অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकीकृत कीड व्यवस्थापन

एकीकृत कीड व्यवस्थापन


संवर्धन पध्दती

कीडनियंत्रणाच्या संवर्धन पध्‍दतीत शेतावरची नियमित कामे अशा रीतीने करण्‍यात येतात की त्यांमुळे कीड आपोआप नष्ट होते किंवा निदान आर्थिक नुकसान टळते. अशा विविध संवर्धन पध्‍दतींचे संकलन खालीलप्रमाणे आहे -

  • मातीवर प्रक्रिया करणे, उन्हाळ्यात जमीन खोलवर नांगरणे, पालापाचोळा व कचरा काढून टाकणे व बांध-बंदिस्तीसारख्या उपायांनी शेते व रोपवाटिकांचे किडींपासून संरक्षण करता येतात. शेतांमध्‍ये पाण्याचा निचरा योग्‍य प्रकारे होईल अशी पध्‍दत अंगीकारणे देखील गरजेचे आहे.
  • पोषणमूल्यांच्‍या कमतरतेच्‍या तपासणीसाठी मातीचे परीक्षण करणे ज्‍याच्‍या आधारे योग्‍य खतांचा वापर करता येतो.
  • पेरणीआधी बियाण्यावर बुरशीनाशक किंवा जैविक तणनाशकाचा उपचार करून जन्‍मजात रोग नियंत्रणासाठी स्वच्छ, प्रमाणित बियाण्याचा वापर करणे.
  • कीड-नियंत्रणात महत्‍वाची भूमिका वठविणार्‍या व किडींना दाद न देणार्‍या कीड प्रतिरोधक जातीच्‍या बियाण्याची निवड करावी.
  • कीड-आक्रमणापासून बचाव करण्‍यासाठी पेरणी किंवा कापणीच्या वेळांचे समायोजन करणे.
  • फेरबदली पिके घेताना किडींना थारा न देणार्‍या जाती निवडल्याने त्यांचा मातीतून होणारा प्रसार टाळता येतो.
  • रोपट्यांत योग्य अंतर ठेवणे ज्‍यायोगे रोपटी निरोग राहतात आणि त्यांचे रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.
  • खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे. शेतावरील खत व जैविक खतांच्‍या वापरास प्रोत्‍साहन देणे.
  • पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे (पाणी साठून राहू नये ह्यासाठी जमीन आलटून-पालटून ओली व कोरडी राखणे) - कारण जमीन सतत दमट राहिल्यास त्याद्वारे किडींची वाढ होऊन त्यांचा प्रसारही होतो.
  • तणाचे योग्य व्यवस्थापन करणे. हे एक ज्ञात तथ्‍य आहे की जास्‍तीत जास्त तण रोपट्यांशी पोषणमूल्‍ये मिळविण्‍यासाठी स्‍पर्धा करतात व त्यांमधून किडींचा प्रसार वाढतो.
  • पिकाच्या अधिकतम उंचीच्या (कॅनोपी हाइट) वर, ऍफिड्स आणि पांढर्‍या माश्यांच्या बंदोबस्तासाठी, पिवळ्या रंगाच्या चिकट पट्टया (यलो पॅन स्टिकी ट्रॅप्स) बसवि‍णे.
  • किडींचा प्रसार साधारणपणे पिकाच्या विविध स्थितींमधून होतो. हे टाळण्यासाठी, सर्व शेतकर्‍यांनी मिळून, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकाच पिकाची पेरणी करणे. ह्याला सिंक्रोनाइज्ड सोइंग म्हणतात. तरीसुध्‍दा कीड आढळल्यास, सर्व पीक एकाच स्थितीत असल्यामुळे, औषध फवारणी इ. सारखे उपाय ही सगळीकडे एकाच वेळी प्रभावीपणे करता येतात.
  • किडींना देखील हल्ला करण्यासाटी काही विशिष्ट पिके किंवा झाडे जास्त आवडतात. शेताच्या कडेने असे विशिष्ट पीक (ट्रॅप क्रॉप) घेतल्यास किडी त्यावर ताव मारत राहतात व आतील मुख्य पिकाला असलेला त्यांचा धोका कमी होतो. शिवाय ह्या ट्रॅप पिकावरील किडीचा बंदोबस्त एकाच वेळी, नैसर्गिक किंवा कृत्रिम उपायांनी, प्रभावीपणे करता येऊ शकतो.
  • कीड प्रभावित मुळांवर किंवा रोपट्यांवर जंतुविरोधी प्रक्रिया करणे.
  • आंतरपिके घेणे किंवा एकाच वेळी दोन-तीन पिके घेणे. सर्वच पिके सर्वच किडींना आवडत नाहीत तसेच काही पिके काही किडींना नैसर्गिकरीत्याच दूर ठेवतात व अशारीतीने किडीचे एकंदर प्रमाण कमी होऊ शकते.
  • तयार पीक कापतांना ते जमिनीच्या शक्यतितक्या जवळ कापणे. किडी-कीटकांच्या वाढीच्या काही अवस्थांमध्ये त्यांचे वास्तव्य कापणीनंतर राहिलेल्या खोडांच्या खुंटांवर असते व पुढील हंगामामध्ये लावल्या जाणार्‍या पिकाचा त्यांना आयताच फायदा मिळतो. जमिनीच्या शक्य तितक्या जवळ कापणी केल्याने कीड कमी होते.
  • मातीमधून पसरणार्‍या किडींच्या हल्ल्यापासून पिकास दूर ठेवण्यासाठी, रोपवाटिकेतील रोपे शेतात लावतांना ती तांब्यावर आधारित बुरशीनाशकात (कॉपर फंगिसाइड्स) किंवा जैवकीटकनाशकात बुडवावी किंवा त्यांवर ही कीडनाशके फवारावी.
  • फळझाडांची छाटणी करताना रोगट/मेलेल्या/तुटक्या फांद्या नष्ट करा. त्या फळबागेत साठवून ठेवू नका कारण त्यांच्यावर किडी वाढू शकतात.
  • छाटणी करताना खोडाची साल मोठ्या प्रमाणात खरवडली गेल्यास (प्रुनिंग वुंड) तेथे रंग किंवा बोर्डो मिश्रण लावा म्हणजे झाडाच्या अशा जखमेमधून कीड किंवा रोगजंतू प्रवेश करू शकणार नाही.
  • चांगले फलोत्पादन मिळण्यासाठी, फळझाडांच्या संख्येच्या प्रमाणात, फलनास सहाय्यक वनस्पतींचीही (पॉलिनायझर कल्टिव्हार्स) लागवड करा.
  • चांगले फलोत्पादन मिळण्यासाठी, फलनास सहाय्यक फुलांचे गुच्छ (पॉलिनायझर कल्टिव्हार्स) किंवा मधमाशांची पोळी फळबागेत ठेवल्याने फायदा होतो.

यांत्रिक पध्दती

  • शक्‍य तेव्‍हां किड-कीटकांची अंडी, अळ्या किंवा पूर्ण वाढलेले कीटक तसेच झाडांचे किडलेले भाग शोधून नष्ट करणे
  • शक्‍य तेव्हां बागेत किडे-कीटक खाणार्‍या पक्ष्यांचा वावर वाढण्यासाठी बांबूचे पिंजरे ठेवणे किंवा त्यांना घरट्यांसाठी जागा मिळवून देणे
  • विशिष्ट प्रकारचे दिवे वापरून (लाइट ट्रॅप्स) किडे पकडणे व नष्ट करणे
  • पाने दुमडणार्‍या व खाणार्‍या अळ्या (उदा. केसवर्म) खाली पाडण्यासाठी दोरीचा वापर करणे
  • शेतामध्‍ये गरज असेल त्‍या जागी पक्ष्यांना घाबर
  • पक्ष्यांनी कीटक, त्याची अंडी व अळ्या खाऊन टाकाव्या ह्यासाठी बागेत पक्ष्यांना बसण्यासाठी जागा तयार करणे
  • कीटकांना मोठ्या प्रमाणात पकडून नष्ट करणे, त्यांची वीण वाढूच नये ह्यासाठी फेरोमोन्ससारख्या रसायनांचा वापर करणे इ.

जनुकीय पध्दती

तुलनात्‍मकरीत्‍या किड-कीटकरोधक किंवा जास्त चांगली सहनशक्ती असलेल्या जातींची निवड करणे

नियामक पध्दती

ह्यामध्ये, सरकारी नियमांचा प्रभावी वापर करून, संशयास्‍पद रोगग्रस्त बियाण्याचा किंवा रोपांचा विशिष्ट क्षेत्रात प्रवेश होऊ दिला जात नाही. ह्यासाठी स्थानिक तसेच परदेशी प्रकारची प्रवेशबंदी म्हणजे क्वारंटाइनचा वापर केला जातो.

जीवशास्त्रीय पध्दती

आयपीएमचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कीड व रोगांचा जीवशास्त्रीय पद्धतीने बंदोबस्त करणे – ह्यामध्ये जिवंत वनस्पती किंवा जीवजंतूंचाच वापर पिकास हानिकारक असलेल्या जीवाणूंच्या बंदोबस्तासाठी करण्‍यात येतो. काही प्रचलित घटक असे आहेत

पॅरासाइटोइड्स

असे जीव इतर सजीवांच्या शरीरावर अंडी घालतात व तेथेच वाढतात. वाढताना ते ज्यावर किंवा ज्यामध्ये राहतात त्या सजीवाचेच शोषण करीत असल्याने काही काळाने तो मरतो. असे परजीवी, ते ज्या सजीवावर आश्रय घेतात त्याच्या म्हणजे होस्टच्या स्थितीनुसार, वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ ट्रायकोगॅमा, ऍपेंटेलिस, ब्रॅकॉन, केलोनस, ब्रॅकेमेरिया, स्यूडोगोनोटोपस इ.

प्रीडेटर्स

हे जीव स्वतंत्रपणे राहणारे असतात व इतरांची शिकार करून जगतात – उदा. विविध प्रकारचे कोळी, चतुर (ड्रॅगनफ्लाय), माश्या, लेडीबर्ड बीटल्स, पक्षी इ.

पॅथोजेन्स

हे सूक्ष्मजीव असतात व इतरांच्या शरीरात राहून जगतात. परिणामी कालांतराने होस्ट मरतो. रोगकारकांचे मुख्य गट म्हणजे बुरशी, विषाणू व जीवाणू. काही नेमेटॉड्समुळेदेखील (सूत्रकृमी) कीटकांच्या काही जातींमध्ये रोग प्रसार पावतात.

  • बुरशीच्या काही महत्त्वपूर्ण जाती: हर्सुटेला, ब्यूवेरिया, नोमुरे आणि मेटारिझिअम च्या विविध प्रजाती
  • विषाणूंमधील महत्त्वाचे म्हणजे न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस उर्फ एनपीव्ही आणि ग्रॅन्युलोसिस विषाणू.
  • जीवाणूंपैकी नेहमीची उदाहरणे आहेत बॅसिलस थुरिंजिनिसिस (बी. टी.) आणि बी. पॉपिलाय्.

जैवनियंत्रण पध्दती

किडींमध्ये रोग उत्पन्न करणारे कारक प्रयोगशाळेत कमी खर्चात मोठ्या प्रमाणात तयार करता येतात. ह्यांना जैवकीटकनाशके उर्फ बायोपेस्टिसाइड्स म्हणतात. ही द्रवरूप किंवा भुकटीच्या रूपात असतात व नेहमीच्याच रसायनांप्रमाणे शिंपडता किंवा फवारता येतात. जैवनियंत्रण प्रक्रियांचे विविध गट असे आहेत.

परिचय

ह्यामध्ये जैवकारक म्हणजे बायोएजंटची एक नवीन प्रजाती होस्टच्या क्षेत्रात सोडण्‍यात येते व तेथे ती व्यवस्थित स्थापि‍त होईल ह्याची काळजी घेण्‍यात येते. अर्थात ह्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयोगशालेय चाचण्या आणि प्रत्यक्ष शेतावर प्रयोग करण्‍यात येतात

आवर्धन

ह्या पद्धतीमध्ये, संबंधित क्षेत्रात, आधीपासून असलेल्या नैसर्गिक शत्रूंची व भक्षकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जातो. ह्यासाठी प्रयोगशाळेत वाढवि‍लेले किंवा प्रत्यक्ष शेतातून गोळा केलेले जैवकारक वापरले जातात व त्या क्षेत्रात विशिष्ट प्रमाणात सोडले जातात.

संवर्धन

हा जैवनियंत्रणाचा फार महत्त्वाचा घटक आहे व कीड प्रबंधनात ह्याचा फार मोठा वाटा असतो. ह्यामध्ये किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा नाश होऊ दिला जात नाही (त्यांचे नैसर्गिक प्रमाण कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो). परस्परांचे नैसर्गिक शत्रू टिकवून ठेवण्याचे काही मार्ग असे आहेत -

  • परजीवींच्या अंड्यांचे पुंज गोळा करून ते बांबूच्या पिंजर्‍यांत किंवा पक्ष्यांच्या बसण्याच्या जागांजवळ ठेवणे म्हणजे परजीवींची संख्या वाढून अळ्यांची (लार्व्हा) संख्या घटेल.
  • कीड आणि बचाव करणारे किडे वेगळे ओळखून त्याप्रमाणे, शेतात फवारणी करताना, ते मारणे किंवा वगळणे
  • बचाव करणार्‍यांचे प्रमाण आणि आर्थिक पातळी (इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेव्हल उर्फ ETL) तपासल्यानंतर, अगदी शेवटचा उपाय म्हणूनच, रासायनिक कीटनाशके वापरणे.
  • सर्वनाशी कीटनाशके शक्यतो टाळावी
  • गरजेनुसार फक्त विशिष्ट उपयोगाची व तुलनात्‍मकरीत्‍या पर्यावरणास कमी हानी पोहोचवणारी (रिलेटिव्हली एन्व्हायरनमेंटल फ्रेंडली - REF) कीटकनाशके वापरा
  • कीटकनाशके सर्वत्र न वापरता शक्यतो फक्त गरज असलेल्या ठिकाणीच फवारा
  • किडींच्या जोरदार हल्ल्याचा विशिष्ट हंगाम वगळून पेरणी व तोडणी करा
  • किडींना आकर्षित करून मुख्य पिकापासून दूर ठेवण्यासाठी तसेच नैसर्गिक शत्रू निर्माण करण्यासाठी, प्रत्यक्ष पेरणीआधी, शेताच्या बांधांवर ट्रॅप क्रॉपची लागवड करा
  • मातीतून पसरणारी कीड नियंत्रणात ठेवण्यासाठी बिया किंवा रोपांची मुळे लावणीआधी कीटकनाशकात बुडवा
  • बचाव करणार्‍या कीटकांच्या संवर्धनासाठी आंतरपीक व फेरबदली पीक घेणे चांगले
  • कीटकनाशके योग्य प्रमाणातच वापरा, जास्त नको.

रासायनिक पध्दती

इतर सर्व उपाय थकले व पीक हातचे जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा. ही कीडनाशके गरजेपुरतीच व योग्य प्रमाणातच वापरा आणि त्याआधी आर्थिक पातळी (इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेव्हल उर्फ ETL) तपासा. म्हणजे आपला त्यांवरचा खर्च तर वाचेलच शिवाय इतर रासायनिक दुष्परिणाम टाळता येतील. आपण कोणते रसायन, केव्हा, कधी व कशासाठी फवारतो आहोत हे नीट समजून घ्या व खालील बाबी लक्षात ठेवा -

  • बचाव करणार्‍यांचे प्रमाण आणि आर्थिक पातळी (इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेव्हल उर्फ ETL)
  • कडुनिंबावर आधारित किंवा अशीच इतर जैवकीटकनाशके निवडा कारण ती तुलनात्‍मकरीत्‍या सुरक्षित असतात.
  • एखाद्याच विशिष्ट भागात कीड आढळल्यास पूर्ण शेत फवारण्याची गरज नाही

भाज्या आणि फळांच्या पिकाच्या दृष्टीने एकीकृत कीड व्यवस्थापन प्रक्रियांना फार महत्त्व आहे कारण आपण साधारणतः त्या थेटच खातो. त्यामुळेच, विषारी पदार्थांचा समावेश असणार्‍या किंवा विषारी पदार्थ मागे सोडणार्‍या कीटकनाशकांची शिफारस सतत जाता येता करू नये. जास्त नफा मिळवण्यासाठी अधीर होऊन शेतकरी भरपूर फवारणी करून पीक लवकर बाजारात आणण्याच्या घाईत असतात. मात्र ह्यामुळे कीटकनाशकांचा अतिरेक होतो आणि त्यांच्या विषामुळे कधी कधी कोणाचा मृत्यूही ओढवू शकतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. म्हणूनच, शेतातील पिकांवरही कीटकनाशकांची फवारणी धोरणाने आणि गरजेनुसारच करायला हवी.

भेंडीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती

आपल्या रोजच्या जेवणात भेंडीची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मात्र भेंडीचे उत्पादन करताना कीटक, रोग आणि नेमेटोड्सचा फार त्रास होतो व कधीकधी तर शेतकर्यांरचे खूपच नुकसान होते. भेंडीची साल नरम असते हे एक आणि तिचे पीक दमट हवामानात घेतले जाते हे दुसरे कारण ज्यामुळे त्यावर कीडकीटकांचा चटकन हल्ला होतो आणि 35-40% पर्यंत नुकसान होऊ शकते.

कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न

किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी भेंडीवर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे

  • कमी मुदतीत तयार होणार्याम भेंडीमध्ये ह्या औषधांचे अंश नक्कीच शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्याच्या प्रकृतीवर होतात.
  • रासायनिक कीडनाशके सतत वापरल्यास किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे तेच रोग पुन्हा उद्भवतात शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात.
भेंडी

मुख्य किडी

तुडतुडे / लीफ हॉपर:

लीफ हॉपर व त्यांच्या अळ्या हिरव्या रंगाच्या असतात.ते पानावर तिरक्या रेषेत हल्ला करतात व पाने पिवळी पडून दुमडली जातात. रोग गंभीर बनल्यास पाने विटकरी रंगाची होऊन चुरगळतात.

खोड फळे पोखरणारे किडे:

ह्यांच्या अळ्या रोपट्यांच्या फुटव्यांतच वरून खाली भोके पाडून ठेवतात व झाड मरतुकडे बनते. सुरकुतलेले व निस्तेज फुटवे हे अगदी नेहमीचे लक्षण आहे. त्यानंतर ह्या अळ्या फळांमध्ये घुसल्याने ती वेडीवाकडी होऊन कोणी गिर्हाीइक मिळणे अशक्यच असते.

लाल कोळी:

ह्यांच्या अळ्या हिरवट लाल तर मोठे कोळी लंबगोलाकार व विटकरी रंगाचे असतात. लाल कोळी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. ह्यामुळे पाने दुमडली व अखेर चुरगाळली जातात/p>

पिवळ्या शिरांच्या नक्षीचा रोग:

पानावर पिवळ्या शिरांचे जाळे तयार होते व त्यात मधेमधे पानाचा हिरवा रंग दिसतो. नंतर मात्र पूर्ण पानच पिवळे पडते. पांढर्याा माशीमार्फत पसरणारा हा रोग उत्पादकाच्या दृष्टीने फारच खर्चिक ठरतो.

मुळावर गाठी आणणारा किडा:

ह्यामुळे मुळांवर गाठी तयार होतात. झाडाची एकंदर वाढ खुंटते. ही कीड सूक्ष्म असते व जमिनीत राहून वनस्पतिजन्य पदार्थांवर जगते

एकात्मिक कीड-व्यवस्थापन पद्धती

  • YVMV रोधक हायब्रीड जाती, विशेषतः खरीप हंगामात, लावणे – उदा. मखमली, तुलसी, अनुपमा-१ किंवा सन-४० इ.
  • खोड व फळ पोखरणारी कीड दूर ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर मका किंवा ज्वारीसारखे तटरक्षक पीक घ्यावे.
  • पांढर्यास माशा चिकटून बसाव्या ह्यासाठी डेल्टा व पिवळे चिकट सापळे ठेवा.
  • किडे खाणार्या पक्ष्यांनी शेताला भेट द्यावी ह्यासाठी १०/ एकर या प्रमाणात छोटी मचाणे उभारा म्हणजे त्यांना त्यावर उतरता येईल.
  • लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी ५% एनएसकेई च्या दोन-तीन फवारण्या, आळीपाळीने, कीटकनाशकांसोबत द्या. ईटीएलची पातळी (प्रत्येक झाडावर जास्तीतजास्त 5 हॉपर) ओलांडली गेल्यास इमिडाक्रोपिल १७.८ एसएलची फवारणी १५० मिली/हेक्टरप्रमाणे करा. ह्याने इतर शोषक किडीही दूर राहतील.
  • इरियास व्हायटेला ही माशी दूर ठेवण्यासाठी फेरोमोन तत्त्वावर काम करणारे सापळे २/ एकर या प्रमाणे बसवा. दर १५-२० दिवसांनंतर सापळ्यांतील आमिष बदला.
  • खोड व फळाला भोके पाडणार्याम किड्यांच्या अंड्यांना खाऊन जगणार्याक (एग पॅरासॉइड) ट्रायकोडर्मा चिलोनिस चा वापर १-१.५ लाख/ हे ह्या प्रमाणात, पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी, दर आठवड्यानंतर ४-५ वेळा करा. किडींचे प्रमाण ईटीएल पातळीच्या (५.३ % संसर्ग) वर राहिल्यास सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i /हे या प्रमाणात वापरा.
  • YVMV ने ग्रस्त झाडे आढळल्यास ती नष्ट करा.
  • खोडकिड्याने पोखरलेले फुटवे व फळे वारंवार वेचून नष्ट करा
  • लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी कडुनिंबावर आधारित रासायनिक खतांचा वापर करा – उदा. इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, १५० मिली/हेक्टर, सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i/हे (०.००५%), क्विनॉलफॉस २५ ईसी, ०.०५% अथवा प्रोपर्गाइट. ५७ ईसी, ०.१% इ.

नैसर्गिक शत्रू (फायदेशीर किडे)

काय करावे आणि करू नये?

हे करा

हे करू नका

  • वेळेवर पेरणी
  • शेताची स्वच्छता
  • दरवेळी ताजा निंबोणीचा अर्क (NSKE) वापरणे.
  • गरज असेल तेव्हाच कीडनाशकांचा वापर
  • फळे वापरण्याआधी धुणे
  • कीडनाशकाचा डोस सांगितल्यापेक्षा जास्त वापरणे
  • एकाच प्रकारचे कीडनाशक पुनःपुन्हा वापरणे
  • दोन कीडनाशकांचे मिश्रण करणे
  • भाज्यांवर मोनोक्रोटोफॉससारखी जहाल कीडनाशके वापरणे
  • काढणीआधी कीडनाशके वापरणे
  • कीडनाशक फवारल्यानंतर 3-4 दिवस न थांबता लगेचच फळे खाणे

स्रोत: एकात्मिक कीड-व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राची विस्तारित पुस्तिका (ICAR) पुसा संकुल, नवी दिल्ली 110 012

वांग्यासाठी एकात्मिक कीड-व्यवस्थापन पद्धती

आपल्या रोजच्या जेवणातील भाज्यांमध्ये वांग्याची भाजी व पदार्थ अगदी नेहमी खाल्ले जातात. मात्र वांग्याचे उत्पादन करताना कीटक, रोग आणि नेमेटोड्सचा फार त्रास होतो व कधीकधी तर शेतकर्यां चे खूपच नुकसान होते. वांग्याची साल नरम असते हे एक आणि वांग्याचे पीक दमट हवामानात घेतले जाते हे दुसरे कारण ज्यामुळे त्यावर कीडकीटकांचा चटकन हल्ला होतो आणि ३५-४०% पर्यंत नुकसान होऊ शकते.

कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न

किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी वांग्यावर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे.

  • कमी मुदतीत तयार होणार्या् वांग्यांमध्ये ह्या औषधांचे अंश नक्कीच शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्या च्या प्रकृतीवर होतात
  • रासायनिक कीडनाशके सतत वापरल्यास किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात.

मुख्य किडी

हड्डा बीटल:

पूर्ण वाढलेल्या किड्यांच्या तपकिरी अंगावर काळे ठिपके असतात तर ह्यांच्या अळ्या फिक्या पिवळसर असतात अंडी लांबट, पिवळसर रंगाची व एकत्रित घातलेली असतात. अळ्या व मोठे किडे पाने खरडतात व त्याखालील हरितद्रव्य खाऊन टाकतात त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.

ऍफिड्स:

अळ्या व किडे पानातील रस शोषतात व त्यामुळे पाने पिवळी, वेडीवाकडी होऊन अखेर सुकतात. शिवाय त्यांनी पानांवर साठवलेल्या चिकट्यामध्ये (हनीड्यू) काळसर बुरशी वाढते व प्रकाशसंश्लेषणात अडथळा येतो.

खोड फळे पोखरणारे किडे:

ह्यांच्या अळ्या सुरुवातीला नवीन फुटव्यांतच भोके पाडून ठेवतात व झाडाची वाढ खुंटते. सुरकुतलेले व निस्तेज फुटवे हे अगदी नेहमीचे लक्षण आहे. त्यानंतर ह्या अळ्या फळांमध्ये घुसल्याने ती खाणे अशक्यच असते.

लाल कोळी:

लाल कोळी व त्यांच्या अळ्यादेखील पानाच्या खालच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. ह्यामुळे पाने दुमडली व अखेर चुरगाळली जातात

फोमोसिस चट्टे आणि फळे कुजणे:

ह्या रोगाचे लक्षण म्हणजे पानांवर उठणारे गोलाकार तपकिरी चट्टे. नंतर फळांवरही खोलगट फिके डाग दिसतात व लवकरच त्यांचा आकार वाढून ते संपूर्ण फळावर पसरतात आणि त्याचवेळी फळ आतून कुजू लागते.

पाने छोटी होणे:

छोट्या आकाराची ही पाने सहज लक्षात येतात. अशी पाने अरुंद, नरम व पिवळसर असतात. झाड एखाद्या चोट्या झुडुपासारखे दिसू लागते व सहसा त्याला फळेही धरत नाहीत.

स्क्लेरोटिनिया ब्लाइट:

मुख्य खोड वरून खालच्या दिशेने वाळू लागते. रोग गंभीर झाल्यास त्यावरील जोडांवर बुरशी वाढते व अखेरीस संपूर्ण झाड सुकते

मुळावर गाठी आणणारा किडा:

मुळांवर गाठी तयार होतात. झाडाची एकंदर वाढ खुंटते. शेतामधला अशा रोगग्रस्त झाडांचा भाग खुरटलेल्या झाडांमुळे ओळखू येतो.

एकात्मिक कीड-व्यवस्थापन पद्धती

रोपवाटिकेत वाढवणे

  • जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व दमटपणा टाळण्यासाठी १० सेंमी उंचीचे गादी वाफे बनवा.
  • ह्या गादीवाफ्यांवर जून महिन्यात ४५ गेजचे म्हणजे ०.४५ मिमी जाडीचे पॉलिथिन पसरा. ह्याने मातीवर सौरकरण प्रक्रिया होऊन मातीतून पसरणार्या रोगांचे (बॅक्टेरियल विल्ट किंवा नेमेटोड्स इ.) प्रमाण कमी होईल. अर्थात ह्यासाठी मातीमध्ये पुरेसा दमटपणा शिल्लक असल्याची खात्री करा.
  • बुरशीचा शत्रू असलेले ट्रायकोडर्मा व्हिरिड ३ किग्रॅ शेतावरील खतात (FYM) २५० ग्रॅम या प्रमाणात मिसळा व कल्चर तयार होण्यासाठी सात दिवस तसेच ठेवून द्या. सात दिवसांनंतर ३ वर्ग मीटरच्या वाफ्यातील मातीत मिसळा.
  • जुलैच्या पहिल्या आठवड्यात एफ१-३२१ सारखे लोकप्रिय हायब्रीड वाफ्यांमधून लावा. ह्याआधी बियांवर ट्रायकोडर्मा व्हिरिडची प्रक्रिया ४ ग्रॅम/ किग्रॅ. या प्रमाणात करा. वेळोवेळी तण काढा तसेच रोगग्रस्त रोपटी रोपवाटिकेतून काढून टाका.

मुख्य पीक

  • किडे खाणार्याण पक्ष्यांनी शेताला भेट द्यावी ह्यासाठी १०/ एकर या प्रमाणात छोटी मचाणे उभारा म्हणजे त्यांना त्यावर उतरता येईल.
  • टोळ, ऍफिड्स तसेच पांढर्याउ माशा चिकटून बसाव्या ह्यासाठी २-३/ एकर या प्रमाणात डेल्टा व चिकट सापळे ठेवा.
  • शोषक किडींना अटकाव करण्यासाठी ५ % NSKE २ ते ३ वेळा फवारा.
  • NSKE फवारल्याने पोखरणार्या किडींचे (बोअरर) प्रमाण खूपच कमी होते. ह्याकामी कडुनिंबाच्या तेलाचीही (२%) काही प्रमाणात मदत होते. तरीदेखील पानांवरच्या इतर शोषक किडींचे प्रमाण ETL पातळीच्या वर राहिल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, १५० मिली/हे या प्रमाणात वापरा.
  • खोड व फळाला भोके पाडणार्यार ल्युसिनोडस् ऑर्बोनालिस प्रकारच्या किड्यांना मोठ्या प्रमाणात अटकाव करण्यासाठी फेरोमोन तत्त्वावर काम करणारे सापळे ५/ एकर या प्रमाणे बसवा. दर १५-२० दिवसांनंतर सापळ्यांतील आमिष बदला.
  • खोड व फळाला भोके पाडणार्याम किड्यांच्या अंड्यांना खाऊन जगणार्याळ (एग पॅरासॉइड) T. ब्रासिलिंसिस चा वापर १-१.५ लाख/ हे ह्या प्रमाणात दर आठवड्यानंतर ४-५ वेळा करा.
  • नेमेटोड्स आणि खोडकिड्यांवर उपाय म्हणून कडुनिंबाची पेंड, २५० किग्रॅ/ हे (दोन वेळा) ह्या प्रमाणात, २५ व ६० दिवसांच्या अंतराने रोपांजवळील मातीत मिसळा.परंतु जोरदार वारा असल्यास किंवा तापमान ३०0से पेक्षा जास्त असताना हे करू नका.
  • खोडकिड्याने पोखरलेले फुटवे व फळे नष्ट करा कारण वाफा व शेत स्वच्छ राखल्याने ह्या किडींना बराच अटकाव होतो.
  • खोड पोखरणार्याी किडींचे प्रमाण ETL (५% रोगग्रस्तता) पातळीच्या वर गेल्यास सायपरमेथ्रिन २५ इसी चा वापर २०० g a.i/हे ०.००५%) अथवा कार्बारिल ५० डब्ल्यूपीचा वापर ३ग्रॅम/लिटर पाण्यातून करा. किंवा आपण एंडोसल्फान ३५ ईसी देखील ०.०७7% ह्या प्रमाणात वापरू शकता.
  • वांग्याचेच पीक सतत घेतल्याने बोअररचे आणि सुकण्याचे प्रमाण वाढते. म्हणून वांग्यानंतर नॉन-सोलानेशिअस प्रकारची पिके घ्यावी.
  • हड्डा बीटल्सची अंडी, अळ्या व किडे वारंवार गोळा करून नष्ट करा.
  • छोटी पाने झालेली झाडे ओळखून नष्ट करा
  • हिरवे खत, पॉलिथिन पसरणे, मातीमध्ये ब्लीचिंग पावडर मिसळणे असा उपायाने जीवाणूंमार्फत पसरणारे रोग आटोक्यात ठेवता येतात.

नैसर्गिक शत्रू (फायदेशीर किडे)

काय कराचे आणि काय करू नये?

हे करा

हे करू नका

  • वेळेवर पेरणी
  • शेताची स्वच्छता
  • दरवेळी ताजा निंबोणीचा अर्क (NSKE) वापरणे.
  • गरज असेल तेव्हाच कीडनाशकांचा वापर
  • फळे वापरण्याआधी धुणे
  • कीडनाशकाचा डोस सांगितल्यापेक्षा जास्त वापरणे
  • एकाच प्रकारचे कीडनाशक पुनःपुन्हा वापरणे
  • दोन कीडनाशकांचे मिश्रण करणे
  • भाज्यांवर मोनोक्रोटोफॉससारखी जहाल कीडनाशके वापरणे
  • काढणीआधी कीडनाशके वापरणे
  • कीडनाशक फवारल्यानंतर 3-4 दिवस न थांबता लगेचच फळे खाणे

स्रोत: एकात्मिक कीड-व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राची विस्तारित पुस्तिका (ICAR) पुसा संकुल , नवी दिल्ली११०११२

स्रोत: www.ppqs.gov.in

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate