অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रक्रियेसाठी मिनी डाळ मिल

तुरीवर प्रक्रिया करून डाळ बनविण्याकरिता मिनी डाळ मिल विकसित करण्यात आली. ही मिनी डाळ मिल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. या मिनी डाळीची वैशिष्ट्ये म्हणजे ताशी 125 किलो तुरीवर प्रक्रिया करता येते. डाळीचा उतारा 75 टक्के आहे. तूर, मूग, उडीद व हरभरा डाळ बनविण्यासाठी ही मिनी डाळ अत्यंत उपयोगी आहे.

शरीर पोषणासाठी लागणाऱ्या प्रथिनांची गरज भागविण्यासाठी मानवी आहारामध्ये डाळींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात आहारामध्ये प्रामुख्याने तुरीच्या डाळीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तुरीपासून डाळ करण्याची प्रक्रिया इतर धान्यांची डाळ तयार करण्याच्या तुलनेत अधिक क्‍लिष्ट आहे. तुरीपासून डाळ तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीत भरपूर वेळ आणि मजूर लागत असून, डाळीचा उताराही कमी येतो. हे लक्षात घेऊन मिनी डाळ मिल विकसित करण्यात आली आहे.

तुरीपासून डाळ तयार करताना सध्या प्रामुख्याने तेल लावून कोरड्या पद्धतीने डाळ तयार करणे आणि तुरी रात्रभर पाण्यात भिजवून डाळ तयार करणे या पद्धतींचा वापर केला जातो. यापैकी दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच प्रचलित पद्धतीने डाळ तयार केल्यास पाण्यामध्ये विद्राव्य असणाऱ्या जीवनसत्त्वांचा आणि प्रथिनांचा ऱ्हास होतो, त्यामुळे अशा डाळीचे अन्नद्रव्य मूल्य घटते. ग्रामीण स्तरावर उत्पादन खूप असले तरी शेतकरी हे उत्पादन कमी भावात विकून त्यामानाने तुलनात्मक जास्त भावाने तयार डाळ खरेदी करतात. ग्रामीण भागात आवश्‍यक असलेल्या डाळीच्या 10 ते 15 टक्केच डाळ फक्त खेड्यातून तयार केली जाते. या पद्धतीमध्ये डाळीचा उतारा 58 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मिळत नाही. हे लक्षात घेता मिनी डाळ मिल फायदेशीर आहे.

अशी आहे मिनी डाळ मिल

साधारणत: 10 ते 12 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावसमूहासाठी लागणारी तूर डाळ बनविण्याची क्षमता या मिनी डाळ मिलमध्ये आहे. सामान्यत: 1000 ते 1200 पोती तुरीवर प्रक्रिया केल्यास ही गरज पूर्ण होईल.

डाळ मिलचे प्रमुख भाग

धान्याची चाडी (केशििी)


साधारणत: 10 ते 12 किलो तूर राहतील अशा आकारमानाची ही चाडी असते. या चाडीच्या तळाशी एक झडप असून, त्याद्वारे तूर रोलर मिलमध्ये जाण्याचा वेग नियंत्रित करता येतो.

रोलर मिल


रोलर मिल हे डाळ मिलचे प्रमुख अंग आहे. तुरीवरील टरफल काढण्याचे कार्य या भागात होते. एक निमुळता दंडगोलाकृती एमरी रोलर बेअरिंगच्या साह्याने बसविलेला असून, खालील भागात चाळणी असते. तुरीचे घर्षण रोलर मिल व चाळणी यामध्ये होऊन तुरीवर ओरखडे पडतात, त्यामुळे टरफल काढले जाते. चाळणीतून बारीक भुस्सा, पावडर वेगळी केली जाते.

वाताकर्षण पंखा (अीळिीरीीें)


रोलर मिलमधून बाहेर पडणारी तूर आणि टरफले यांच्या मिश्रणातून वाताकर्षणाने टरफले उचलून वेगळे करण्याचे कार्य वाताकर्षण पंख्याच्या साहाय्याने केले जाते.

चाळणी संच


या संचात दोन चाळण्या बसविलेल्या असतात, त्यामुळे तुरी, बारीक चुरी व काही प्रमाणात झालेली डाळ वेगळी केली जाते.

ऑगर कन्व्हेअर


वेगळ्या झालेल्या तुरीवर या भागात खाण्याच्या तेलाची प्रक्रिया केली जाते. तुरीचे या भागातून वहन होताना थेंबाथेंबाने खाद्यतेल सोडण्यात येते, त्यामुळे तुरीवर तेलाचा पातळ थर बसतो.

फटका यंत्र

तुरीपासून डाळ बनविण्याच्या प्रक्रियेत टरफलविरहित तुरीला (गोटा) पाण्याची प्रक्रिया करून सुकविल्यानंतर फटका यंत्रात टाकावे. या फटका यंत्रातून निघालेल्या डाळीला प्रतवारी करून फटका डाळ (ग्रेड-1) मिळते.

इलेक्‍ट्रिक मोटार


मिनी डाळ यंत्र कार्यरत करण्यासाठी तीन अश्‍वशक्तीची सिंगल फेज मोटर जोडलेली असते.

 

0724-2258266

(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कापणीपश्‍चात तंत्रज्ञान योजनेमध्ये कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate