पारंपरिक पद्धतीमध्ये पेरणीचे काम दुफन, तिफन किंवा दोन चाडी तिफनीने करतात. त्याऐवजी केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद (CRIDA) यांनी विकसित केलेल्या बैलचलित, तसेच ट्रॅक्टरचलित "क्रिडा' टोकणयंत्राचा वापर केल्यास उत्पादनखर्चामध्ये बचत होऊन उत्पादनवाढीसाठी मदत होते.
पारंपारिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी
- मजुराच्या साह्याने बियाणे पेरणी केल्यामुळे पेरणी क्षेत्रावर बियाणाचे असमान वाटप
- दोन ओळींतील बियाणाचे प्रमाण किंवा दोन बियाणांतील अंतर कमी जास्त
- बियाणाची उगवण दाट किंवा विरळ
- पेरणीच्या खोलीवर नियंत्रण ठेवता येत नाही
- बियाणाची असमान उगवण. विशेषतः खरीप हंगामामध्ये पाऊस पडल्यामुळे बियाणावर अधिक माती पडते व त्याचा बियाणाच्या उगवणीवर विपरीत परिणाम होतो.
- खत व बियाणाच्या पेरणीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन मजूर लागतात. आंतरपीक उदा. सोयाबीन + तूर घ्यावयाची असेल तर तीन मजूर लागतात.
- यामध्ये शेतकऱ्यांचा मजुरी व बियाणांवर अधिक खर्च होतो
या पारंपरिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी लक्षात घेऊन केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद (CRIDA) यांनी बैलचलित तसेच ट्रॅक्टरचलित क्रीडा टोकणयंत्र विकसित केलेले आहे.
बैलचलित "क्रिडा टोकणयंत्र'
- हे बैलचलित बहुपीक टोकण यंत्र आहे. हे यंत्र दोन, तीन किंवा चार फणांमध्ये उपलब्ध आहे. हे यंत्र सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, हरभरा, बाजरी, मका, भुईमूग, वाटाणा, गहू, कांदा इ. पिकाच्या पेरणीसाठी शिफारस केलेले आहे.
- या यंत्रामध्ये बीज व खत पेटी, गती देणारी यंत्रणा व चाके, फण, बियाणे व खताच्या तबकड्या, बियाणे नळ्या हे मुख्य भाग आहेत. हे सर्व भाग मुख्य सांगाड्यावर बसविलेले आहेत.
- यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बीज व खतपेटी दिलेली आहे. या यंत्राच्या प्रत्येक फणासाठी बीजपेटीत स्वतंत्र कप्पा दिलेला असल्यामुळे आंतरपीक पेरणी करता येते. तसेच प्रतिएकरी आवश्यकतेप्रमाणे 50-200 कि.ग्रॅ. खतपेरणी करता येते. या पेटीतील तबकड्यांना जमिनीवर चालणाऱ्या दातेरी चाकाद्वारा गती दिली जाते. जमिनीवर चालणाऱ्या चाकाची एक फेरी पूर्ण झाली असता, बियाणे तबकडीची एक फेरी पूर्ण होते. तसेच खोली नियंत्रित करणारी चाके दोन्ही बाजूंना चाके दिली आहेत. त्यामुळे पेरणीची खोली 5 ते 15 सें.मी. दरम्यान कमी-जास्त करता येते.
अंदाजे किंमत - रु. 18000/-.
तक्ता - compose/ 14-03-2014/agr.indd (3)
विविध पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त बियाणे तबकड्यांची संरचना
ट्रॅक्टरचलित क्रिडा टोकण यंत्र
या यंत्राची संरचना बैलचलित "क्रिडा' टोकण यंत्राप्रमाणेच आहे. यामध्ये बी व खताच्या पेटीचा आकार वाढविलेला आहे. तसेच फणाच्या संख्येनुसार बी व खतपेटीची संख्या आहे. आवश्यकतेनुसार दोन फणांतील अंतर कमी-जास्त करता येते. हे यंत्र 6, 7 व 9 फण अशा प्रकारात उपलब्ध असून, एकाच वेळी अनुक्रमे 6 ते 9 ओळी पेरता येतात. या यंत्राने एका दिवसात 8 ते 10 एकर क्षेत्रावर पेरणी करता येते.
यामुळे साधारणतः 15 ते 20 टक्के बियाण्याची बचत होते. वेळेत पेरणी पूर्ण होते. अंदाजे किंमत - रु. 40,000/-.
"क्रिडा' टोकणयंत्राची संक्षिप्त वैशिष्ट्ये
हे यंत्र सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, हरभरा, बाजरी, मका, भुईमूग, वाटाणा, गहू, कांदा, गवारगम इ. पिकांच्या टोकण पद्धतीने पेरणीसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या तबकड्या असून, त्या सहजपणे बदलता येतात.
- प्रत्येक ओळीसाठी फण असल्यामुळे बियाणे व खत योग्यप्रकारे पेरता येते.
- दोन फणांतील अंतर आवश्यकतेनुसार बदलता येते व यामध्ये 9 ते 18 इंचांपर्यंत पिकाच्या शिफारशीनुसार दोन ओळींतील अंतर मिळते.
- दातेरी चाकावर बसविलेली तरफ शेताच्या कडेला वळताना बी व खत बंद करते, त्यामुळे बी व खतपेरणी बंद होते.
- हे यंत्र चालविण्यासाठी फक्त एक मजूर लागतो
"क्रिडा" टोकण यंत्राचे फायदे
पारंपरिक पेरणीशी तुलना करता, या यंत्राचा वापर केल्यामुळे
- योग्य खोलीवर बियाणे व खत एकाच वेळी पेरणी करता येते.
- 25 ते 30 टक्के वेळेची, 06-20 टक्के बियाणाची व 56-68 टक्के मजुरीची बचत होते.
- एकूण पेरणीच्या खर्चात 30-50 टक्के बचत होते.
- पीक उत्पादनात 5 ते 20 टक्के वाढ होते.
- आंतरपीकसुद्धा (उदा. सोयाबीन + तूर - 4-2/2-1) घेता येते.
- देखभाल-दुरुस्तीचा खर्च नगण्य.
ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा टोकण यंत्र
"क्रिडा' ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राच्या सांगाड्यावरील फणांची संख्या कमी करून, त्यावर सरी पाडण्यासाठी दोन रिजर बसवून हे यंत्र विकसित केलेले आहे. हे ट्रॅक्टरचलित चार फणी टोकण यंत्र आहे. हे यंत्र सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, उडीद, मूग, हरभरा, भुईमूग, बाजरी, वाटाणा, गहू, कांदा, गवारगम इ. पिकासाठी उपयुक्त आहे. या यंत्राच्या बीज व खतपेटीची संरचना क्रिडा टोकण यंत्राप्रमाणेच आहे. यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूंना सरी यंत्र (रिजर) जोडलेले आहे. त्यामुळे पेरणी करताना प्रत्येक चार ओळीनंतर एक सरी तयार होते. कमी-अधिक पावसाच्या कालावधीत पेरणीची रुंद सरी वरंबा पद्धत उपयुक्त आहे
या पद्धतीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत
अधिक पाऊस पडल्यानंतर पावसाच्या पाण्याचा सरीद्वारा जलद निचरा होतो.
- पावसाच्या पाण्याचे सरीमध्ये संवर्धन होते.
- सरीद्वारा पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
- सरीमुळे माती भुसभुशीत राहते.
- खुरपणी व यांत्रिक पद्धतीने कापणीसाठी सुलभ
बैलचलित "क्रिडा" टोकण यंत्राचे अर्थशास्त्र
"क्रिडा' टोकण यंत्र वापरत असलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव व कृषी विज्ञान केंद्र, लातूर अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रक्षेत्र चाचणीच्या निष्कर्षानुसार, "क्रिडा' टोकणयंत्राचे अर्थशास्त्र पुढीलप्रमाणे मांडता येईल. सोयाबीन, तूर, हरभरा व गहू या पिकांची पेरणी व त्यासंबंधीची अर्थशास्त्रीय माहिती पुढीलप्रमाणे आहे.
तक्ता - compose/ 14-03-2014/agr.indd
अनु. क्र. विवरण बैलचलित "क्रिडा' टोकण यंत्र पारंपरिक तिफन बचत/ फायदा
एकक रक्कम रु.
1) कार्यक्षमता, हेक्टर/ दिवस 2.0 1.50 25% -
2) पेरणीसाठी मजूर संख्या 01 02/03 01/02 मजूर 150/200
3) मजूर-तास/ हेक्टर 04 11/16.5 7/12.5 मजूर तास 150/300
4) बियाणे कि.ग्रॅ/ हेक्टर 48 54 12.5% 200
5) पेरणी खर्च, रु./ हेक्टर 200 350/400 40/50% 150/200
6) पीक उत्पादन, क्विंटल/ हेक्टर 19 16 15% 8400
सोयाबीन, तूर, हरभरा व गहू पेरणीमध्ये हेक्टरी होणारी बचत व उत्पन्नवाढ 8800
संपर्क - प्रा. सचिन कवडे, 9604444733
(लेखक मांजरा, कृषी विज्ञान केंद्र, चिंचोलीराववाडी, लातूर येथे विषय विशेषज्ञ- कृषी अभियांत्रिकी आहेत.)
-----------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन