"वाय-बार' विकृतीसाठी करा वेळीच उपाययोजना
वाय-बार ही नागपूर संत्र्यामधील फळामध्ये येणारी शरीरशास्त्रीय विकृती आहे. यामध्ये फळांचा आकार लांब होत जातो.
कोणत्या बागेत ही समस्या आढळते?
- आंबिया बहरामध्ये (फुलधारणा फेब्रुवारी ते मार्च) ही समस्या आढळते.
- याच बागेत मृग बहराच्या काळात ही समस्या आढळत नाही.
वाय-बार मागील कारणे काय असावीत?
- फळांची वाढ व परिपक्वता काळामध्ये जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांशी ही विकृती संबंधित आहे. मृग बहरातील फळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वाढतात व परिपक्व होतात. हा कालावधी साधारणतः कोरडा असतो. आंबिया बहरातील फळे पावसाळ्यात, म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत वाढतात व परिपक्व होतात. त्यामुळे आंबिया बहरादरम्यान ही समस्या आढळून येते.
- जुलै ते ऑक्टोबर या काळात जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा असतो. परिणामी वनस्पतीवरील बाह्यवृद्धी----- होते. तसेच संजीवकाची असमतोल मात्रादेखील विकृतीचे कारण असू शकते.
- सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि अचलपूर तालुक्यांमध्ये जमिनी जास्त खोल आहेत. चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे. या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. या विभागामध्ये वाय- बार समस्या अधिक प्रमाणात दिसून आली आहे. पाण्याचा योग्य निचरा फायदेशीर ठरतो.
- हलकी जमीन व जेथे पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी वाय- बार विकृती आढळत नाही. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र परिसरातील जमीन हलकी, 1-2 फूट खोलीची, कमी चिकण माती असलेली, क्ले लोम प्रकाराची व पाण्याचा निचरा होणारी आहे. या परिसरातील संत्रा लागवडीला ठिबकद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी वाय-बार आढळला नाही. या विषयावर केंद्रामध्ये अधिक संशोधन सुरू आहे.
उपाययोजना
नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्राच्या वतीने शिफारस केलेल्या उपाययोजना खालील प्रमाणे :
- झाडांमध्ये हवा पुरेशी खेळती असावी.
- जुलै ते ऑक्टोबर या काळात मातीतील अतिरिक्त ओलावा कमी करण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा. पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी उताराला चर खोदावे (3 फूट रुंद आणि 3 फूट खोल).
- जमिनीतील तण वेळोवेळी काढून बाग स्वच्छ ठेवावी.
- फळगळ कमी करण्यासाठी आंबिया बहरात जिबरेलिक ऍसिड व 2-4-डी या संजीवकांच्या फवारण्या केल्या आहेत. अशा बागांमध्ये वाय-बार संत्रा जास्त दिसत असेल, तर 1-2 वर्षे या फवारण्या बंद कराव्यात.
डॉ. एम. एस. लदानिया, 0712-2500325
(राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.