प्रस्तावना
भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले. वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रीय पदार्थ आपणास ओळखता येतात, पण ते पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.
ह्युमसची व्याख्या
ह्युमसची व्याख्या खनिज जमिनीत चांगल्याप्रकारे कुजलेला कमी अधिक स्थिर असलेला सेंद्रीय पदार्थाचा भाग अशी करतात. हा सेंद्रीय पदार्थ कोलोईडल (colloidal) असतो. त्याचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो. त्यामध्ये सेंद्रीय स्वरुपात मूलद्रव्ये असतात. मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधक असतात. इतर मूलद्रव्ये कमी प्रमाणात असतात. झाडाचे लिग्नीनपासून मोठया प्रमाणात ह्युमस तयार होतो.जमिनीतील जिवाणू ह्युमसमध्ये राहातात. त्याचे शरीर बांधणीसाठी ह्युमसचा उपयोग होतो. सेंद्रीय पदार्थाचे ह्युमसमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला ह्युमीफिकेशन म्हणतात.
सेंद्रीय पदार्थ
सेंद्रीय पदार्थ कार्बनच्या अनेक संयुगाने बनलेले असतात. खडक व खनिजे यापासून तयार झालेल्या जमिनीच्या असेंद्रीय घटकामध्ये सेंद्रीय पदार्थांचे मिश्रण झालेले असते. अशा जमिनीला सेंद्रीय जमीन म्हणतात. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते आणि अखेरीस सेद्रीय पदार्थांचे रुपांतर साध्या असेंद्रीय संयुगात होते. जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सेंद्रीय पदार्थांचे कार्य सुपीक जमीन बनविण्यात सेंद्रीय पदार्थाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. कारण त्यामधून हळूहळू अन्नद्रव्ये पिकांना मिळत असतात. जिवाणुंमुळे सेंद्रीय पदार्थ कुजण्याची हळूहळू क्रिया होते, तेव्हा त्यातील अन्नद्रव्ये पिकासाठी मुक्त होतात. सेंद्रीय पदार्थाचे खनिजीकरणामुळे हळूहळू कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस, व इतर मूलद्रव्ये मुक्त होतात. भारी जमिनीत चिकण कणांचे प्रमाण जास्त असते. अशा जमिनीची मशागत करणे अवघड असते. अशा जमिनीत पाणी हळूहळू मुरते, त्यामुळे बरेचसे पाणी वाहून जाते. अशा जमिनीत हवा खेळती रहात नाही, भारी जमिनीत सेंद्रीय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभुशीत होते, व मशागत करणे सोपे जाते. जमीन भुसभुशीत झाल्यावर पाणी मुरते, पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते. जमिनीच्या पृष्ठभागावर पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली होते. याउलट हलक्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. हवा भरपूर असते, परंतु अन्नद्रव्यांचा अभाव कमी असतो, अशा जमिनीत सेंद्रीय पदार्थ मिसळल्यास जमिनीची जलधारणेची क्षमता वाढते. अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो. गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत. पाणी व रासायनिक खताच्या अति वापरामुळे महाराष्ट्रातील जमिनी चोपण होत आहेत व अशा जमिनी पडीक पडत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे १९६० साली उसावर संशोधन केले असता गांडूळामुळे उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढतो हे सिद्ध झाले आहे. सध्या पुणे, मुंबई येथील खाजगी सहकारी संस्थानी गांडूळ व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प मोठया प्रमाणात सुरु करुन विक्री चालू केली आहे. हजारो वर्षापासून गांडूळे अस्तित्वात असून त्यांचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आढळून येतात. गांडूळे जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकीर व फिकट तांबूस अशा विविध रंगाची असतात.सर्वात लहान आकाराची गांडूळे १ इंचापेक्षाही कमी लांबीची, तर सर्वात मोठे १० फूट लांबीची गांडूळे ऑस्ट्रलियात आहेत. दक्षिण आफ्रिकेत अलिकडे अजगरासारखी अजस्त्र आकाराची गांडूळे दिसून आली आहेत. त्यांची लांबी २० फूट व मध्यभागाची जाडी सुमारे ३ फूटांपर्यंत असते. पण सर्वसाधारण नेहमी आढळून येणारे गांडूळे ६ ते ८ इंच लांबीची असतात, मोठया प्रकारची गांडूळे जमिनीत ३ मीटर खोलीपर्यंत जातात. आणि माती हे खाद्य म्हणून वापरतात. गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनीया फेटीज ही परदेशी जात जगामध्ये सखोल संशोधनाअंती सर्वप्रकारे सर्वोत्तम अशी आढळून आली आहे. पेरीओनिक्स एक्सकॅहेटस ही गांडूळाची स्थानिक जातसुध्दा गांडूळ खत तयार करण्यास चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या इसिनीया फेटीज ही जात सगळीकडे गांडूळ खत निर्मितीसाठी मोठया प्रमाणात वापरात आहेत. गांडूळांना वानवे, वाळे, केचळे, शिदोढ, काडू किंवा भूनाग अशा अनेक प्रकारच्या नावाने ओळखले जाते. प्राणीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे गांडूळे ऍनेलिडा या वर्गात मोडतात.जगामध्ये गांडूळांच्या ३००० प्रकारच्या जाती आहेत. तर भारतामध्ये ३०० प्रकारच्या जातींचे गांडूळे आढळून येतात. अतिशय नाजूक मऊ व गुळगुळीत शरीराचा जंतासारख्या लवचिक आकारात २ इंचापासून ते २ फूटांपर्यंत लांबी असलेले गांडूळ रिंग्जने बनलेले असून त्याचे शरीर लांबट आकाराचे असते. ह्या रिंग्जवर छोटे छोटे तंतू असतात. ज्यांच्या मदतीने गांडूळाची हालचाल होते व त्यांना बिळांना घट्ट धरुन ठेवता येते.गांडूळाच्या शरीराचा रंग त्याच्या रक्त्तातील हिमोग्लोबीनमुळे आलेला असतो. त्याच्या शरिरावर अस्थिपंजर अस्तित्वात नसते व त्याची शरीर रचना एकावर एक बसणा-या दोन नलीकांप्रमाणे असते. आतील नलिका म्हणजे त्याची पचनसंस्था व बाह्य नलिका म्हणजेच स्नायूंची बनलेली त्वचा होय. वयात आलेल्या गांडूळाच्या गळयाभोवती एक उभट गोलाकार पट्टा असतो. त्यास क्लायटेलम म्हणतात व ह्याच भागात जननेंद्रिय आढळतात. गांडूळाला डोळे नसतात. गांडूळाच्या अंगावर सर्व दूर पसरलेल्या प्रकाश संवदेनशील ग्रंथी असतात. त्यामुळे त्यास प्रकाशाची तीव्रता समजते. ग़ांडूळास तीव्र प्रकाश सहन होत नाही. त्याच त्वचेवरील रसायन संवेदनशील ग्रंथीमुळे त्यांना सभोवतालच्या वातावरणातील रासायनिक बदल लगेच जाणवतात व अन्नपदार्थ ओळखता येतात. त्यासाठी गांडूळाची त्वचा ही ओलसर असते. त्वचेतील हिमोग्लोबीन प्राणवायुच्या कमी दाबात देखील कार्य करु शकत असल्यामुळे गांडूळे जमिनीत खोलवर राहू शकतात.
गांडूळाचा जीवनक्रम / आयुष्य
गांडूळहा उभयलिंग प्राणी आहे. अंडावस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था अशा चार त्याच्या जीवनक्रमाच्या अवस्था आहेत. अंडावस्था ३ ते ४ आठवडे, बाल्या व तरुण्यावस्था ४-१० आठवडे तर प्रौढावस्था ६-२४ महिन्यापर्यंत आढळते. प्रयोगशाळेतील अभ्यासानुसार गांडूळाचे आयुष्य १५ वर्षे असते. परंतु निसर्गामध्ये गांडूळाचे कोंबडया, गोम, पक्षी, रानडुकरे, मुंगूस इत्यादी शत्रू असतात. तारुण्य अवस्थेमध्ये २ गांडूळे एकत्र आल्यानंतर दोन्ही गांडूळे एक कोष (ककून)टाकतात. या कोषात १८ ते २० अंडी असतात. प्रत्येक कोषातून ३ ते ४ गाडूळे बाहेर पडतात. याप्रमाणे गांडूळांची एक जोडी ६ ते ८ पिल्लांना जन्म देते. एक गांडूळ दर ७ ते ८ दिवसांनी एक कोष देते. एक कोष पक्व होवून पिल्ले बाहेर येण्यास १४ ते २१ दिवस लागतात. त्यासाठी दमट वातावरण आवश्यक असते. एका वर्षात गांडूळे १ ते ६ पिढया तयार करतात.जीवनच्रकाचा कालावधी जातीनुसार व हवामानानुसार बदलत असतो. प्रजननक्षमता ही मुख्यतः जात, आर्द्रता आणि सेंद्रीय पदार्थांची उपलब्धता व कर्ब, नत्र गुणोत्तर यावर अवलंबून असते. गांडूळ हा निरुपद्रवी प्राणी बीळ करुन रहाणारा आहे. बिळात राहून सतत तोंडावाटे माती व सोबत येणारे सेंद्रीय पदार्थ गिळून विष्टा बाहेर टाकतात. सेंद्रीय पदार्थ हे गांडूळाचे मुख्य अन्न होय, म्हणून ते मोठया प्रमाणावर सेंद्रीय पदार्थ खातात. गांडूळांच्या काही प्रजाती जमिनीवर पडलेली झाडाची पाने खाण्यासाठी आपल्या बिळात ओढून नेतात तर काही प्रजाती रात्री जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन तेथील सेंद्रीय पदार्थ खातात. इतर गांडूळे माती खातात तेंव्हा त्या मातीतील सेंद्रीय पदार्थ त्यांना मिळतात. एक गांडूळ एक वर्षात ४०० ग्रॅम शुष्क सेंद्रीय पदार्थ खात असतो. एका चौरस मीटरमध्ये गांडूळाची संख्या २०० असल्यास प्रती वर्षी हेक्टरी ८० टन सेंद्रीय पदार्थ खातात. परंतु प्रत्यक्षात शेतातील गांडूळे एवढया प्रमाणात सेंद्रीय पदार्थ खात नाहीत. कारण शेतीची जमीन दिर्घकाळ कोरडी रहाते. त्यामुळे निष्क्रीय ( सुप्तावस्थेत ) राहतात. गांडूळाची पचनसंस्था म्हणजे एक सरळ नळी असते. सुरवातीला तोंड, स्नायुयुक्त घसा, अन्ननलिका, क्रॉप गिझार्ड आणि आतडी असे भाग असतात. ज्यावेळी गांडूळे सेंद्रीय पदार्थाचे तुकडे करुन खातात, त्यावेळी घशाच्या स्नायुच्या आकुंचन प्रसारणामुळे गांडूळे तोंडावाटे अन्न आत ओढून घेतात. हे अन्न म्हणजे कुजलेले सेंद्रीय पदार्थ होय. अन्नपदार्थ अन्ननलिकेद्वारे क्रॉपमध्ये जातात तेथे तात्पुरता अन्नसाठा होतो व पुढे ते स्नायुयुक्त गिझार्डमध्ये ढकलले जाते. तेथे त्याचे चर्वण होऊन भुग्यात रुपांतर होते. या प्रक्रियेत गिळलेल्या मातीतील वालुकामय कणांचीही मदत होते. या भुग्यामुळे अन्नकणांच्या पृष्ठभागात वाढ होऊन पचनक्रियेस हातभार लागतो. असे अन्नकण पुढे आतडयात आल्यावर निरनिराळया पाचके व उपयुक्त जिवाणू यांच्यामुळे जैविक, रासायनिक प्रकिया होऊन त्याचे विघटन होते. पचनक्रियेत योग्य तापमान व सामू राखण्याशिवाय बॅक्टेरिया कार्यपवण होवू शकत नाहीत. घशाच्या मागील बाजूस कॉल्सिफेस नावाच्या ग्रंथील अन्ननलिकेत जोडलेल्या असतात. या ग्रंथीतून पाझरणा-या कारबॉनिक अनहॅड्रज नावाच्या द्रव्यामुळे शरीरातील सामू योग्य प्रमाणात राखण्यास मदत केली जाते, जेणे करुन पाचके कार्यप्रवण राहातात. गाडूळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृद गंधयुक्त, काळसर रंगाच्या, वजनास हलके आणि कणिदार दिसणा-या विष्टेस ''वर्मिकंपाष्ट '' असे म्हणतात. एक गांडूळ दररोज त्याच्या वजनाइतकी विष्टा शरीराबाहेर टाकते. त्याच्याशिवाय गांडूळाच्या विष्टेतून नत्र, स्फुरद, पालाश, चुनखडी, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम ही मूलद्रव्ये शेजारच्या जमिनीपेक्षा अधिक प्रमाणात पिकांना मिळतात, शिवाय गाडूळाच्या विष्टेतील सामू शेजारच्या जमिनीपेक्षा अधिक उदासीन असतो. गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते, कारण जमिनीतील खनीज नत्राचे प्रमाण वाढते आणि तो नत्र पिकांना मिळतो, गांडूळाच्या शरीराच्या कोरडया वजनाच्या ७२ टक्के प्रथिने असतात. मेलेल्या गांडूळाचे शरीर जमिनीत कुजल्यानंतर पिकांना नत्र मिळतो. म्हणजेच एका मेलेल्या गांडूळापासून १०मिलीग्रॅम नायट्रेट मिळते. जमिनीत गांडूळांची संख्या ३७.५ लाख असल्यास हेक्टरी सुमारे २१७ किलो सोडीयम नायट्रेट इतका नत्र मिळतो. पण प्रत्यक्षात फार थोडे गांडूळ मरतात. सेंद्रीय पदार्थातील कार्बन, नायट्रोजन गुणोत्तर २०.१ किंवा त्यापेक्षा कमी झाल्याशिवाय त्यातील नत्र पिकांना मिळत नाही. हे गुणोत्तर कमी करण्याचे कार्य गांडूळे करीत असतात.
गांडूळ आणि जमिनीची रासायनिक सुपीकता
गांडूळे त्याचे निम्म्या वजनाचीमाती दररोज खात असतात. गांडूळे जमिनीत बिळे करतात. तेथील माती खाऊन मार्ग मोकळा करतात. एक चौरस मीटर जागेतील गांडूळे दरवर्षी ३.६ किलो माती खातात. त्यामुळे जमिनीच्या पृष्टभागावर ६० वर्षात १५ से.मी. जाडीचा थर तयार होतो. काही गांडूळे त्यांचे बिळातच विष्ठा टाकतात. गांडूळे माती खातात तेंव्हा सेंद्रीय पदार्थाबरोबरमातीचे कण त्याचे शरीरात आणखी बारीक होतात, त्यामुळे त्यांचे विष्टेतील मातीचे कण बारीक असतात. जमिनीच्या खोल थरातील माती गांडूळे पृष्टभागावर आणून टाकतात. याप्रमाणे गांडूळे हेक्टरी २ ते २.५ टन मातीची उलथापालथ करतात. गांडूळाच्या विष्ठेतील मातीची कणीदार संरचना असते, त्यामुळे ही विष्ठा पाण्याने वाहून जात नाही. जमीन घट्ट बनत नाही. ओली व कोरडी जमीन भुसभुशीत राहाते. कणीदार संरचनेमुळे पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत मुरते, पृष्ठभागावरुन वाहून जात नाही. जमिनीतील पाण्याचा योग्यप्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते. गांडूळे नसलेल्या जमिनीपेक्षा गांडूळे असलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा ४ ते १० पटीने अधिक होतो. गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व त्यामुळे सहजिकच पिकाचे उत्पादन वाढते. गांडूळामुळे जमिनीची जलधारणाशक्ती २० टक्के ने वाढते.
पिकांना अधिक पाणी मिळते व पर्यायाने पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही. गांडूळाच्या विष्टेत नत्राचे प्रमाण आजूबाजूच्या मूळ जमिनीच्या तुलनेत पाच पटीने जास्त असते. तर स्फुरद सात पटीने व पालाश अकरा पटीने जास्त असतात. ही प्रमुख अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध अवस्थेत मिळतात. त्याशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियम उपलब्ध अवस्थेत दुप्पट प्रमाणात विष्टेत असतात.
पिकाचे पोषक अन्नद्रव्ये
|
गांडूळांची विष्ठा
|
जमिनीचा थर
|
शेरा
वाढीचे प्रमाण
|
० ते १५ सें.मी.
|
१५ ते २० सें. मी.
|
सेंद्रीय पदार्थ (नत्रयुक्त)
|
१३.१
|
९.८ टक्के
|
४.९ टक्के
|
दुप्पट
|
उपलब्ध स्फुरद (पीपीएम)
|
१५०
|
२१
|
८
|
दहापट
|
उपलब्ध पालाश (पीपीएम )
|
३५८
|
३२
|
२७
|
बारापट
|
उपलब्ध मॅग्नेशिम (पीपीएम)
|
४९२
|
१६२
|
६९
|
चौपट
|
उपलब्ध कॅल्शियम (पीपीएम)
|
२७९३
|
९९३
|
४८१
|
चौपट
|
उपलब्ध पीएच
|
७
|
६.४
|
६.१
|
--
|
जैविक सुपीकता
गांडूळाच्या विष्ठेतील ''बॅक्टैरिया'' या जिवाणूंचे प्रमाण जमिनीतील जिवाणूंच्या संख्येच्या तुलनेने १३ पट अधिक होते, असे पानोमरेव्हा या शास्त्रज्ञास १९६२ साली आढळून आले आहे. जमिनीत हे जंतू ५.४ दशलक्ष प्रती ग्रॅम इतके होते, याशिवाय फंगस व ऍक्टिनोमायसीटस् काही प्रमाणात तर ऍझोटोबॅक्अर हे नत्र स्थिर करणारे जिवाणू ब-याच मोठया संख्येने गांडूळ विष्ठेत आढळून आले. सेंद्रीय पदार्थाचे जिवाणूंच्या सहाय्याने विघटन कार्य विष्टा बाहेर टाकल्यानंतरही बरेच दिवस ब-याच वेगाने चालू असते. त्यांची विष्टा त्यातील जिवाणूंचे आजूबाजूच्या जमिनीवर प्रसार करण्याचे केंद्र बनते. गांडूळाच्या विष्टेत असलेले ''नेकार्डिया, ऑक्टिनोमायसिट्स व स्टेप्टोमायसेस'' सारखे जिवाणू अँटीबायोटिकस्स सारखे परिणामकारक असतात. अशाप्रकारे गांडूळाची आतडी सुमारे एक हजार पटीपेखा अधिक संख्येने जिवाणूंची संख्या वाढवून एक प्रकारे नैसर्गिक रिऍक्टरचे (Bio-reactor) काम करतात. तर विष्टेद्वारा बाहेर पडलेले सुक्ष्म जिवाणू जमिनीची जैविक सुपीकता वाढविण्याचे प्रसार केंद्राचे कार्य करतात.
भौतिक सुपीकता
जमिनीचा पोत (Structure) सुधारण्याचे कार्य माती खाऊन त्यातील जाड वाळूसारख्या कणांचे आतडयांत भरडून पोयटयाचे कणांत व पोयटयाच्या आकाराच्या कणांचे चिकण मातीच्या आकारमानासारख्या कणात भरडून बारीक करण्याचे कार्यही गांडूळे करतात. शिवाय खालच्या थरातील माती वर आणून ती विष्टेच्या स्वरुपात जमिनीच्या पृष्ठभागावर टाकतात. काही वर्षांनी जमिनीचा वरचा १० ते १५ सें.मी. जाडीचा थर कणांची चांगली जडण घडण झालेल्या दाणेदार मातीचा बनतो. हे दाणे (Aggregate) पाण्यातही स्थिरावस्थेत राहतात. त्यांचा व्यास १ ते २ मि. मि. असतो.
गांडूळखत निर्मिती
१. गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.
२. खड्डयाच्या जवळपास मोठी वृक्ष/झाडे नसावीत. कारण झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात.
३. गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे.
छप्पर बांधणीची पद्धती
ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरिता ८ फूट उंच, १० फूट रुंद व ३० ते ४० फूट लांब, आवश्यकतेनुसार लांबी कमी जास्त चालू शकते. छपरात / शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूंना कूड घालावा.
गांडूळ पालनाची पद्धती
छपरामध्य दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्यांच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. त्या दोन ओळीवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करुन सहा इंच उंचीचा थर द्यावा. त्यामुळे गांडूळांना जाड कच-यात आश्रय मिळेल. दुसरा थरचांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्यास्लरीचा द्यावा. तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडूळांना खाद्य म्हणूनकामी येईल. बीज रुप म्हणून या थरावर साधारण ३ x ४० फूटासाठी १० हजार गांडूळे समान पसरावीत. त्यावर कच-याचा १ फूट जाडीचा थर त्यावर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कच-याचा द्यावा. ओल्या पोत्याने / गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.
बेड - थर १. जमीन
२. सावकाश कुजणारा सेंद्रीय पदार्थ २''-३'' जाडीचा थर (नारळाच्या शेंडया, पाचट, धसकट इत्यादी )
३. कुजलेले शेणखत/गांडूळखत २''-३'' जाडीचा थर
४. गांडूळे
५. कुजलेले शेणखत / गांडूळखत जाडीचा थर
६. शेण, पालापाचोळा वगैर १२'' जाडीचा थर
७. गोणपाट शेणखतामध्ये गांडूळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोडयाची लिद यापासूनसुध्दा खत तयार होते. गांडूळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रीय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरुन गांडूळ खत तयार करता येते. गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले
पिकाचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडूळासाठी वापरताना त्यामध्ये १:३ या प्रमाणात शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडूळखाद्य नेहमी बारी करुन टाकावे, बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसूध्दा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्डयामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे. म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जिवाणू संवर्धके (बॅक्टेरीयल कल्चर) वापरुन खत कुजविण्याच्या प्रक्रियेस वेग देता येतो. त्यासाठी १ टन खतास अर्धा किलो जिवाणू संवर्धके वापरावीत. या व्यतीरिक्त गांडूळखाद्य १ किलो युरिया व १ किलो सुपर फॉस्फेट प्रती टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होवून गांडूळ खत लवकर तयार होईल.
गांडूळ खाद्य
इतर प्राण्याप्रमाणे गांडूळांना खाण्याकरिता त्यांचे आवडी-निवडीचे अन्न लागते. त्यामुळे गांडूळांची वाढ व प्रजोत्पादन झपाटयाने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, प्राण्यांची विष्टा (कोंबडयांची विष्टा वगळता ) कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडूळाचे आवडीचे आहेत.
गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत
गांडूळखत हाताला भुसभुशीत व हलके लागते अशा स्थितीत गांडूळ खत तयार झाले असे समझावे खत तयार झाल्याचे दिसून आल्यावर दोन दिवस पाणी मारणे बंद ठेवावे. म्हणजे वरचा थर कोरडा झाल्याने गंडूळे खाली जातात. नंतर उघडया जागते एकदा हलक्या हाताने काढू ढिग करावा. उजेड दिसताच सर्व गांडूळे ही खालच्या बाजूला जमा होतात. नंतर वरवरचा थर परत एकदा थंड जागेत साठवण्यास ठेवावा आणि परत वरील पद्धतीचा क्रमाक्रमाने अवलंब करुन गांडूळांना खद्य पुरवून खताची निर्मीती सुरु ठेवावी. गांडूळखत वेगळे करताना कुदळी, टिकाव, फावडे, खुरपे, यांचा वापर करुन नये, जेणे करुन गांडूळांना इजा पोहोचणार नाही. या गांडूळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्याची विष्टा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते असे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळया पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष जमिनीत टाकावे.
गांडूळखत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक
अ.क्र.
|
गांडूळखत
|
शेणखत / कंपोस्ट खत
|
१
|
गांडूळखत लवकर तयार होते (गांडूळे गादी वाफयावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे)
|
मंदगतीने तयार होते (जवळ जवळ ४ महिने लागतात)
|
२
|
घाण वास, माशा, डास यांचा उपद्रव नसून आरोग्याला अपायकारक नाही
|
घाण वास, माशा, डास यांपासून उपद्रव संभवतो
|
३
|
जागा कमी लागते
|
जागा जास्त लागते
|
४
|
४ x १ x ७५ फूटआकाराच्या गादीवाफया पासून ( म्हणजेच ३०० घनफूट ) दर पंधरा दिवसाला ३ टन खत मिळते
|
३ x १० x १० फूट आकाराच्या खड्डयापासून दर महिन्यांनी १० टन खते मिळते.
|
५
|
उर्जा, गांडूळखत, द्रवरुप खत
|
कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत.
|
६
|
हेक्टरी मात्रा ५ टन लागते
|
हेक्टरी मात्रा १२.५० टन लागते
|
७
|
तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य जोमात होते.
|
तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद असते.
|
८
|
नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के
|
नत्र उपलब ०.५ ते १.५ टक्के
|
९
|
स्फूरद उपलब्ध १.५ ते २ टक्के
|
स्फूरद उपलब्ध ०.५ ते ०.९टक्के
|
१०
|
पालाश उपलब्ध १.५ ते २ टक्के
|
पालाश उपलब्ध १.२ ते १.४ टक्के
|
११
|
सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात
|
सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात
|
१२
|
गांडूळे विक्री करुन अतिरिक्त उत्पन्न मिळते
|
कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही.
|
गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग
अ) माती च्या दृष्टिने
- गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
- गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
- गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
- जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.
- जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
- गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
- जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
ब) शेतकयांच्या दृष्टीने फायदे
- इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
- जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
- पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
- झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
- रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
- मजूर वर्गावर होणारा खर्च कमी.
- गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलबध होते.
क) पर्यावरणाच्या दृष्टीने फायदे
- माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदुषण कमी होते.
- जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
- पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते.
- रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते.
- कच-याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.
ड) इतर उपयोग
- गांडूळापासून किंमती अमिनो ऍसिड्स, एंझाईमस् आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.
- पक्षी, कोंबडया, पाळी जनावरे, मासे यांना उत्तम प्रती खाद्य म्हणून गांडूळ वापरता येतात.
- आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो.
- पावडर, लिपस्टिक, मलमे यांसारखी किमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडूळांचा वापर केला जातो.
- परदेशात पिझाज, आमलेट, सॅलेड यासारख्या खाद्य वस्तूमध्ये प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी गांडूळांचा उपयोग करतात.
- गांडूळांच्या कोरडया पावडरमध्ये ६० ते ६५ टक्के प्रथिने असतात. तिचा अन्नात वापर करता येतो.
गांडूळांच्या संवर्धनासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी
- एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
- बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रुंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
- संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
- गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
- गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरुन इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्वाच्या बाबी
- शेणखत, घोडयाची लीद, लेंडी खत , हरभ-याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
- स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष , वाळलेला पालपाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
- हरभ-याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.
- गोरगॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजी
- गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते कीट कनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरु नयेत.
- गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकवणे आवश्यक आहे.गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रीय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रीय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.
- योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेते घट येते.
गांडूळांचा वापर करुन सेंद्रीय खत निर्मिती या तंत्रज्ञानाचा वापर करुन सन १९९३-९४ पासून कृषि विभागामार्फत तालुका बीज गुणन प्रक्षेत्रावर गांडूळ खत/ कल्चर उत्पादन कार्यक्रम कार्यान्वित केला आहे. आतापर्यंत १७९ तालुका बीज गुणन केंद्रावर हा कार्यक्रम सुरु असून तालुक्यातील शेतक-यांना लगतच्या प्रक्षेत्रावर गांडूळ खत/कल्चर उपलबध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रक्षेत्रावर उत्पादीत केलेले गांडूळ कल्चर रुपये ४००/- प्रतीहजार व गांडूळ खत रुपये २०००/- प्रती टन या दराप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. तसेच कृषि चिकित्सालयामार्फत गांडूळ खत उत्पादनाचे प्रशिक्षण / प्रात्यक्षिक शेतक-यांना देण्यात येत
स्रोत : महाअॅग्री