर पडते. सुरुवातीस तिचे पंख घड्या पडलेले असतात. पण थोड्याच वेळात ते सरळ होऊन माशी उडू लागते व पुन्हा नवीन जीवनचक्रास सुरुवात होते. एका वर्षात माशीच्या सु. बारा पिढ्या निर्माण होतात. माश्यांच्या प्रजोत्पत्तीबद्दल असे अनुमान आहे की, एका नरमादीपासून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत जर सर्व अंडी निषेचित (फलित) होऊन त्यापासून माश्या निर्माण झाल्या व या सर्व माश्या जिवंत राहिल्या, तर त्यांची संख्या १९ X १०१८ इतकी होईल पण प्रत्यक्षात असे घडत नाही. इतर कीटक व पशुपक्षी यांच्याकडून पुष्कळ माश्यांचा अंडी, डिंभ, कोश व प्रोढ या अवस्थांत संहार होतो आणि त्यांच्या संख्येवर नियंत्रण राहते.

माश्यांपासून माणसांना व जनावरांना फार उपसर्ग पोहोचतो. घाण पदार्थावरून उडून त्या उघड्या अन्नावर बसतात व अन्न दूषित करतात. माश्यांच्या पायांवर लक्षावधी सूक्ष्मजंतू असतात व एका खाद्यपदार्थावरून दुसऱ्या खाद्यपदार्थावर त्यांच्या उडण्यामुळे निरनिराळ्या खाद्यपदार्थात हे जंतू मिसळले जातात व त्यामुळे पटकी (कॉलरा) हगवण, आंत्रज्वर, (टायफाइड) वगैरेंसारख्या रोगांचा फैलाव होतो.माशी चावते असा एक समज आहे, पण हे खरे नाही. माशींची मुखांगे मऊ व चावण्यास योग्य अशी नाहीत. इतर काही माश्या[उदा., स्टेबल फ्लाय (तबेल्यात व गोठ्यात आढळणारी माशी)] चावतात म्हणून या साध्या माश्याही चावत असाव्यात असा समज आहे.

माश्यांचा उपद्रव टाळण्यासाठी घराभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. घरातील खाद्यपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जाळीपासून तयार केलेले माश्या मारण्यांचे साधन वापरून माश्या माराव्यात. डिंकासारखा चिकट पदार्थ लावून तयार केलेला कागद ठिकठिकाणी ठेवल्यास त्याला माश्या चिकटतात. नंतर या कागदाचा नाश करता येतो. सार्वजनिक संस्थानीही शहरात स्वच्छता राखण्याची दक्षता घ्यावी. कीटकनाशके वापरून माश्यांच्या अंड्यांवर व डिंभांचा नाश करावा. कीटकनाशकांचा फवारा मारून जमिनीवर किंवा भिंतीवर बसलेल्या माश्यांचा नाश करावा.

 

संदर्भ : 1. Imms, A. D. A General Textbook of Entomology, Bombay, 1961.

2. West, L. S. Housefly : Its Natural History, Medical Importance and Control, Ithaca, N. Y. 1951.

लेखक: पाटील ह. चिं. / इनामदार ना. भा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate