पॉलिहाऊस किंवा ग्रीनहाऊस (हरितगृह) या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पूर्वी हरितगृहे लाकडी सांगाड्यावर आच्छादनासाठी काच वापरून उभी केली जात असत. आता प्लॅस्टिक तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणांमुळे काचेऐवजी प्लॅस्टिक वापरले जाते. काचेच्या तुलनेत पॉलिथिनचा वापर हा स्वस्त असल्याने पॉलिथिन आच्छादने लोकप्रिय झाली आहेत, त्यामुळे आता हरितगृहांना पॉलिहाऊस असेही म्हटले जाते.
हरितगृह हे सांगाड्यांच्या रचनेला पारदर्शक साहित्याने आच्छादित केले जाते, त्यामुळे हरितगृहातील पिकांचे वारा, पाऊस, किरणोत्सर्ग इत्यादींपासून संरक्षण होईल अशी रचना असते. सर्वसाधारणपणे फुले, भाज्या व फळे हरितगृहात घेतली जातात. संरक्षित वातावरणामध्ये पिकांच्या चांगल्या वाढीसाठी योग्य असे वातावरण तयार केले जाते. तसेच, रात्रीच्या वेळी पिकाने हवेत सोडलेला कार्बन- डाय- ऑक्साईड वायू हरितगृहात अडविला जातो, तोच सकाळी पिकांकडून शोषला जातो. त्यामुळे बाहेरील वातावरणापेक्षा हरितगृहामध्ये अधिक उत्पादन मिळते.
हरितगृहामध्ये प्रामुख्याने स्टीलचा सांगाडा, आच्छादन साहित्य, पाणी जाण्यासाठी गटार व वायुविजन यंत्रणा; तसेच हवामान नियंत्रण यंत्रणा बसविलेल्या असतात. आता आपण हरितगृहाची निर्मिती करण्यासाठी आवश्यक बाबींची, निकषांची माहिती घेऊ.
टनेल प्रकार,
मॅक्सिव्हेंट प्रकार,
सॉ टूथ (करवतीच्या दात्यांप्रमाणे) प्रकार,
गटर ओपनिंग
1) गॅल्व्हनाइज्ड स्टील (जी.आय. व काही भाग ऍल्युमिनिअमचे)
2) माइल्ड स्टील (एम.एस.) रचना.
3) लाकडी पॉलिहाऊस.
III) आच्छादनाच्या प्रकारावरून
1) लवचिक आच्छादन प्रकार (प्लॅस्टिक उदा. पॉलिहाऊस)
2) घट्ट/ ताठ (रिजिड) आच्छादन प्रकार (उदा. काच, एफआरपी शिट्स)
3) शेडहाऊस - शेडनेट.
आच्छादन साहित्याचे गुणविशेष
आच्छादनासाठी वापरावयाच्या साधनांमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक असते.
1) प्रकाश पारदर्शकता व प्रसारण :
आच्छादनाचा सर्वांत महत्त्वाचा गुणविशेष प्रकाशाचे प्रसारण करण्यासंदर्भात तपासला जातो. आच्छादनाने हरितगृहात सर्वाधिक उजेड प्रसारित करतानाच पिकासाठी हानिकारक ठरणाऱ्या घटकांना (अतिनील, अवरक्त किरणे) रोखले पाहिजे. सूर्यप्रकाशात विविध तरंग लांबीचे किरण असतात व त्यात मानवाला तसेच झाडांसाठी उपयुक्त असणारे किरण 400 ते 700 नॅनोमीटर या तरंगलांबीचे असतात. म्हणून हरितगृहासाठी वापरली जाणारी पॉलिथिन बनविताना ती केवळ प्रकाशसंश्लेषणासाठी लागणारे किरणच प्रसारित करेल अशी असावी लागते.
2) दीर्घकाळ टिकाऊ क्षमता
- फिल्मच्या पॉलिथिनवर सूर्यकिरणातील अतिनील किरणांचा परिणाम होतो. या घटकापासून संरक्षण करण्यासाठी फिल्ममध्ये काही विशिष्ट रसायने मिसळली जातात. या रसायनांमध्ये अतिनील किरण शोषून घेणारे किंवा अतिनील किरणांचे स्थिरीकरण करणारे घटक असतात. या रसायनामुळे पॉलिथिनच्या विघटनाचा वेग कमी करता येतो.
- टिकाऊपणास कारणीभूत असलेला दुसरा घटक म्हणजे त्याची जाडी. अधिक जाड फिल्म लवकर खराब होत नाही.
3) धुके प्रतिबंधकता
फिल्मवर काही धुके प्रतिबंधक घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक फिल्मवर साबणासारखे काम करतात, ज्यामुळे दवामुळे फिल्मवर साचलेले पाणी तिथेच टपकण्याऐवजी फिल्मवर पातळ थर निर्माण करतात, त्यामुळे पाणी ठिबकणेही थांबते.
4) धूळ प्रतिबंधक
हरितगृहाच्या फिल्म्सवर धूळ जमा होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते. हे होऊ नये, यासाठी विशिष्ट घटक वापरून फिल्म गुळगुळीत केली जाते, त्यामुळे फिल्मवर धूळ चिकटणे काही प्रमाणात कमी होते.
5) पाकळ्यांच्या काळपटपणास प्रतिकारकता
सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे काही लाल गुलाबांच्या जातीच्या पाकळ्या काळपट होतात. ही विकृती कमी करण्यासाठी अतिनील रोधक फिल्म्स वापरली जाते.
6) शैवाल प्रतिकारकता
पावसाळ्यात फिल्मवर शेवाळ तयार होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते, त्यावर शैवाल प्रतिकारक घटक वापरून हा त्रास कमी करता येतो.
हरितगृहाची देखभाल
- हरितगृहाची दारे, शेडनेटची चाके, रॅक्समोटर व गिअर असेंब्ली भागांना महिन्यातून एकदा ग्रिसिंग (वंगण) करणे आवश्यक आहे.
- बाजूच्या व्हेंट्ची हॅंडल्स ः कडेच्या व्हेंट्समध्ये त्यांच्या हॅंडल्सना महिन्यातून एकदा वंगण करावे, यामुळे व्हेटच्या उघडझापीला कमी दाब लागतो.
- वरील प्लॅस्टिकची स्वच्छता - प्लॅस्टिकवर धुळीचे कण जमा झाल्यास प्रकाशाचे प्रसारण सुमारे 15 टक्क्यांनी कमी होते. जास्त प्रकाश प्रसारित होण्यासाठी प्लॅस्टिकचे वरील आच्छादन योग्य वेळी साफ करणे आवश्यक आहे.
- डिस्टेंपर किंवा चॉकचा वापर - विशेषतः उन्हाळ्यात उष्ण हवामानात हरितगृहातील तापमान किंवा प्रकाशाची तीव्रता कमी करण्यास चॉक/ डिस्टेंपरचा वापर करावा लागतो.
- एम. एस. पॉलिहाऊसमध्ये दोन वर्षांतून एकदा चंदेरी रंग लावल्यास गंजणे थांबते.
रवींद्र देशमुख, 9822499265 - 02114 - 223980
(लेखक हॉर्टिकल्चरल ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, जि. पुणे येथे व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन- ऍग्रो व्हिजन
अंतिम सुधारित : 4/27/2020
दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी हरितगृहातील शेती फायद...
हवामानात विविधता असल्याने वेगवेगळया फुलांची लागवड ...
खूप महागाचे सामान वापरून ग्रीनहाउस तयार करणे भारती...
तारगाव (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील दिलीप बाबास...