जमिनीच्या १५, ३०, ४५ आणि ६० सेंटिमीटर खोलीवरील तापमानाच्या नोंदी वेधशाळेत सॉईल थर्मामीटरद्वारे मोजल्या जातात. मातीच्या खोलीनुसार तापमान बदलते. पृष्ठभागावरील मातीचे तापमान अधिक असते, तर ४५ ते ६० सेंटिमीटर खोलीतील तापमानाच्या नोंदीतही थोडाफार फरक जाणवतो. जमिनीतील खोलीनुसार तापमान बदलत असल्याने त्याचा परिणाम जमिनीतील जिवाणूंच्या क्रियाशक्तीवर होतो. जमिनीत असंख्य जिवाणू आपल्यापरीने कार्यभार उरकत असतात. काही जिवाणू नत्राच्या उपलब्धतेसाठी कार्य करतात, तर काही जिवाणू सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात.
सेंद्रिय पदार्थांचे विघटन
जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण पाच टक्के असल्यास त्या जमिनीत जिवाणूंचे प्रमाणही विपुल प्रमाणात असते, त्याचप्रमाणे जमिनीचे तापमान संतुलित राखण्यास मदत होते. तापमानवाढीने सेंद्रिय पदार्थांचे मोठ्या प्रमाणात विघटन होते. सेंद्रिय पदार्थ जास्त तापमानात भाजून निघतात आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण घटते
रासायनिक खतांचा वापर
गेल्या अनेक वर्षांत केवळ रासायनिक खतांचा वापर वाढत आहे आणि सेंद्रिय खतांचा वापर आणि पुरवठा कमी होत आहे. त्याचा परिणाम जमिनीच्या रासायनिक गुणवत्तेवर होताना दिसून येत आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक गुणधर्मांत बदल होताना दिसत आहेत. जमिनीच्या वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. रासायनिक खतांचा वापर प्रामुख्याने जमिनीच्या वरच्या थरात केला जातो. सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांचा पुरवठा केल्यास त्याचे परिणाम चांगले दिसतात; मात्र फक्त रासायनिक खतांचाच सतत वापर केल्यास त्याचे परिणाम जैविक गुणवत्तेवर होऊन जिवाणूचे कार्य मंदावताना दिसून येते.
जमिनीतील क्षारांचे प्रमाण
फक्त रासायनिक खतांचा वापर आणि अतिरिक्त पाणी वापर आणि तापमानवाढ याचा परिणाम जमिनीतील क्षारांवर होतो. जमिनीतील पाण्याची वाफ होऊन पाणी वाफेद्वारे / बाष्पीभवनाद्वारे जमिनीला सोडून जाताना क्षार वरच्या थरात येऊन तेथे जमा होतात. त्यांना तेथेच सोडून पाणी वाफेद्वारे निघून जाते, त्यामुळे तेथे क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे काही जमिनींच्या पृष्ठभागावर आपणास पांढरट क्षारांचा थर दिसतो. त्या वेळी तेथील मातीचे रासायनिक गुणधर्म बदलल्यास जमिनीच्या वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम दिसतो आणि पिकांवर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे पानांवर दिसू लागतात. त्या आधारे जमिनीच्या आम्ल-विम्ल निर्देशांकावरून तत्काळ लक्षात येते, की जमीन खारवट आहे की क्षारयुक्त आहे की चोपण होत आहे. या बदलाकडे दुर्लक्ष केल्यास जमिनी नापिक होतात, त्याचे प्रमाण मागील लेखात पाहिले आहे.
बदलत्या हवामानात जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी हिरवळीची खते
बदलत्या हवामानात पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचे तापमान ज्याप्रमाणे वाढत आहे, त्याचप्रमाणे जमिनीचे तापमान वाढत आहे. जमिनीचे तापमान संतुलित राखण्यासाठी, जमिनीतील जिवाणूंची क्रियाशक्ती वाढवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी यापुढील काळात हिरवळीच्या खतांवर जोर द्यावा लागणार आहे. सेंद्रिय खतांचा पुरवठा आवश्यक त्या प्रमाणात करणे शक्य होत नसल्याने हिरवळीच्या खतांद्वारे जमिनीचे संतुलन राखण्यासाठी आणि जमिनीचे वातावरण सुधारण्यासाठी यापुढे प्रयत्न करणे गरजेचे ठरणार आहे. ताग, धैंचा, ग्लिरिसिडीयाची पाने यांचा उपयोग हिरवळीची खते म्हणून केला जातो. ताग पेरणीनंतर जशी त्या पिकाची वाढ जोमाने होते, तशी त्याच्या मुळ्यांवर नत्र स्थिरीकरणाची क्रिया वाढते. संपूर्ण ताग पेरलेले क्षेत्र जेव्हा सर्व क्षेत्र व्यापते, तेव्हा सूर्यप्रकाशही जमिनीवर जाऊ शकत नाही, त्यामुळे हरळी लव्हाळा ही बहुवर्षीय तणे नियंत्रणात राखली जातात. जेव्हा तागाचे पीक फुलोऱ्यात येते, तेव्हा ते नांगरटीनंतर सरीत कापून गाडले असता सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. जिवाणूंना जमिनीत अन्न उपलब्ध झाल्याने त्यांची क्रियाशक्ती वाढून विघटनाचे कार्य केले जाते. पुढे त्यातूनच पिकांना सर्व प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. याचप्रमाणे धैंचा आणि ग्लिरिसिडीयाची पाने जमिनीत गाडल्यास फायद्याचे ठरते. अशा प्रकारे बदलत्या हवामानात जमिनींची काळजी घेऊन सुपीकता टिकविणे महत्त्वाचे ठरते.
हिरवळीची खते आणि जमिनीतील अन्नद्रव्ये
जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण जेव्हा घटत आहे आणि काही अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे, त्या वेळी हिरवळीची खते जमिनीची सुपीकता टिकवण्यास उपयुक्त आहेत. जमिनीचा सामू संतुलित राखण्यात ती मदत करतात, त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. हिरवळीच्या खतांमधून वाढणारे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जिवाणूंना खाद्य म्हणून उपयोगी पडते, त्यामुळे जिवाणूंची क्रियाशक्ती वाढते.
भात खाचराच्या बांधावर ग्लिरिसिडीयाची लागवड
भात खाचराच्या बांधावर ग्लिरिसिडीयाची लागवड करून त्याची पाने चिखलणीच्या वेळी शेतात घातल्यास शेतीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढेल आणि जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतील, जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होईल.
हिरवळीची खते आणि भौतिक गुणधर्म
जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जेव्हा वाढते, तेव्हा जमिनीची जलधारणाशक्ती वाढते, त्यामुळे आपोआप भौतिक गुणधर्म बदलण्यास मदत होते. जमिनीची जडणघडण आणि भौतिक गुणधर्म हे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करतात. तीन वर्षांतून एकदा हिरवळीची खते घ्यावीत ः शेती क्षेत्र लक्षात घेऊन प्रत्येक जमिनीस तीन वर्षांतून एकदा तरी हिरवळीची खते घेणे फायद्याचे ठरते. ताग अथवा धैंचा जे शक्य असेल, त्याप्रमाणे हिरवळीच्या खतासाठी पिकाची निवड करावी. अशा प्रकारे शेती नियोजन केल्यास शेती किफायतशीर आणि फायद्याची होईल.
९८९००४१९२९
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)