অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खोडवा उसाला पहारीने खत देण्याची पद्धत

खोडवा उसाला पहारीने खत देण्याची पद्धत

उसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर होण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रयोग घेण्यात आले. त्यामध्ये पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले.

खतमात्रा नियोजन

  1. या पद्धतीत खतमात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी लागते. पहिली खतमात्रा खोडवा ऊस तुटल्यानंतर वाफसा आल्यावर 50 टक्के रासायनिक खताची शिफारशीत मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांसह) पहारीच्या साह्याने बेटापासून 15 सें.मी. अंतरावर आणि 10 ते 15 सें.मी. खोल छिद्र घेऊन उसाच्या एका बाजूस द्यावी.
  2. पहारीने खतमात्रा देताना दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी.

फायदे

  1. खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध कमी येत असल्याने हवेद्वारा फार कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो.
  2. खत जमिनीत गाडल्यामुळे वाहून जात नाही. तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन पिकाची जोमदार वाढ होते.
  3. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्‍य होते, त्यामुळे सर्वत्र एकसारख्या प्रकारचे पीक येते. ऊस उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
  4. या पद्धतीत आपण एकावेळी एकाच बाजूने खते वापरत असल्याने, तसेच खते खोडापासून दूर असल्याने विरुद्ध बाजूस उपयुक्त जीवाणू नेहमीप्रमाणे वाढत राहतात. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
  5. पीकवाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होते.

 

संपर्क - 02169 - 265333, 265335 
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate