অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जमिन मशागत - सबसॉयलर

हार्ड पॅन व जमिनीखालचा अच्छिद्र भाग फोडून जमिनीत हवा खेळती ठेवणे, तसेच जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी तसेच जादाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सबसॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो. शेतीमध्ये नांगराचा सलग व सतत काही वर्षे वापर केल्यास; तसेच शेतीतील इतर कामांकरिता अवजड ट्रॅक्‍टर्स किंवा अवजड अवजारांच्या सततच्या वापराने जमिनीखाली कठीण भाग निर्माण होतो त्यालाच "हार्ड पॅन' असे म्हटले जाते. या तयार होणाऱ्या हार्ड पॅनमुळे जमिनीतील हवेचे प्रमाण कमी होते; तसेच जमिनीत पाणी साठून राहते, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. या सर्वांचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होताना आढळतो.

सबसॉयलरची रचना

सबसॉयलर हे दोन प्रकारचे असतात. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे एका मांडीचा सबसॉयलर आणि दुसरा प्रकार म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर. यापैकी एका मांडीचा सबसॉयलर अधिक खोलीवर वापरला जाता, तर थोड्याशा उथळ खोलीवर वापरासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्‍टरच्या थ्री पॉइंट लिंकेजला जोडून वापरण्यासारखा असतो.
सबसॉयलरचे मुख्य तीन भाग असतात. पहिला भाग म्हणजे सबसॉयलरची "मांडी'. ही मांडी सरळ किंवा वक्राकार असू शकते. याची पुढील कडा धारदार बनविलेली असते, जेणेकरून जमिनीचा (हार्ड पॅनचा) काप घेताना सबसॉयलर ओढण्यास लागणारी शक्ती कमी लागेल; तसेच मांडीवर काही ठराविक अंतरावर नट-बोल्ट बसविण्यासाठी छिद्रे पाडलेली असतात. त्यामुळे सबसॉयलरची खोली कमी किंवा जादा करता येते. दुसरा प्रमुख भाग म्हणजे "फ्रेम' होय. सबसॉयलरची मांडी फ्रेमला जोडलेली असते. हा सबसॉयलर ट्रॅक्‍टरने वापरता यावा यासाठी थ्री पॉइंटला जोडता यावा अशी भक्कम स्वरूपाची फ्रेम असते. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सबसॉयलरचा "दात'. दात हा मांडीच्या खालच्या टोकास जोडलेला असतो. काही सबसॉयलरमध्ये हा दात झिजल्यानंतर बदलण्याची सोयही असते.

सबसॉयलरचा वापर

हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉयलर वापरताना जर जमीन कठीण व कोरडी असेल तर उत्कृष्ट प्रकारचे परिणाम दिसतात. कारण जमीन कोरडी व कठीण असल्याने हार्ड पॅनला जेव्हा सबसॉयलरची मांडी भेदते, त्या वेळी त्याला तडे जाऊन चांगल्याप्रकारे हार्ड पॅन सुटा होतो. याउलट जर सबसॉयलरच्या वापरावेळी जमीन ओलसर असल्यास हार्ड पॅनला तडे न जाता फक्त एक मोठी भेग पडेल व ती फारशी परिणामकारक असणार नाही.

सबसॉयलर वापराचे तंत्र

हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर करीत असताना ज्या दिशेने नंतर शेताची नांगरट करण्याचे योजिले आहे, त्या दिशेशी काटकोनात असलेल्या दिशेने सबसॉयलर वापरावा. सबसॉयलर ट्रॅक्‍टरच्या मागील बाजूस मधोमध जोडावा, त्यामुळे अवजारावर येणारा बाजूचा दाब (साइड ड्राफ्ट) येणार नाही. सामान्यतः चार फूट अंतरावर सबसॉयलर वापरावा, जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर दोन फुटांपर्यंत ठेवावे. सबसॉयलर जमिनीत घुसण्यास सुलभ होण्यासाठी काही वेळेस सबसॉयलरचा दात थोडासा तिरकस बसविलेला असतो. सबसॉयलिंग करीत असताना पुढील चाकांच्या ट्रॅक रुंदीच्या अंदाजावरून सबसॉयलिंगचे अंतर ठरवावे. पुढील आणि मागील चाकांना लावलेल्या वजनांमुळे चाकांची घसरण कमी होऊन ट्रॅक्‍टरची ओढण क्षमता सुधारते.

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate