অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रॅक्‍टरची देखभाल

ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन हे कामाच्या तासावरून केले जाते. ट्रॅक्‍टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. सर्व चाकांचे नट बोल्ट्‌स तपासून आवश्‍यकतेनुसार आवळून घ्यावेत. गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. योग्य व्यवस्थापनातून ट्रॅक्‍टरची कार्यक्षमता वाढविता येते, तसेच इंधनामध्ये बचत करणे शक्‍य आहे. 

1) दर 8 ते 10 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी -

अ) इंजिनमधील (सम्पमधील) व एअर क्‍लिनरमधील तेलाची पातळी तपासावी. 
ब) रेडिएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासावी. 
क) जर ट्रॅक्‍टरचे काम धुळीमध्ये असेल तर एअर क्‍लिनरमधील तेल बदलावे. 
ड) डिझेल लिकेज आहे का ते पाहावे.

2) दर 50 ते 60 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - 
अ) फॅन बेल्टचा ताण योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी. 
ब) गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. 
क) ट्रॅक्‍टर चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. 
ड) बॅटरी व मोटर यांची सर्व कनेक्‍शन घट्ट बसवावीत. 
इ) इंधन फिल्टर (डिझेल फिल्टर)मध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे.

3) दर 100 ते 120 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी  -
अ) इंजिन तेल बदलावे, तसेच बदलण्याजोगे फिल्टर्स बदलावेत. 
ब) शक्‍यतो सर्वच्या सर्व ग्रीसिंग पॉइंटना वंगण द्यावे. 
क) डायनामोच्या बेअरिंगमध्ये 8 ते 10 थेंब ऑइल टाकावे. 
ड) पुढील चाकांमध्ये प्ले आहे का ते पाहावे व सर्व चाकांचे नट बोल्ट्‌स तपासून आवश्‍यकतेनुसार आवळून घ्यावेत. 
इ) बॅटरी तपासून आवश्‍यकतेनुसार डिस्टिल्ड वॉटर घालावे.

4) दर 200 ते 250 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - 
अ) ऑइल सम्प काढून स्वच्छ करून त्यात नवीन ऑइल भरावे. 
ब) ऑइल फिल्टर तसेच डिझेल फिल्टर बदलावेत. 
क) स्टिअरिंग कॉलमच्या बेअरिंग ग्रीसिंग कराव्यात. 
ड) ब्रेक्‍सची तपासणी करावी.

5) दर 400 ते 500 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - 
अ) पुढील चाकाचे हब ग्रीसिंग करावे. 
ब) रेडिएटरमधील पाणी काढून तो स्वच्छ करून घ्यावा व पुन्हा नवीन पाणी भरावे. 
क) क्‍लच तपासून घ्यावा. 
ड) आवश्‍यकतेनुसार ब्रेक ऍडजस्ट करून घ्यावेत.

6) दर 750 ते 800 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - 
अ) गिअर ऑइल बदलावे. 
ब) ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. 
क) डिझेल टाकी साफ करावी. 
ड) स्टिअरिंग बॉक्‍समधील ऑइल तपासून पाहावे.

7) दर 1000 ते 1200 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी - 
अ) पुढील व मागील चाकाच्या ऍक्‍सलचे बेअरिंग्ज स्वच्छ करून पुन्हा बसवावेत. 
ब) बॉश पंप व नोझल्स अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून तपासून घ्यावेत. 
क) व्हॉल्व्ह सेटिंग करून घ्यावेत. 
ड) स्टार्टर डायनामो व कटआऊट तपासून घ्यावेत. 
इ) बॉनेट, ग्रील मडगाईड तसेच सीट तपासून पाहावे व आवश्‍यकतेनुसार दुरुस्त करून घ्यावेत.

ट्रॅक्‍टरची दुरुस्ती

1) ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्‍य होते; परंतु ट्रॅक्‍टरचा होणारा सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे सिलिंडर लायनर, कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरिंग्ज व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. क्रॅंक शाफ्ट ग्राइंडिंग करून घ्यावा लागतो. तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह सीटसुद्धा बदलावे लागते. 
2) ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही ठोस असा नियम नाही. सर्वसामान्य ट्रॅक्‍टरच्या कार्याचा विचार करता एकूण 4000 तास काम केल्यानंतर इंजिनच्या कॉम्प्रेसरमध्ये घसारा येतो व पूर्ण शक्ती तयार करण्यामध्ये इंजिन अपयशी ठरते, तसेच सिलिंडर लायनर व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. 
3) व्हॉल्व्ह, व्हॉल्व्ह सीट रिफेस करून घ्यावे लागते. याशिवाय ऑइल सील, रेडिएटर होस पाइप तसेच बुशिंगसुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. तसेच कनेक्‍टिंग रॉडच्या बेरिंगमधील क्‍लिअरन्स (फट) तपासून ठीक करावी लागते. 
4) साधारणतः जेव्हा ट्रॅक्‍टरच्या कामाचे 8000 तास पूर्ण होतात तेव्हा क्रॅंकशाफ्ट व कॅमशाफ्टची तपासणी करावी. त्या वेळी कमी मापाचे बेअरिंग वापरावे लागते. शक्‍यतो दुसऱ्या ओव्हरहॉलिंगच्या वेळेस पिस्टन व सिलिंडर लायनर बदलावे. 
5) इंजिन ओव्हरहॉल करताना पिस्टनच्या डोक्‍यावरील रिंग वरील खाचामधील तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह दांडीवरचा कार्बन व काळी चिकट तेलकट घाण स्वच्छ करावी व सर्व भाग केरोसीनमध्ये स्वच्छ धुऊन काढावेत. 
6) इंजिन हेड जोडताना नवीन गॅसकेटचा वापर करावा. सिलिंडर गॅसकेटमध्ये गळती राहिल्यास तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो किंवा सिलिंडरमध्ये पाणी घुसण्याची किंवा दोहोंची शक्‍यता वाढते. 
7) बहुतांश वेळेस असे लक्षात आले आहे, की ट्रॅक्‍टरची दुरुस्ती ही होणाऱ्या मोडतोडीमुळे करावी लागते. सुगीच्या वेळी होणारी मोडतोड थांबवण्यासाठी ज्या वेळी सुगी संपते व रिकामा वेळ उपलब्ध असतो अशा वेळी ट्रॅक्‍टरची दुरुस्ती करावी. 
8) बहुतांश भाग प्रमाणाबाहेर खराब होईपर्यंत ट्रॅक्‍टरची दुरुस्ती लांबवू नये, अन्यथा अचानक होणाऱ्या मोडतोडीमुळे त्याहूनही जास्त खर्चाला सामोरे जावे लागते. 
9) सुगी सुरू होण्यापूर्वीच काही महत्त्वाचे सुटे भाग विकत घेऊन ठेवावेत म्हणजे सुगीच्या काळात सुट्या भागांच्या कमतरतेमुळे व योग्य प्रकारचा भाग न मिळाल्याने होणारा वेळेचा अपव्ययही टाळता येईल.

सुगीपश्‍चात ट्रॅक्‍टरची देखभाल

1) ट्रॅक्‍टर बाहेरून स्वच्छ पुसून घ्यावा व स्वच्छ करावा. 
2) एअर क्‍लीनर स्वच्छ करावा व त्यामध्ये नव्याने तेल भरावे. 
3) ट्रॅक्‍टर गरम होईपर्यंत इंजिन सुरू ठेवावे. 
4) सर्व फिल्टर्स स्वच्छ करावेत. 
5) क्रॅंककेसमधील सर्व वंगण तेल बाहेर काढावे व पुन्हा भरावे. 
6) गिअर बॉक्‍स (ट्रान्समिशन) तेल पूर्णपणे बाहेर काढावे व निर्मात्यांच्या निर्देशानुसार पुन्हा नवीन तेल भरावे. 
7) डिझेल टाकीमधील, फीड पंपामधील व डिझेल लाइनमधील सर्व डिझेल काढावे.
8) गंज प्रतिबंधक तेल प्रत्येक सिलिंडरमध्ये सोडावे. 
9) ट्रॅक्‍टर बॅटरी सोडवून व्यवस्थित बाजूला ठेवावी. 
10) चाकांना लावलेली वजने काढून चाकातील पाणी काढावे. ट्रॅक्‍टर लाकडी ठोकळ्याच्या साह्याने उचलून ठेवावा. 
11) ट्रॅक्‍टरचा क्‍लच वेगळा करावा. 
12) ट्रॅक्‍टरला कव्हर घालून झाकावा.
सुहास पाटील - 9823381191 
जयंत घाटगे - 7387427217 
(लेखक कृषी यंत्रे व शक्ती विभाग, पद्‌मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate