অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उसशेतीसाठी कृषीयंत्रे

उसशेतीसाठी कृषीयंत्रे

ऊस हे आपले प्रमुख नगदी पिक असून करार शेती असल्याने आपली जबाबदारी फक्त कमी खर्चात एकरी जास्तीत जास्त ८० ते १०० टन उत्पादन काढणे एवढीच आहे, पण असे घडत नाही. केवळ चुकीच्या व्यवस्थापनामुळे एकरी खर्चही जास्त होतो आणि एकरी टनेजही अतिशय कमी मिळते.

ऊसशेतीत खर्चाच्या बाबी पुष्कळशा आहेत. त्यातली प्रमुख बाब म्हणजे मजुरीचा खर्च. ऊस लागवडीपासून ते ऊस तोडणीपर्यंत प्रत्येक काम मजुराकरवी जास्त मजुरीत करावे लागते. म्हणून याला पर्याय म्हणून संशोधकांनी ऊस लागवणी यंत्र, ऊसतोडणी यंत्र, ऊसाच्या पाचटाचे तुकडे करणारे यंत्र. शिवाय अंतर मशागतीसाठीची यंत्रही शोधून काढली आहेत.

ऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ४० ते ४५ टक्के खर्च होतो. याला फाटा देण्यासाठी नवीन औजार यंत्राचा वापर केल्यास मशागतीवरचा २५ ते ३० टक्के खर्च कमी करून १२ ते १५ टक्के टनेजमध्ये वाढ होते. म्हणून ऊस शेतीत या यंत्राचा वापर हा करायलाच हवा. आणखी दुसरे म्हणजे बैलांचा आणि शेतमजुरांचा तुटवडा असून, खर्च मोठ्या प्रमाणात होतो. तो कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण केलेच पाहिजे.

ऊस शेतीसाठी अनेक औजारे आणि यंत्रे उपयोगी आहेत. त्यामध्ये ऊस लागवनी यंत्र (प्लांटर) अतिशय उपयुक्त असते. हा प्लांटर ४५ अश्वशक्तीचा ट्रक्टरचलीत आहे. या प्लांटरने दिवसात ५-६ एकर ऊस लागवड करता येते. मजुराकरवी मळ्यातले बेणे तोडून वाडे खांडून पाचट साळून प्लांटरला फक्त पुरवावे लागते. बेणेप्रक्रिया खत घालणे, बेण्याच्या पाहिजे तशा टिपऱ्या करून कोरडी लागण करणे ही सर्व कामे प्लांटरने चांगल्या पद्धतीने करता येतात. ऊस उगवनीचे अनुभव अतिशय चांगले आहेत. ड्रायव्हरसह ४ ते ५ मजुरात दिवसाला ५ ते ६ एकर ऊस लागण प्लांटरने होऊ शकल्याने केवळ मजुरीत ६० टक्के बचत होते आणि कमी कालावधीत हंगामात वेळेवर लागण करणे शक्य होते.

दुसरे यंत्र आहे ऊसतोडणी यंत्र (हार्वेस्टर). दिवसेंदिवस ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. नव्हे हा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ ऊसतोडणीमुळे उसाचे गाळप होऊ शकलेले नाही. असे दरवर्षीच घडत असते. शिवाय खर्च अमाप होतो. वेळ लागतो. यासाठी उसाची वेळेवर तोडणी होऊन गाळप होण्यासाठी हार्वेस्टरचा चांगला उपयोग होतो. या "चापर" हार्वेस्टरमुळे ऊस जमिनीलगत योग्य प्रकारे तोडला जातो.

लोळलेला ऊससुद्धा या चापर हार्वेस्टरमुळे चांगल्या प्रकारे तोडला जातो. ताशी २५ ते ३० टन ऊस तोडला जातो. मजुराकरवी तोडणीच्या खर्चापेक्षा निम्म्याने खर्च कमी येतो. तोडणी जलद गतीने होत असल्याने कारखान्यांना क्षमतेएवढा सतत ऊस पुरविणेशक्य होते. त्यामुळे येथून पुढे ऊस शेतीत ऊसतोडणीसाठी चापर हार्वेस्टरचा वापर अनिवार्य आहे.

ऊसाचा पाचटीचे व्यवस्थापन खर्चिक आणि किचकट काम असल्याने प्रत्येक जन सरसकट पाचट जाळून मौल्यवान सेंद्रिय पदार्थांची राख करतात. म्हणजे आपणच आपल्या शेतीला तिनेच दिलेले खत हिरावून घेतो. ही एक प्रकारची गद्दारीच म्हणावी लागेल. आपल्या संशोधकांनी याच्यावर संशोधन करून ट्रक्टर चलीत पाचटीचे तुकडे करणारे यंत्र शोधून काढले आहे. अगदी थोडक्या वेळेत एकरात ४ ते ५ टन पाचटाचे बारीक तुकडे करून मातीत मिसळण्याचे महान काम या यंत्राद्वारे केले जाते. शिवाय ऊस खोडव्यांच्या बुडक्या तोडण्याचे कामही वाचते. खोडवा चांगला फुटतो. आता हे यंत्र उपलब्द्ध आहे. याचा वापर करून मौल्यवान पाचट पुन्हा तुकड्याचा रूपाने त्याच जमिनीला द्या.

या यंत्र शिवाय ऊस शेतीसाठी सबस्वायलर, आंतरमशागतीची म्हणजे चाळणी - बांधणीची औजारे बैलचलीत, ट्रक्टरचलीत, आणि पावरट्रेलर चलीत आहेत. त्याचा वापर जरूर करावा.

एकंदरीत मजूर आणि मजुरी खर्चात बचत करण्यासाठी, वेळेवर काम होण्यासाठी, दर्जेदार होण्यासाठी, आणि उत्पादन वाढीसाठी या यंत्रे अगर औजारांचे महत्व ओळखून त्यांचा जरूर वापर करून फायदा करून घ्यावा.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: कृषी प्रवचने: लेखक: प्रल्हाद यादव. प्रथम आवृत्ती. जानेवारी- २०१२, विमल प्रकाशन, पुणे© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate