অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोंबडी खताचे महत्त्व

कोंबडी खताचे महत्त्व

रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना कोंबडी खताचे मूल्य समजून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात सुमारे 6.25 ते आठ दशलक्ष टन कोंबडी खताचे वार्षिक उत्पादन होते. सध्या रासायनिक खतांच्या तसेच पाण्याच्या अति वापराने जमिनींची सुपीकता कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. चेन्नई येथील तमिळनाडू पशुवैद्यक व जनावरे शास्त्र विद्यापीठातील कुक्‍कुटपालन शास्त्र (पोल्ट्री) विषयाचे माजी प्रमुख डॉ. डी. नरहरी म्हणतात, की ज्या वेळी पिके एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता दाखवू लागतात त्याच वेळी शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतात.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पुरेशा प्रमाणात केला नाही तर पीक उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. विविध संशोधन तसेच जागतिक बॅंक व आशियायी विकास बॅंकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळले आहे, की सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही, तर अन्नसाखळीद्वारे मनुष्य तसेच जनावरे यांच्या शरीरातही त्यांचा अनुकूल प्रभाव दिसून येण्यास मदत होईल.

जे शेतकरी रासायनिक खतांच्या वापरावर भर देतात ते देखील आपल्या शेतात सुरवातीचे "डोस' म्हणून गांडूळ खत किंवा शेणखताचा वापर करतात. ही अनेक वर्षांपूर्वीपासूनची पद्धत आहे.

सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत वा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते याचे महत्त्व आता पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहे. शेतकरी त्यांच्या वापरावर नव्याने भर देताना दिसत आहे. विकसित देशांमधील शेतकरी याबाबत अधिक जागरूक असून सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्‍क्‍यापर्यंत बचत करणे त्याला शक्‍य झाले आहे असे प्रा. नरहरी यांचे म्हणणे आहे.

दुधाळ जनावरांच्या शेणखताविषयी शेतकरी अधिक माहीतगार असला तरी पोल्ट्री खता विषयी त्याची तुलनेने जवळीक नाही. आधुनिक पोल्ट्री उद्योग भारतात अलीकडील काही दशकांमध्ये उदयाला आला आहे. त्यामुळे पोल्ट्री खताला चांगला वाव आहे. यात ऊस, बागमळा पिके, फळ व फुलपिके अशी पिके या खताला चांगला प्रतिसाद देतात. अर्थात द्विदलवर्गीय पिकांमध्ये या खताचा वापर मार्गदर्शक नाही.

प्रा. नरहरी पुढे म्हणतात, की पोल्ट्री खत पॅलेट स्वरूपात आणता येते. 5 ते 25 किलोच्या बॅगेत त्याचे रूपांतर करता येते. पोल्ट्रीचा व्यवसाय करणारे शेतकरी तर आपल्या शेतातील वापरासाठी त्याचा वापर करू शकतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक असतातच शिवाय त्यात कॅल्शिअम हा घटकही असतो. ते मुळातच सेंद्रिय असल्याने त्याचे कंपोसिंटग करण्याची गरज भासत नाही. त्याचा शेतात थेट वापर करता येतो.

सुकवलेल्या एक टन "केज पोल्ट्री खता'चे मूल्य हे 100 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश, 125 किलो कॅल्शिअम कार्बोनेट, 30 किलो गंधक, दहा किलो मॅग्नेशिअम सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट एक किलो मॅंगेनीज सल्फेट, झिंक सल्फेट आदी व अन्य अंशात्मक घटकांएवढे असते. बाजारातील अन्य खतांच्या तुलनेत त्याची किंमतही कमी आहे. त्याचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे प्रा. नरहरी यांचे आग्रही म्हणणे आहे.
(वृत्तसंस्था)

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हवे


जमिनीची सुपीकता घटत चालल्याचे मुख्य उदाहरण पाहण्यास मिळते ते ऊस शेतीत. या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संकल्पना राबवणे गरजेचे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेणखत, कंपोस्ट किंवा प्रेसमड यांचा वापर त्यासाठी महत्त्वाचा आहे. तागासारखे हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घेऊन लागवडीनंतर सुमारे 30 ते 45 दिवसांनंतर त्याचा वापर खत म्हणून करण्याची पद्धत आता अनक शेतकरी वापरू लागले आहेत. उसाच्या पानांमध्ये लोह किंवा जस्ताची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट व झिंक सल्फेटचा वापर करणे गरजेचे आहे. अझोस्पिरीलम आणि फॉस्फोबॅक्‍टेरिया यांचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. मातीचा सामूही नियंत्रित ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ पुढे म्हणतात.

 

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate