অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टिकवा जमिनीची सुपीकता

पीक पोषणासाठी आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करीत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे पिकांचे संतुलित पोषण योग्य पद्धतीने हवे.

दुसरी गोष्ट म्हणजे या आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे महत्त्वाचे ठरते. अन्नद्रव्यांच्या उपलब्ध विविध घटकांचा कुशलतेने वापर करावा. या पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पिकांना आवश्‍यक सर्वच म्हणजे मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा तर होतोच; परंतु त्यासोबतच जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते.

अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी निरनिराळे स्रोत वापरण्याची गरज आहे. प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीची खते, निंबोळी पेंड, मासळी खत, कोंबडी खत इत्यादी तसेच रासायनिक खते आणि पिकांचे अवशेष उदा. मूग, हरभरा, सोयाबीन यांचे कुटार, गव्हांडा इत्यादी सर्व अन्नद्रव्यांचे स्रोत यांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे.

फक्त रासायनिक खतेच वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही, तसेच निव्वळ सेंद्रिय खतांमधून आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी या दोन्ही संसाधनांचा एकमेकास पूरक असा एकात्मिक वापर फायद्याचा आढळून आला आहे. दीर्घ मुदतीय खत प्रयोगावरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.

एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर

१) या पद्धतीमध्ये निरनिराळ्या निविष्ठांचा वेगवेगळ्या पिकांना विविध अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना अचूक आणि काटेकोर पद्धतीने वापर करीत असताना माती आणि पाणी परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, कमतरता असलेली अन्नद्रव्ये इत्यादींचे योग्य निदान करूनच खतांचा वापर फायदेशीर ठरतो.

२) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य स्वरूपाची खते पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप मोठ्या पटीने वाढविता येते. खताचा योग्य प्रकार, गरजेनुसार मात्रा, वापरण्याची योग्य पद्धत, ठिकाण आणि योग्य वेळ इत्यादी बाबींचे काटेकोर पालन करून अन्नद्रव्यांचा पुरवठा शाश्‍वत शेतीसाठी गरजेचा आहे.

३) जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीस फार महत्त्व आहे. सध्या रासायनिक खतांच्या अयोग्य आणि जास्त वापरामुळे आणि सेंद्रिय खतांच्या अभावामुळे जमिनीच्या सुपीकतेत मोठी घट येऊन अन्नद्रव्यांच्या प्रमाणात तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि अन्नद्रव्यांचा भविष्यातील ऱ्हास थांबविण्यासाठी विविध पिके आणि पीक पद्धतींना एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीनुसार नियोजनबद्ध खत व्यवस्थापन करण्याची गरज आहे. सुपीक जमिनींवर खतांना प्रतिसाद योग्य मिळतो आणि घटक उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होते.

४) पिकांच्या गरजेएवढ्या अन्नद्रव्यांच्या मात्रेचा पुरवठा जमिनीतून खते वापरूनच करावा लागतो.

५) फवारणी पद्धतीने अतिशय अल्प प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जातात; परंतु ही फवारणीची पद्धत काही बाबतीत वापरणे खूप महत्त्वाचे असते. विशेषतः कमी प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी ती योग्य ठरते.

६) काही विशिष्ट परिस्थितीत जमिनीतील खतांचा पुरवठाच होत नसेल. उदा. पाणथळ जमिनी, चुनखडीयुक्त जमिनी इत्यादीमध्ये फवारणीचा वापर फायद्याचा ठरतो. उभ्या पिकावरील काही अवस्थांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता जाणवल्यास लगेच फवारणी पद्धतीने पुरवठा करता येतो. फवारणी पद्धतीनुसार अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप वाढविता येते; परंतु तिच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात.

७) शाश्‍वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पीक उत्पादकता शाश्‍वत ठेवून पोषणमूल्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सदर पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचे काटेकोर व्यवस्थापन गरजेचे आहे.

८) पिकांची घटत चाललेली उत्पादकता, अन्नातील पोषणमूल्यांची कमी, शेतीतील खर्चातील वाढ, कीड व रोगांच्या वाढत आलेल्या समस्या, फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता व दर्जा, सेंद्रिय निविष्ठांची टंचाई, सिंचनाच्या अपूर्ण सोई-सुविधा, अवर्षणामुळे वाढणाऱ्या पाणी आणि अन्नद्रव्यांच्या जमिनीतील समस्या, खालावलेली जमिनींची सुपीकता इत्यादी समस्यायुक्त बाबींमध्ये गुंतलेली शेती शाश्‍वत ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धतींची गरज आहे.

संतुलित पोषण महत्त्वाचे

१) सेंद्रिय आणि असेंद्रिय निविष्ठांचा वापर जैविक खतांसोबत करून पीक उत्पादनामध्ये निश्‍चितपणे वाढ होते, उत्पादनाची प्रतही सुधारते. हळूहळू जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील निर्भरता काही प्रमाणात कमी होते.

२) शेतावरच उपलब्ध काडीकचरा, कुटार इत्यादी घटकांचा वापर केल्याने एकूण खतांवरील खर्चात बचत करता येते.

३) सेंद्रिय खते वापरल्यामुळे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळून पिकांचे संतुलित पोषण होते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. एक टन शेणखत जमिनीत मिसळल्यास सहा ते सात किलो नत्र, तीन ते चार किलो स्फुरद व सात-आठ किलो पालाश जमिनीला मिळतो. या सोबतच एक किलो गंधक, २५० ग्रॅम मँगेनिज, १०० ग्रॅम जस्त, ७५ ग्रॅम लोह, २५ ग्रॅम बोरॉन आणि दोन ग्रॅम मॉलिब्डेनम इतकी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात.

४) शेणखताचा नियमित वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत जाणवत नाहीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जमीन आरोग्य सुधारते. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे इतर मुख्य अन्नद्रव्यांच्या पिकावाटे होणाऱ्या शोषणास मदत होते आणि पर्यायाने अतिशय महाग असलेल्या रासायनिक खतांचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.

५) सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो त्यामुळे जमिनीतील संरचना सुधारते, पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा चांगला होतो, धूप कमी होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते.

गरजेनुसार संतुलित पुरवठा झाल्यामुळे अन्नद्रव्यांचा प्रभावी वापर होतो आणि जमिनीच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाचा धोका टळतो. अन्नद्रव्यांचे निरनिराळे स्रोत वापरले जाऊन त्यांचा शेतीमध्ये योग्य वापर केला जातो. अन्नद्रव्यांची निसर्गातील साखळी सुस्थितीत ठेवण्यास मदत होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate