पारंपरिक शेतकरीही आपल्या शेतीत सुधारणा करत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी नियंत्रित शेती (हरितगृहातील शेती) फायद्याची ठरते. या नियंत्रित शेतीची तत्त्वे जाणून घेत शेतकऱ्यांनी त्याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. या विषयाची परिपूर्ण शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आपण हे सदर सुरू करत आहोत.
बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पद्धतीने होत असलेल्या शेतीमध्ये सुधारणा करत प्रगतीकडे वाटचाल करत आहेत. त्यामध्ये उपलब्ध सिंचनाच्या सोयीनुसार प्रत्येक हंगामातील पिके घेतली जातात. पाणी उपलब्धता कमी असल्यास फळबागेतून अधिक चांगल्या प्रकारचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. कोरडवाहू पिकामध्येही बीज प्रक्रियेपासून काढणीपर्यंत सुधारित तंत्राचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचा अनुभव घेत आहेत. त्यातही काही ठिकाणी बीजोत्पादनासाठी शेडनेटचा वापर वाढत आहे. शेडनेट किंवा हरितगृह या आधुनिक तंत्रज्ञानातून चांगल्या दर्जाचे व अधिक उत्पादन मिळू शकते.
या तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे काही प्रश्न पडू शकतात. त्या अनुषंगाने आपण माहिती पाहू.
1) हरितगृह म्हणजे काय?
2) हरितगृह व पारंपरिक शेती यांमधील फरक
3) हरितगृहाचा उपयोग
4) हरितगृहामध्ये कोणती पिके घेतली जातात?
5) हरितगृह करताना खालील मुद्दे विचारात घ्यावेत.
हरितगृह म्हणजे काय?
- सांगाड्यावरती (लाकडी व लोखंडी) पारदर्शक आच्छादन टाकून आतमध्ये वातावरण नियंत्रित किंवा अनियंत्रित केले जाते यास हरितगृह म्हणतात.
- ग्रीनहाऊस (हरितगृह) व पॉलिहाऊस या दोन्ही गोष्टी एकच आहेत.
- हरितगृह उभारताना पूर्वी लाकडाचा वापर होत होता, पण अलीकडच्या काळामध्ये लवकर न गंजणारे जीआय (GI) पाइप वापरतात, त्यावर पॉलिथिन फिल्म बसविली जाते. या सांगाड्याच्या आतील वातावरण बाह्य वातावरणापासून वेगळे होते. आतील वातावरण विविध घटकांच्या साह्याने नियंत्रित केले जाते.
- हरितगृहामध्ये वातावरणातील पाच प्रमुख घटक नियंत्रित केले जातात.
अ) सूर्यप्रकाश - साधारण 50,000 ते 60,000 लक्सपर्यंत सूर्यप्रकाश हरितगृहामध्ये येऊ दिला जातो. त्यासाठी योग्य आकाराच्या सावलीच्या जाळ्याचा वापर केला जातो. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणे योग्य प्रकारची पॉली फिल्म वापरून रोखली किंवा नियंत्रित केली जातात. त्यामुळे वनस्पतीची योग्य वाढ होते.
ब) तापमान - दिवसा 24 ते 28 अंश सेल्सिअस व रात्री 15 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हरितगृहामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा तापमानाला वनस्पतीची चांगली वाढ होते.
क) कार्बन-डाय- ऑक्साईड 800 ते 1200 पीपीएम हरितगृहामध्ये अडविला जातो. हे प्रमाण बाहेरील वातावरणापेक्षा तीन ते चार पट जास्त असते. त्यामुळे वनस्पतीमध्ये अन्ननिर्मिती चांगल्या प्रकारे होऊन वनस्पतीची वाढ जोमाने होते.
ड) आर्द्रता - सर्वसाधारणपणे दिवसा 60 ते 70 टक्के व रात्री 70 ते 80 टक्के आर्द्रता हरितगृहामध्ये नियंत्रित केली जाते. त्यामुळे वनस्पतीची वाढ चांगली होते. वनस्पतीची रोग व किडीपासून बचाव होतो.
इ) वायुविजन - हरितगृहामध्ये 8 ते 10 टक्के वायुविजन होईल, अशा पद्धतीने वरची खिडकी व बाजूच्या खिडक्यांचे साइडचे पडदे उघडझाप केले जातात. त्यामुळे हरितगृहामध्ये हवा खेळती राहते.
हरितगृहामध्ये वातावरणातील घटक नियंत्रित केले जात असल्यामुळे पिकाची उत्पादन व गुणवत्ता चांगली मिळते.
हरितगृह व पारंपरिक शेती यामध्ये फरक -
हरितगृह पारंपरिक शेती
1) हरितगृहामध्ये योग्य वातावरण नियंत्रित करता येते. 1) पारंपरिक शेतीमध्ये वातावरण नियंत्रित करता येत नाही.
2) वनस्पतीचे प्रखर सूर्यप्रकाश, पाऊस, गारपीट यापासून संरक्षण करता येते. 2) वनस्पतीचे पाऊस, गारपीट, वारा संरक्षण करता येत नाही.
3) वनस्पतीचे रोग व कीड यापासून संरक्षण करणे सुलभ होते. 3) वनस्पतीचे रोग व कीड नियंत्रित करण्यामध्ये अडचणी येतात.
4) मनुष्यबळ कमी लागते. 4) मनुष्यबळ जास्त लागते.
5) कमी क्षेत्रात व हंगाम नसतानाही उत्पादन घेणे शक्य आहे. काही पिकांचे वर्षभर उत्पादन घेता येते. 5) क्षेत्र अधिक असूनही हंगाम नसताना उत्पादन घेता येत नाही.
6) हरितगृहामध्ये उत्पादन चार ते पाचपट जास्त येते. गुणवत्ता चांगली असते. 6) उत्पादन कमी मिळते. गुणवत्ता ही वातावरणावर अवलंबून असल्याने चांगली राहीलच याची शाश्वती नसते.
7) हरितगृहाच्या उभारणीसाठी प्रारंभी अधिक खर्च येतो. अधिक भांडवलामुळे लोक या शेतीकडे वळत नसले तरी कमी क्षेत्रातूनही अधिक उत्पादन मिळत असल्याने खर्च वसूल होऊ शकतो. 7) पारंपरिक शेती कमी खर्चिक असली तरी केलेला खर्च वसूल होईलच, याची खात्री नसत. दर्जेदार उत्पादन नसल्याने नफ्याचे प्रमाण कमी राहते.
हरितगृहाचा उपयोग -
हरितगृहाचा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो.
अ) पिकांचे (फुले, भाजीपाला, फळे) उत्पादन घेण्यासाठी होतो.
ब) भाजीपाला व शोभिवंत रोपांची रोपवाटिका करण्यासाठी होतो.
क) उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करण्यासाठी होतो.
ड) भाजीपाला पिकांच्या जाती व बीज उत्पादन घेण्यासाठी होतो.
इ) पिकांचे संशोधन व विकास करण्यासाठी होतो.
हरितगृहामध्ये कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जाते.
हरितगृहामध्ये खालील पिकांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते.
अ) फुलपिके : हरितगृहामध्ये प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले जातात. त्यात गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, लिलीनियम, शेवंती यांसारख्या फुलांचा समावेश असतो.
ब) भाजीपाला : रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळी इ.
क) पालेभाज्या : कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी इ.
ड) परदेशी भाजीपाला : ब्रोकोली, झुकेनि, लॅट्युस, लिक, पार्सेली इ.
इ) औषधी पिके : हळद, आले, चिवस, मीट, बसीगिल इ.
ई) फळे : स्ट्रॉबेरी, टरबूज इ.
व्यापारी तत्त्वावर हरितगृह प्रकल्प करताना खालील मुद्दे विचारात घ्यावेत.
अ) हरितगृहाचा प्रकार, ब) जागा, क) त्या भागातील आर्द्रता, ड) पिके
अ) हरितगृहाचा प्रकार
हरितगृहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण कोणती पिके घेतो व आपल्या भागात किती पाऊस पडतो, यावर हरितगृहाचा प्रकार निश्चित करता येतो. जास्त पाऊस असलेल्या भागांमध्ये पॉलिहाऊस व कमी पावसाच्या ठिकाणी शेडहाऊस करणे सोईस्कर असते.
ब) हरितगृहासाठी लागणारी जागा.
व्यापारी तत्त्वावर हरितगृहाचा प्रकल्प करताना कमीत कमी 10 गुंठे (1000 वर्गमीटर) जागा असली पाहिजे व जास्तीत जास्त एक एकर/ प्रति युनिट हरितगृह प्रकल्प असावा.
क) आर्द्रता -
हरितगृहाचा प्रकल्प करताना त्या भागातील आर्द्रता वर्षभर कशी आहे, याचा अभ्यास करावा. आपल्या भागातील आर्द्रतेनुसार हरितगृहाचे योग्य प्रकार व पिके घ्यावीत. उदा. कोकणामध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे कार्नेशन पिकामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते योग्यप्रकारे येत नाही. खर्चामध्ये वाढ होते. पर्यायाने ते पीक आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आपल्या प्रदेशातील वातावरणानुसार पिके घ्यावीत. उदा. ऑर्किड, अँथुरियम.
ड) पिके -
हरितगृहामध्ये पिके घेताना बाहेरील वातावरणामध्ये येणारी पिके घेऊ नयेत. ज्या पिकांना योग्य वातावरण लागेल, अशीच पिके (फुले व भाजीपाला) घ्यावीत, म्हणजे आपणास चांगले उत्पादन व नफा अधिक मिळेल. कोणत्या पिकाला बाजारात चांगली मागणी आहे, तसेच मागील वर्षी कोणत्या पिकाला मागणी होती व पुढील वर्षी कशी मागणी राहील, याचा विचार करून पिकाची निवड करण्यात यावी.
- फुले, पिके व भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी पॉलिहाऊसचा सोईस्कर ठरते. भाजीपाला पिकासाठी शेडहाऊसचा वापर योग्य होतो.
प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कोठे मिळेल?
राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर,
तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
फोन - 02114 -223980
फॅक्स - 02114-226087
संपर्क - रवींद्र देशमुख, 9822499265
(लेखक हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर या संस्थेमध्ये कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन