कीडनाशक सापळ्यांचा मुख्य उपयोग शत्रुकीटकांना आकर्षित करून त्यांचे नियंत्रण करणे हाच आहे. यामुळे किडीची पुढील पैदास रोखली जाऊन पिकाचे नुकसान कमी करणे शक्य होते. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अशा प्रकारचे सापळे तयार करून ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. त्याच पद्धतीने मात्र कमी खर्चात सापळे तयार करण्याचे काम औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळखुंटा येथील शेतीनिष्ठ शेतकरी विष्णू घोडके यांनी केले आहे. त्यांचा वापर डाळिंबासाठी केला आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून त्यांचा वापर ते सतत करीत आहेत. औरंगाबाद तालुक्यातील व आसपासच्या गावांतील बहुतांशी शेतकरी डाळिंब व भाजीपाला पिकांसाठी त्यांचा वापर करू लागले आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने व सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांतून हे सापळे तयार झाले आहेत. प्रति सापळा आठ ते दहा रुपयांपेक्षा जास्त खर्च येत नाही. प्लॅस्टिकचे किंवा कीडनाशकांचे डबे बहुतेक शेतकऱ्यांकडे असतातच, त्यांचाच उपयोग या सापळ्यांसाठी करून डब्यांवर होणारा खर्च वाचविता येतो.
सापळे तयार करण्याची पद्धत
1) सर्वप्रथम विविध आकारांचे प्लॅस्टिकचे डबे अथवा कीडनाशकाचे रिकामे डबे घेऊन त्यास मधोमध आरपार छिद्र पाडावे. डब्याच्या झाकणाला तार जाईल एवढेच ते छिद्र असावे.
2) झाकणाच्या छिद्रातून तार घालून त्यात कापसाचा बोळा लावावा.
4) डब्यात 200 मि.लि. पाणी टाकून त्यात एक मि.लि. डायक्लोरव्हॉस कीटकनाशक टाकावे.
5) कापसाचा बोळा व डायक्लोरव्हॉस मिश्रित पाण्यात अंतर असावे.
6) कापसाच्या बोळ्याला मक्षीकारी किंवा मिथिल युजेनॉल हे गंध प्रलोभन लावावे. याकडे नर पतंग आकर्षित होतात व खालील कीडनाशकमिश्रित पाण्यात पडून मरतात.
7) एकरी आठ ते दहा सापळे लावावेत.
8) प्रत्येक आठवड्यानंतर प्रलोभन व कीडनाशकमिश्रित पाणी बदलावे.
यामध्ये कीडनाशक व प्रलोभनासाठीच खर्च येतो. एरवी हा सापळा खरेदी करण्यासाठी 300 ते 350 रुपये लागतात. डबे विकत आणून जरी घरी सापळे तयार केले तरी 35 ते 40 सापळे तेवढ्याच खर्चात तयार करता येऊ शकतील. त्यांचा वापर एकरी दहा सापळे याप्रमाणे चार एकर क्षेत्रासाठी करता येईल.
शेतकऱ्यांच्या निरीक्षणातून व गरजेतून अशा प्रकारचे सापळे अतिशय सोप्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत.
काही शेतकऱ्यांचे अनुभव
1) दादासाहेब चौधरी, दुधड
करमाडच्या किराणा दुकानातून चॉकलेट व गोळ्यांचे रिकामे डबे आणले. 200 रुपयांत 30 डबे मिळाले. त्यांचा वापर करून घरीच कीडनाशक सापळे तयार केले. तीन एकर डाळिंबात लावले. खर्च आला 450 रुपये व तयार झाले 30 सापळे. म्हणजे प्रलोभन मक्षीकारी व कीडनाशक आणि सापळे एवढ्याचा प्रति सापळा खर्च आला तो फक्त 15 रुपये. म्हणजेच प्रति सापळा 285 ते 335 रुपये बचत झाली.
2) नारायण चौधरी, दुधड -
चार एकर डाळिंब आहे. फळ पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागताच कीडनाशकाच्या रिकाम्या डब्यांपासून सापळे तयार केले. एकरी 15 सापळे लावले. खर्च आला फक्त 100 रुपये. खर्चात बचत म्हणजे उत्पन्नात वाढ होय. (मुख्य रस्त्यावरच शेत असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग पाहून जातात व त्याचा अवलंब करतात. ]
3) बळिराम काळे, भांबर्डा -
कृषी विभागाने घेतलेल्या शेतीशाळेच्या माध्यमातून या कमी खर्चाच्या सापळ्यांची माहिती झाली. किडीचा प्रादुर्भाव येण्याआधीच प्रति एकरी 12 सापळे लावले. चांगला परिणाम जाणवला.
विष्णू घोडके यांनी केलेला सापळ्यांचा प्रयोग कृषी विभागाने सर्वत्र पसरविला. त्यांच्या वापराने शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन खर्चात बचत झाली. आज डाळिंबाव्यतिरिक्त भाजीपाला पिकांसाठीही शेतकरी अशाच प्रकारच्या सापळ्यांचा उपयोग करीत आहेत. शेतीशाळेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशा प्रकारचे सापळे बनविण्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे दाखवून देण्यात आले.
- अशोक कोंडे, तालुका कृषी अधिकारी, औरंगाबाद
(लेखक औरंगाबाद जिल्हा कृषी विभागात कार्यरत आहेत.)
संपर्क - विष्णू घोडके
प्रदीप अजमेरा, 9423786954
माहिती संदर्भ : अॅग्रोवन