অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कीटक व्यवस्थापन उपकरण

कीटक व्यवस्थापन उपकरण

संग्रहित धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठी उपकरणे

टीएनएयू कीटक पाठलाग सापळा

साठवलेल्या धान्यामध्ये लपलेले कीटक शोधण्यासाठी सापळ्याचा वापर करणे ही तुलनात्‍मकरीत्‍या नवी पध्‍दत आहे. या सापळ्याचे तीन मुख्य घटक आहेत: मुख्य नळी, कीटक पकडणारी नळी आणि तळाशी असणारा वेगळा करता येणारा शंकू.

मुख्य नळीमध्ये समान अंतरावर 2 मि.मी. व्यासाची छिद्रे बनवली जातात.

संकल्पना

कीटकांना हवा खूप आवडते आणि ते हवेकडे आकर्षित होतात. ह्या तंत्रामध्ये याच गोष्टीचा उपयोग केला जातो.

कार्यपद्धती

कीटकांचा सापळा गहू, तांदूळ इ. सारख्‍या धान्यामध्ये आकृतीत दाखविल्यानुसार पांढरा शंकू खाली येईल अशा पद्धतीने उभा ठेवावा लागतो. वरचे लाल आवरण हे धान्याच्या पातळीशी समान ठेवावे. कीटक मुख्य नळीतील हवेकडे आकर्षित होतील आणि छिद्रांद्वारा आत प्रवेश करतील. एकदा का ते आत शिरले की ते खालच्या बाजूस असणा-या वेगळ्या करता येणा-या शंकूमध्ये पडतील. त्यानंतर त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग मिळणार नाही आणि ते तेथे कायमचे अडकतील. हा पांढरा शंकू आठवड्यातून एकदा काढून कीटकांचा नाश केला जाऊ शकतो.

मुख्य वैशिष्ट्ये

रसायने नाहीत, साईड इफेक्ट्स नाहीत, देखभालीचा खर्च नाही.

कार्यक्षमता

हा सापळा अन्नधान्यातील कीटक आणि विशेषतः साठवलेल्या धान्यातील रायझोपर्था डोमिनिका (एफ), सिटोफिलस क्रायझी (एल) आणि ट्रायबोलियम कास्टानेउम (हर्बस्ट) कीटक; शोधून काढण्यात उत्तम कामगिरी बजावतो. तसेच तो कीटक शोधून काढण्याबरोबरच पकडलेल्या कीटकांच्या संख्येमध्येसुध्‍दा प्रमाणित सामान्य सॅम्पलिंगपेक्षा (स्पीअर सॅम्पलिंग) अधिक चांगली कामगिरी करत असल्याचे आढळून आले आहे. कीटक शोधून काढण्याचे प्रमाण (सापळा: सामान्य सॅम्पल) सामान्य सॅम्पलिंग पद्धतीपेक्षा सापळ्यामध्ये जास्त असल्याचे आढळले. हे प्रमाण 2:1 ते 31:1 अशा प्रमाणात होते. पकडलेल्या कीटकांचे सापळा : सामान्य सॅम्पल हे प्रमाणसुध्‍दा 20:1 ते 121:1 असे होते.

एकत्रित 2-3 सापळे/25 कि.ग्रॅ. डबा (28 से.मी. व्यास आणि 39 से.मी. लांबी) वापरले असता हे सापळे उत्तम समूह सापळे म्हणून काम करतात. त्यासाठी ते धान्याच्या वरच्या 6 इंचाच्या भागात बसवावेत. या भागामध्ये साठवणीच्या सुरूवातीच्या काळात कीटकांची हालचाल जास्त असते. या सापळ्यांमुळे 10-20 दिवसांत 80% पेक्षा जास्त कीटकांची विल्हेवाट लावता येते.

टीएनएयू खड्डा सापळा

हा सापळा धान्याच्या पृष्ठभागावर आणि इतर थरांमध्ये सक्रिय असणा-या कीटकांना पकडण्यास मदत करतो. (देखरेख आणि समूह सापळा उपकरण)

प्रमाणित प्रतिमान

प्रमाणित प्रतिमानाचे दोन भाग असतात: छिद्र असणारे झाकण (2 किंवा 3 मि.मी. व्यास) आणि तळाचा शंक्वाकृती भाग.शंकूमध्ये अडकलेल्या कीटकांना आतमध्येच अडकवून ठेवण्यासाठी शंकूच्या आतल्या भागात एक विशिष्ट चिकट पदार्थाचा लेप देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया जराशी कंटाळवाणी आहे.

टीएनएयू प्रतिमान

  • या प्रतिमानामध्ये छिद्र असणारे झाकण, तळाचा शंक्वाकृती भाग आणि त्याला खालून जोडलेली फनेलच्या आकाराची निमुळती सापळा नळी. यामुळे चिकट पदार्थ वापरावा लागत नाही. व्यावसायिक प्रतिमान प्लास्टिकमध्ये असून साधे आणि स्वस्त आहे. (एका सापळ्याची किंमत रु. 25 फक्त) हाताळण्यास सोपे

टीएनएयू टू इन वन मॉडेल सापळा

सच्छिद्र नळी, कीटकांना खड्ड्यात पाडण्याची यंत्रणा, साठवण नळी असणारा पाठलाग सापळा आणि सच्छिद्र झाकणाचा शंक्वाकृती खड्डा व तळाशी निमुळता कोन असणारा सापळा असे दोन सापळे एकत्र करुन नवा टू इन वन मॉडेल सापळा तयार करण्यात आलेला आहे. दोन्ही सापळे एकत्र केल्यामुळे कीटकांच्‍या पकडले जाण्याचे प्रमाण वाढते. डाळींमधील किड्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त आहे कारण हे कीटक धान्याच्या पृष्ठभागावर इकडे-तिकडे भटकत असतात. यामध्ये कीटक पकडण्यासाठी शंकूच्या आतल्या भागावर चिकट पदार्थाचा लेप इत्‍यादि लावण्यासारखी कंटाळवाणी प्रक्रिया नसते. यामध्ये कीटक जिवंत पकडले जातात त्यामुळे त्यांच्यातून स्त्रवणा-या फेरोमोनमुळे अधिकाधिक कीटक सापळ्याकडे आकर्षित होण्याची शक्यता वाढते.

दर्शक उपकरण

यामध्ये वर झाकण असलेला आणि 3 मि.मी.ची छिद्रे असणारा शंक्वाकृती आकाराचा कप असतो. कपाच्या तळाशी एक डबा आणि गोलाकार थाळी जोडलेली असते. त्या थाळीला व्हॅसलिनसारख्या चिकट पदार्थाचा लेप दिला जातो. शेतक-यांनी डाळी साठवण्यापूर्वी त्यातील 200 ग्राम डाळ घेऊन ती कपामध्ये ठेवावी. जेव्हा त्यामध्ये कीटकांचे प्रमाण वाढू लागते तेव्हा त्यांच्या भटकण्याच्या सवयीमुळे ते छिद्रांमध्ये प्रवेश करतात आणि घसरुन सापळ्यात जाउन अडकतात. चिकट पदार्थाल चिकटलेले हे कीटक शेतकरी सहज शोधून काढू शकतात आणि ते धान्य उन्हात वाळवण्यासाठी नेऊ शकतात. 2 मि.मी.ची छिद्रे असणारे उपकरण कडधान्यांसाठी वापरली जाऊ शकतात.  यामुळे किटकांची संस्ख्या सुरुवातीसच कमी करण्यात मदत होते त्यामुळे नंतर कीटक होण्याचे प्रमाण खालावते. तसेच वेळोवेळी कीटकांना शोधून काढल्याने मौल्यवान धान्यसुध्‍दा वाचण्यास मदत होते.

टीएनएयू स्वयंचलित कीटक सफाई डबा

हा डबा कीटकांना स्वतःच नष्ट करतो. या डब्याचे चार मुख्य भाग असतात: डबा, आतील सच्छिद्र डबा, साठवण भांडे आणि झाकण. साठवलेल्या धान्यामध्ये इकडेतिकडे भटकण्याच्या आणि हवेशीर भागांकडॆ आकर्षित होण्याच्या कीटकांच्‍या सवयीचा फायदा हा डबा करुन घेतो. धान्य डब्याच्या आतील सच्छिद्र डब्यामध्ये साठवले जाते. आतील आणि बाहेरील डब्यामधील जागेमधील खेळती हवा कीटकांना उत्तम वायुविजन पुरविते. कीटक भटकतांना हवा मिळवि‍ण्यासाठी छिद्रामध्ये प्रवेश करतात आणि घसरुन साठवण भांड्यात जाऊन पडतात. कीटकांना त्वरेने पकडता यावे यासाठी आतील डब्यामध्ये सच्छिद्र काठ्या वापरल्या जातात.

हा डबा तांदूळ, गहू, डाळी, मेथी इत्‍यादि साठवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हा डबा वापरून राईस वीविल, ग्रेन बोअरर, रेड फ्लोर बीटल, सॉ टूथेड बीटल अशा धान्यांवर नेहमीच आक्रमण करणा-या कीटकांपासून धान्याचे संरक्षण करता येते. यामुळे अवघ्या 10 दिवसांत 90% पेक्षा अधिक कीटकांचा नाश करण्यास मदत होते. हे डबे 2 कि.ग्रा. 5 कि.ग्रा. 25 कि.ग्रा, 100 कि.ग्रा. आणि 500 कि.ग्रा. च्या क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत.

कार्यक्षमता

स्वयंचलित कीटक सफाई डब्यामध्ये (100 आणि 500 कि.ग्रा.) 10 महिने साठवलेल्या धान्यामध्ये कीटकांमुळे झालेले नुकसान केवळ 1-4% होते. हेच प्रमाण साध्या डब्यात 10 महिन्यांच्या साठवणीनंतर 33 ते 65% होते. 10 महिन्यांनंतर आर. डोमिनिका, एस. ओरिझाई या कीटकांची संख्या 100 कि.ग्रा.च्या स्वयंचलित कीटक सफाई डब्यामध्ये 0-2 प्रति किग्रॅ होती तर हीच संख्या साध्या डब्यात 5-191% दर कि.ग्रा. होती.

धान्य गोदामांसाठी यूव्ही किरण सापळा

या सापळ्यामध्ये मुख्य घटक आहे 4 वॅटचा जर्मिसिडल दिवा जो अतिनील (अल्ट्राव्हायोलेट- यूव्ही) प्रारणांचे उगमस्थान म्हणून काम करतो. हा दिवा साधारण  250 नॅनोमीटरची अतिनील प्रारणे तयार करतो. हा दिवा वरुन 310 मि.मी. आणि तळाशी 35 मि.मी.चा व्यास असणा-या फनेलमध्ये बसवलेला असतो. फनेलचा खालचा तळ पारदर्शक प्लास्टिकच्या डब्याशी जोडलेला असतो जेणेकरुन त्यामध्ये पकडलेले कीटक जमा केले जाऊ शकतील. दिवा योग्य त्या ठिकाणी लावता यावा म्हणून फनेलच्या बाहेरील बाजूस तीन हुक असतात. शिवाय त्यासोबत तिपाईसुध्‍दा असते.

हा दिवा गोदामातील साठवलेल्या धान्यामध्ये जमिनीपासून 1.5 मी. उंचीवर शक्यतो गोदामाच्या कोप-यांमध्ये ठेवला जातो. कीटक संध्याकाळच्या वेळी या भागांमध्ये शिरत असल्याचे आढळून आल्याने दिवा ठेवण्यासाठी ही जागा निवडली आहे. दिवा रात्रीच्यावेळी चालू करता येतो. तांदुळातील लेसर ग्रेन बोअरर, रायझोपर्था डोमिनिका, रेड फ्लोर बीटल, ट्रायबोलिअम कास्टानेउम आणि सॉ टूथेड बीटल, ऑरिझाफिलस सरनेमेन्सिस अशा कीटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. सोसिड नावाचे अत्यंत त्रासदायी कीटकसुध्‍दा या दिव्याकडे आकर्षित होतात. 60 X 20 मी. आकाराच्या आणि 5 मी. उंचीच्या गोदामासाठी 2 दिवे पुरेसे असतात.

दीर्घकाळ साठवणीसाठी असणा-या गोदामांमध्ये कीटक-संक्रमित धान्यसाठा आल्यावर कीटकांना शोधून त्यांचा नाश करण्यासाठी आणि त्यांची संख्या कमी करण्यासाठी हा सापळा खूपच उपयोगी पडतो. नेहमी ने-आण चालू असणा-या गोदामांमध्ये देखरेखीसाठी हा दिवा उपयोगी पडतो.

कार्यक्षमता

60X20X5 मी. च्या गोदामामध्ये कोप-यात ठेवलेले दोन दिवे दिवसाकाठी 200 कीटक मारू शकतात. अगदी ज्या धान्यामध्ये वरकरणी कीटक नसल्याचे दिसत असले तरी ही अशा धान्यातून ही हे दिवे कीटक शोधू शकतात. तांदुळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या एका दिव्याने एका दिवसात सुमारे 3000 रायझोपर्था डोमिनिका कीटकांचा नाश केल्याचे ही आढळले आहे.

साठवलेल्या डाळीच्या बियांमधून कीटकांची अंडी नष्ट करण्याचे उपकरण

धान्यांपेक्षा डाळी साठवणे जास्त कठीण काम असते कारण साठवणीच्या काळात डाळींमध्ये कालोसोब्रोकस नावाच्या कीटकापासून हानि होण्याची शक्यता जास्त असते. हा कीटक शेतावरुनच गोदामामध्ये प्रवेश करतो. हे उपकरण यशस्वीपणे कालोसोब्रोकस चिनेन्सिस आणि कालोसोब्रोकस मॅक्युलेट्स या डाळींवर आक्रमण करणा-या कीटकांची अंडी नष्ट करतो. या उपकरणामध्ये एक बाहेरचा डबा असतो आणि एक आतील सच्छिद्र डबा असतो ज्यामध्ये एक फिरणारा दांडा बसवलेला असतो आणि या दांड्याला सर्व बाजूंनी प्‍लॅस्टिकचे ब्रश लावलेले असतात. अंडी असणारी डाळ या सच्छिद्र डब्यामध्ये साठवायची असते आणि तिचा दांडा दिवसातून तीनदा (सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी) 10-10 मिनिटे एकदा पूर्ण घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने आणि एकदा पूर्ण घड्याळाच्या काटांच्या उलट्या दिशेने फिरवायचा असतो. फिरणा-या दांड्यामुळे त्याला जोडलेले ब्रश फिरतात आणि त्यामुळे आतील अंडी फुटतात आणि होणारे नुकसान टळते.

आविष्‍काराचे फायदे

  • डाळीला कसलाही धक्का न पोहोचवता अंडी नष्ट करता येतात. एकदा का अंडी नष्ट झाली की नंतर साठवणीच्या काळात कीटकांची नवी पैदास होण्याची शक्यता रहात नाही. अंडी नष्ट केल्यामुळे कीटकांच्‍या पैदाशीवर ताबा मिळवण्यात मोठे यश मिळते. कीटकांमुळे होणा-या नुकसानामुळे शेतकरी डाळींच्या बिया साठवण्यास घाबरतात. मात्र या उपकरणामुळे ते आता स्वतःच्या डाळीच्या बिया वापरू शकतात. या उपकरणाचे पेटंट मिळवण्यात आलेले आहे आणि ते बाजारात उपलब्ध आहे.

गोदामातील कीटकांवर नजर ठेवण्यासाठी सापळा

यामुळे पोत्यात साठवलेल्या धान्यातील कीटक शोधण्यास मदत होते. या उपकरणामध्ये 1.8 ते 2.0 से.मी. व्यासाची एक पोकळ नळी असते आणि तिला वरच्या भागात समान अंतरावर (1.8 ते 2.0 मि.मी.) छिद्रे असतात. शिवाय ती एका बाजूने वक्राकार असते व एक पारदर्शक भाग असतो जेथे वक्राकार भागातून खाली पडणारे कीटक गोळा होतात. मुख्य नळीचे दुसरे तोंड बंद असते.

आविष्‍काराचे फायदे

  • यामुळे पोत्यांतील धान्यामध्ये असणारे कीटक शोधण्यास मदत होते तेही पोत्याला नुकसान न करता.
  • यामध्ये कीटक पकडण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी कोणतेही साहित्य लागत नाही.
  • पोत्यांच्या राशींमध्ये असणा-या कीटकांचे चलनवलन अभ्यासण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
  • जंतुनाशकाच्या फवारणीनंतर लगेचच हे उपकरण वापरुन फवारणीचा प्रभाव तपासता येतो.
  • शेतावर धान्य पोत्यांमध्ये भरतानासुध्‍दा याचा उपयोग होऊ शकतो.

टीएनएयू साठवण धान्य कीटक व्यवस्थापन संच

लोकांना धान्य वर्षभर पुरावे म्हणून ते गोदामांमध्ये वेगवेगळ्या काळासाठी साठवून ठेवले जाते. या धान्यावर गोदामामध्ये साठवणीच्या काळात ज्या जैविक व अजैविक घटकांचा प्रभाव पडतो त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे कीटक. कीटक धान्याची गुणवत्ता आणि वजन या दोन्ही दृष्टीने खूप नासाडी करतात. बरेचदा कीटक जेव्हा गोदामामध्ये उडू लागतात तेव्हाच त्यांची जाणीव आपल्याला होते परंतु तोपर्यंत खूपसे धान्य कीटकांनी नष्ट केलेले असते आणि त्यांची संख्याही भरमसाठ वाढलेली असते. म्हणूनच त्यांना वेळीच शोधल्यास त्यांची विल्हेवाट लावणे सोपे जाते आणि धान्याची नासाडी थांबविता येते.

टीएनएयूने या कीटकांच्‍या भटकंती करण्याच्या सवयीचा फायदा करुन घेऊन त्यांचा वेळीच नाश करणारी उपकरणे तयार केली आहेत. यामध्ये टीएनएयू कीटक पाठलाग, सापळा टीएनएयू खड्डा सापळा, टीएनएयू टू इन वन मॉडेल सापळा, टीएनएयू दर्शक उपकरण, टीएनएयू स्वयंचलित कीटक सफाई डबा, धान्य गोदामांसाठी यूव्ही किरण सापळा, साठवलेल्या डाळीच्या बियांमधून कीटकांची अंडी नष्ट करण्याचे उपकरण, गोदामातील कीटकांवर नजर ठेवण्यासाठी सापळा यांचा समावेश आहे. ही उपकरणे मोठ्या प्रमाणावर वापरली जात असून त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मान्यतासुध्‍दा मिळाली आहे.

म्हणूनच शेती विभाग, रोपसंरक्षण अभ्यास केंद्र, टीएनएयू, कोयम्बतूर यांनी टीएनएयू साठवण धान्य कीटक व्यवस्थापन संच या नावाने एक संच तयार केला आहे ज्यामध्ये एका सीडीमध्ये या सर्व उपकरणांची माहिती आणि त्यांना वापरण्याची पद्धत यांचा समावेश आहे. या संचामुळे या पद्धती भारतात लोकप्रिय होण्यास मदत होईल. तसेच ही उपकरणे प्रशिक्षणासाठी आणि खाजगी गोदामांसाठीसुध्‍दा वापरता येतील.

स्त्रोत: महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 10/8/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate