অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भात झोडणी यंत्र

श्रम, वेळ, पैशात बचत होणार विरार परिसरातील एस. के. बाबा यांची प्रयोगशील शेती

ठाणे जिल्ह्यातील विरार परिसरातील नंदाखाल येथील कैतन पास्को लोपिस ऊर्फ एस. के. बाबा यांनी भात झोडणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या वापराने श्रम, पैसा, वेळ यांत बचत होऊन भात उत्पादकांना त्याचा फायदा होणार आहे. भातशेतीला प्रयोगशीलतेची जोड देत बाबांनी आपल्यासह परिसरातील शेतकऱ्यांचीही प्रगती करण्याची वृत्ती कृतीतून जोपासली आहे. 
प्रा. उत्तम सहाणे
विरारजवळ नंदाखाल गावचे एस. के. लोपिस म्हणजे शेतीतील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व. त्यांचे संपूर्ण नाव कैतन पास्को लोपिस असे असले, तरी आदराने त्यांना एस. के. बाबा या नावानेच ओळखले जाते. त्यांचे वय 74 वर्षे आहे. त्यांच्यासोबत पत्नी सौ. उषा, दोन मुले सातू आणि जेकब, तसेच सुना व नातू असा परिवार आहे. त्यांची वडिलोपार्जित भातशेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. विरारमधील त्यांची एस. के. डेअरी आणि एस. के. बेकरी म्हणजे खवैयांसाठी खास पर्वणीच आहे.
विरार परिसर मुंबई शहराला जवळ असल्यामुळे आजूबाजूचा बहुतेक शेतीचा भाग हा घरबांधणीसाठी वापरला जात आहे. लोकसंख्येतील वाढ व घरबांधणी व्यवसायासाठी जागेची विक्री यामुळे येथील प्रत्येकाकडे थोडीच शेती शिल्लक राहिली आहे. त्यामुळे उपलब्ध शेतीतच नवीन काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
एस. के. बाबा दोन ते तीन एकर भातशेती करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भातशेतीत आज उत्पन्न कमी येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे भाताची कापणी, पेंढ्यांची वाहतूक, झोडणी, मळणी करताना भाताचे दाणे पडून जे नुकसान होते, त्यामुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के घट येते. बाबांनी आपल्या शेतीच्या प्रदीर्घ वर्षांच्या अनुभवातून या घटीचे कारण शोधून उपाय शोधण्याचे ठरविले आणि संशोधनाला सुरवात केली.

असे झाले संशोधन

तीन वर्षांपूर्वी भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने अवकृपा केली. ऐन कापणीत सुमारे 15 दिवस सलग पावसात उभ्या पिकातील भात भिजत होता. त्याच्या ओंब्यांतून नवीन कोंब निघत होते. याच वेळी बाबांना कल्पना सुचली. पाऊस थांबायचा, त्या वेळी मजुरांकडून ओंब्या कापायला घेतल्या. त्या निवाऱ्याला पंख्याच्या वाऱ्यावर कोरड्या केल्या. त्याची मळणी केली. निसर्गाची अवकृपा झाली तरी कापणी, मळणी सुधारित पद्धतीने करायला शिकले पाहिजे, हे त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना प्रयोगातून दाखवले. त्या वर्षी एकरी 16 क्विंटल उत्पादन त्यांच्या हाती आले.
विरार परिसरातील शेतकरी भाताची कापणी केल्यानंतर तो वाळविण्यासाठी मोकळा करून शेतातच पसरून ठेवतात. असा भात शेतात तीन दिवस पडून राहतो. त्या वेळी पाच ते सात टक्के दाण्यांची गळ होत असते. चौथ्या-पाचव्या दिवशी त्याच्या पेंढ्या बांधून एका जागेवर गोळा करून घराजवळ वाहून आणल्या जातात. या प्रक्रियेत पाच ते दहा टक्के दाणे गळून जातात. वेळ मिळेल तेव्हा हातमशिन किंवा मोटर मशिनच्या साह्याने झोडणी- मळणी होते. या वेळी दाण्यांचे पाच टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. ते कमी करण्यासाठी व त्यातील सर्व कामांना फाटा देत बाबांनी आपल्या जुन्या मळणी यंत्रात काही तांत्रिक बदल केले. त्याला चार चाकांच्या ढकल हातगाडीवर फीट केले. यंत्र चालविण्यासाठी सिंगल पिस्टन डिझेल इंजिन जोडले. अशी तयार झालेली यंत्रगाडी भात कापणीसाठी थेट शेतात घेऊन जाता येते. भात विळ्याने कापल्यानंतर मशिनवर दाणे काढण्यासाठी आणला जातो. दाणे वेगळे करून पोत्यात भरतात व पेंढा वेगळा केला जातो. यंत्राच्या साह्याने एका दिवसात पाच मजुरांकडून अर्धा एकर भाताची कापणी करून लगेच मळणी करता येते, त्यामुळे त्याच दिवशी तांदूळ घरी येतो.

एक एकर भातासाठी कापणी - मळणीचा खर्च

(अ) पारंपरिक

(एका दिवसाची मजुरी - रु. 150) 
भात कापणी - 8 मजूर = रु. 1200 
पेंढ्या बांधणी व वाहून आणणे - 8 मजूर = रु. ---- 
मळणी - 4 मजूर = रु. 600 
एकूण = रु. 2700
आलेले उत्पादन - एकरी 14 क्विंटल x भाव रु. 1200 (प्रति क्विंटल) 
16,800 
वजा कापणी, मळणीचा खर्च 2700 एकूण - 14,100

(ब) यांत्रिक पद्धत

  • भात कापणी व बांधणी - 8 मजूर - रु. 1200
  • यांत्रिक मळणी - 2 मजूर - रु. 300
  • एकूण रु. 1500
  • उत्पादन 16 क्विंटल x मिळालेला भाव रु. 1200 = 19,200
  • वजा कापणी- मळणीचा खर्च - रु. 1500
एकूण - 17,700
वरील दोन्ही पद्धतींमध्ये भात बियाणे, पेरणी, रोपांची पुनर्लागवड, खते, मशागत, पीक संरक्षण आदी खर्च सारखाच येत असला तरी कापणी व मळणीच्या बाबतीत केवळ पद्धत बदलल्यामुळे खर्चात बचत करता येऊ शकते.

यंत्र वापरल्याने झालेले फायदे

1) मजुरीच्या खर्चात बचत 
2) जमिनीवर पडून वाया जाणारा भात हाती आला (सुमारे दोन क्विंटल) 
3) ज्या दिवशी भाताची कापणी केली, त्याच दिवशी भात (दाणे) घरात आला. 
4) कमी मजूर लागत असल्याने मजूर समस्येवर अंशतः तोडगा.
पिकाचे उंदीर, जनावरे किंवा चोरांपासून नुकसान होते. भाताच्या पेंढ्यांचा भारा वाहून नेताना घसारा होतो आणि उत्पादनात घट येते. यंत्राच्या वापरामुळे थोड्याफार प्रमाणात यावर तोडगा काढणे शक्‍य होईल. यंत्रात अजून थोडा बदल करून त्यात सुधारणा कशी करता येईल असा माझा पुढील प्रयत्न राहील.

एस. के. बाबांचा शेतकऱ्यांना सल्ला

भाताचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याचा मार्ग म्हणजे भातशेतीतील खर्चात बचत करणे. उत्पादनवाढीसाठी शास्त्रज्ञ नवीन जाती वा तंत्रज्ञान विकसित करतात. मात्र, ते कसे वापरावे, हाताळावे आणि आपला वेळ कुठे कमी करावा, हे मात्र शेतकऱ्यांच्या हातात आहे. शेतकऱ्यांनी यांत्रिक शेती अवलंबावी. तसेच, शक्‍य झाल्यास यंत्रांची निर्मितीही करावी, त्यासाठी माझी मदत नेहमीच राहील. 

संपर्क - कैतन पास्को लोपिस - 9960959975 
मु. नंदाखाल गाव, पो. आगाशी, ता. वसई, जि. ठाणे
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे कार्यरत आहेत.)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate