অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्ष पिक - संजीवके

सायकोसील(सी.सी.सी./ क्लोर मेक्वाट क्लोराईड):

सायकोसील संजीवक लिहोसीन ह्या नावाने परिचित आहेत.या वाढ निरोधकाचा वापर द्राक्ष उत्पादनात एप्रिल छाटणी तसेच ऑक्टोबर छाटणी नंतर सर्रास केला जातो.

उद्देश:

१. एप्रिल छाटणीनंतर वेलीवर आलेली नवीन फुट सहा ते सात पानाची असताना सायकोसील २५० पी.पी.एम.तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी घेतल्यास वेलीमधील सायटोकायनिन्स व जीए यांच्या गुणोत्तरात वाढ होऊन फलधारणा होण्यास मदत होते.तसेच काड्यांच्या पे-यामधील अंतर कमी केले जाते.

२. या संजीवकाच्या वापरामुळे वेलींची पाने जाड होतात व पानांमध्ये हरितद्रवव्याचे प्रमाण वाढते. यामुळे पानांच्या प्रकाश संश्लेषणांच्या कार्यात वाढ होते. तसेच लिहोसीन वापर केल्याने पानातून होणा-या बाष्पत्सर्जनाचा क्रियेचा वेग कमी केला जात असल्याने वेल पाणी टंचाईच्या काळात सुद्धा तग धरून राहू शकते.

३. फळ छाटणीनंतर खोडातील अन्नरसाचा ओघ घडाच्या वाढीसाठी ओळून घडाचे योग्य पोषण होण्यासाठी या संजीवकाचा वापर केला जातो. घड पोपटी रंगाचे असतांना या संजीवकाचा २५० पीपीएम एवढया तीव्रतेची एक फवारणी घेतल्यास फुलगळ कमी होऊन फळधारणा वाढण्यास मदत होते.

वापरतांना घ्यावयाची काळजी

१.लिहोसीन या संजीवकाची वेलीवर फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा  असावा.

२.एप्रिल छाटणीनंतर आलेल्या नवीन फुट ६ ते ७ पानावर असतांना व ऑक्टोबर छाटणीनंतर आलेल्या फुटीवरील घड पोपटी रंगाचा असतांना या संजीवकाचा वापर करावा.

३.या संजीवकाचा वापर योग्यवेळी केल्यास २५० पीपीएम तीव्रतेचे द्रावण चांगला परिणाम दाखवते,जर फवारणीस थोडा उशीर झाल्यास ३७५-४५० पीपीएम एवढया तीव्रतेचे द्रावण वापरावे.मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये ५०० पीपीएम पेक्षा जास्त तीव्रतेचे द्रावण वापरू नये.

४.घड फुलो-यानंतर ८ ते १० दिवसांच्या कालावधीमध्ये या संजीवकाचा वापर करु नये.कारण याच काळात मण्यामध्ये पेशी विभाजनाची क्रिया फार वेगाने होत असते.याच्या वापरामुळे पेशीविभाजनाच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो.म्हणून या काळात त्याचा वापर करु नये.

५.एखाद्या वेळेस चुकून जास्त तीव्रतेच्या लिहोसीन द्रावणाची फवारणी केली गेली तर,२०० ग्रम युरिया १०० लिटर पाण्यात विरघळून पानावर फवारणी करावी.किंवा १० पी.पी.एम एवढया तीव्रतेच्या जीएच्या द्रावणाची फवारणी करावी.

द्रावण तयार करण्याची पद्धत

हे संजीवक लिहोसीन या नावाने ५०% तीव्रतेच्या द्रावणामध्ये बाजारात मिळते व पाण्यात पूर्णपणे मिसळते.या संजीवकाचे वेगवेगळ्या पीपीएमचे द्रावण खालीलप्रमाणे तयार करावे.

५०० पीपीएम = १०० मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी

२५० पीपीएम = ५० मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी

३७५  पीपीएम = ७५  मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी

४५० पीपीएम = ९० मिली लिहोसीन + १०० लिटर पाणी

जिब्रेलिक अ‍ॅसिड (जी.ए. )

या संजीवकाचा वापर द्राक्ष उत्पादनात फार वर्षापासून केला जात आहे,शास्रज्ञांनी आता पर्यत जवळ-जवळ ६० प्रकारच्या जीएचा शोध लावला आहे. परंतु  GA 3 याचा वापर द्राक्ष उत्पादनात मोठया प्रमाणात केला जातो. जीएचा वापर पामुख्याने ऑक्टोबर छाटणीनंतर केला जातो.

वापरण्याचा उद्देश:

१. याचे मुख्य कार्य म्हणजे मण्यातील पेशींची संख्या न वाढवता त्या लांब व मोठया केल्या जातात. जीएच्या १०-१५ पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची पहिली फवारणी घडांचा पोपटी रंग जाऊन हिरवा होऊ लागल्यावर म्हणजेच फुलोरा उमलण्याच्या अगोदर द्यावा या मुळे मोहराची विरळणी केली जात असल्याने घड विस्तारला जातो व मणी मोठे होण्यास चांगला वाव मिळतो.

२. घडतील फुलोरा उमलण्यास सुरवात होतांना म्हणजे घडतील फुलांच्या २५% टोप्या पडल्यावर २५ पीपीएमची  बुडवणी व तेवढयाच पीपीएमच्या जीएची बुडवणी घडतील ५०% फुलांच्या टोप्या पडल्यावर करावी. जीएच्या शेवटच्या ३०/४० पीपीएमच्या दोन बुडवण्या ७५% व १००% फुलांच्या टोप्या पडल्यावर कराव्यात. या मुळे मण्याचे देठ लांब होतात व मणी लांब होतात. मण्यांची चागली फुगवण होऊन मणी एकसारखे वाढतात. एकूण जीएचा वापर १०० ते १२५ पीपीएम पेक्षा जास्त होऊ देऊ नये.

वापरतांना घ्यावयाची काळजी

१. फळधारणा झाल्यानंतर १०-१२ दिवसांच्या कालावधीत मण्यामध्ये पेशी विभाजनाची क्रिया जोरात चालू असते. म्हणून या कालावधीतच जीएचा वापर करावा. म्हणजे आपेक्षित परिणाम दिसून येतात, नंतर वापर केल्यास काहीही उपयोग होत नाही.

२. जीएचा वापर केल्यानंतर आपेक्षित परिणामासाठी किमान १० तास पाऊस पडू नये.

३. ज्या दिवशी जीएचे द्रावण तयार केले त्याच दिवशी पूर्णपणे वापरावे. तसेच जुना जीए वापरू नये. नामांकित कंपनीचाच जीए वापरावा.

४.फुलो-याच्या काळात जास्त तीव्रतेच्या जीएचा वापर केल्यास शॉट बेरीज प्रमाण वाढते.

५.जीएच्या द्रावणात सीपिपियु व्यतिरिक्त इतर कोणतेही संजीवक किंवा रसायन मिसळणे टाळावे.

६.घडावर केवडा इत्यादी सारखे रोग असल्यास जीएची बुडवणी टाळावी.

द्रावण कसे तयार करावे

वेगवेगळ्या पीपीएमचे द्रावण करावयाचे झाल्यास १ ग्रॅम, जीए ३० मिली अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून त्यात स्वच्छ व क्षार विरहित पाणी मिसळून ते १ लिटर करावे म्हणजेच १००० पीपीएम एवढ्या तीव्रतेचे मुळ द्रावण (Stock Solution) तयार होते.

१० पीपीएम = १ ग्रॅम जीए, १ लि. मूळ द्रावण + ९९ लि. पाणी = १०० लि.

२५  पीपीएम = १ ग्रॅम जीए, १ लि. मूळ द्रावण + ३९ लि. पाणी = ४० लि.

४०  पीपीएम = १ ग्रॅम जीए, १ लि. मूळ द्रावण + २४ लि. पाणी = २५ लि.

या संजीवकाचा परिणाम प्रामुख्याने वातावरणाचे तापमान, जमिनीतील ओलावा, फुलो-याच्या विविध अवस्था, द्राक्षाची जात, रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि वेलीवरील घडांची संख्या यावर अवलंबून असतो.

६- बेन्झील अ‍ॅडेनीन (६ बीए)

हे संजीवक सायटोकायनीन्स या गटांत मोडते. याचे मुख्य कार्य म्हणजे पेशी विभाजन करणे हे आहे.सायटोकायनीन्स मुखत्वे वेलींच्या मुळामध्ये तयार होतात. एप्रिल छाटणीनंतर तसेच ऑक्टोबर छाटणीनंतर या दोन्ही वेळी ६- बीएचा वापर प्रामुख्याने केला जातोच.

उद्देश:

१.एप्रिल छाटणीनंतर आलेल्या फुटींचा शेंडा थांबविल्यानंतर सूक्ष्म घडनिर्मितीच्या वेळी या संजीवकाचा ५ ते १० पीपीएम एवढया तीव्रतेच एक फवारा घेतल्यास वेलीची पांढरीमुळी अधिक जोमाने चालते व जास्त कार्यक्षम बनते. पानांचे कार्य व पांढ-या मुळीचे कार्य यांचा समन्वय योग्यरित्या साधला जाऊन सूक्ष्म घडनिर्मिती जोमाने होते.

२.ऑक्टोबर छाटणीनंतर घडांमध्ये फळधारणा झाल्यानंतर घडांवर तसेच घडाच्या पुढील पानांवर ५ पीपीएम एवढया तीव्रतेच्या ६-बीएचा एक फवारा घेतल्यास मण्यांची फुगवण चांगली होते. (या कालावधीमध्ये लांब मण्यांच्या जातीमध्ये शक्यतो ६-बीए टाळावा). गर्डलिंग करण्यास उशीर झाल्यास ६- बीएचा १० पीपीएमच्या द्रावणाचा फवारा घेतल्यास गर्डलिंगमुळे जी मण्यांची फुगवण होते ती फुगवण याच्या वापरामुळे मिळवता येते.

या संजीवकाचा वापर जास्त प्रमाणात केल्यास पानांची गळ होते.म्हणून याचा काळजीपूर्वक वापर करावा. ६-बीएच्या जास्तीत जास्त दोन फवारण्या घ्याव्यात.मात्र एकूण वापर २० पीपीएमपेक्षा जास्त करु नये.

द्रावण कसे तयार करावे

६- बीए एक विरघळण्यासाठी आयसो प्रोपाइल अल्कोहलचा वापर करतात. १ ग्रॅम ६-बीए सुरवातीस आयसो प्रोपाइल अल्कोहोलमध्ये विरघळून घेऊन नंतर लागणारे पाणी घालून पुढील प्रमाणे वेगवेळ्या तीव्रतेचे द्रावण तयार करावे

५ पीपीएम = १ ग्रॅम  ६-बीए  + २०० लि. पाणी

१० पीपीएम = १ ग्रॅम ६-बीए  + १०० लि. पाणी

२० पीपीएम = १ ग्रॅम ६-बीए + ५० लि. पाणी

सिपीपीयू (फोरक्लोरफेन्यूरॉन)

सिपीपीयू हे एक संजीवक असून याचा सायटोकायनीन्स या गटांत समावेश होतो. याचे मुख्य कार्य म्हणजे पेशी विभाजन करून मण्यांचा आकार वाढवण्यास मदत करणे. निर्यातीसाठी लागणारी मण्यांची साईज याचा वापर जीए बरोबर करून मिळवता येते.

उद्देश:

१.सिपीपीयू वापर जीएबरोबर केल्यास मण्यांच्या वजनात वाढ होते, मणी जास्त गोलाकार व टपोरे बनतात आणि त्यांच्या आकारमानात वाढ होते. जीएच्या सतत वापरामुळे घडामध्ये शॉट बेरीज तयार होणे, कमी घडनिर्मिती होणे, मणी तडकणे व काढणीनंतर होणारी मण्यांची कुज इत्यादी दुष्परिणाम होत असल्याने जीएचा वापर कमी करून मण्यांची चांगली फुगवण मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो.

२.निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी जेवढी जीएची मात्रा द्यावी लागते तेवढी मात्रा सीपीपीयूचा वापर केल्यास द्यावी लागत नाही.

३. सिपीपीयूच्या वापरामुळे काढणीनंतर वाहतुकीच्या दरम्यान होणारी मण्यांची गळ थांबवली जाते. तसेच घडाचा देठ मजबूत होतो. घडांचे देठ शेवट पर्यंत हिरवेगार राहतात व माल ताजा राहून एकसारखा दिसतो.

४.द्राक्ष मण्यांच्या सालीत तयार होणारे अ‍ॅन्थोसायनिन्स नावाचे रंग द्रव्य थोपून धरण्यास मदत करते सीपीपीयु  संजीवक द्राक्षमण्यात रंगद्रव्य तयार होऊ देत नसल्यामुळे पिंक बेरीज या समस्येवर मात करता   येईल अशी अपेक्षा वाटते. मात्र रंगीत जातीच्या द्राक्षांमध्ये याच्या वापरामुळे मण्यातील रंगद्रव्य कमी होऊन त्यांचा रंग फिकट होण्याची शक्यता वाटते. म्हणून याचा वापर रंगीत (काळ्या)  द्राक्षांच्या जातीमध्ये जरा जपूनच करावा.

५.सिपीपीयूच्या वापरामुळे नंतरच्या घडनिर्मितीवर काहीही अनिष्ठ परिणाम होत नाही.

सिपीपीयूच्या संजीवकाच्या वापरामुळे घडाची पक्कवता १५ ते २० दिवस उशिरा येते. याच्या जास्त वापरामुळे मण्यांची साल जाड होण्याची शक्यता असते व मण्यांना थंडीच्या दिवसात भेगाही (मणी तडकणे) पडू शकतात म्हणून याचा वापर काळजीपूर्वक करावा.

घडतील मण्याची साईज ३ मिमी असताना २५ पीपीएम जीए बरोबर २पीपीएम सीपीपीयु मिसळून पहिला डीप घ्यावा व मणी ६ मिमी साईजचे असतांना ३ पीपीएम सीपीपीयु मिसळून २५ पीपीएम जीचा दुसरा डीप घ्यावा. यामुळे मण्यांची फुगवण चांगली होते व उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगावरून दिसून आले आहेत.

द्रावण कसे तयार करावे

बाजारात सीपीपीयु हे १००० पीपीएम या तीव्रतेच्या मूळ द्रावणात २५० मिली, ५००मिली किंवा १ लिटर मध्ये उपलब्ध आहे. १.५ मिली सीपीपीयु १ लिटर पाण्यात मिसळ्यास ते १.५ पीपीएमचे द्रावण तयार होते किंवा ३ मिली सिपीपीयू १ लिटर पाण्यात मिसळल्यास ते ३ पीपीएमचे द्रावण तयार होते.थोडक्यात आपणास जेवढया पीपीएमचे द्रावण तयार करावयाचे आहे तेवढे मिली सिपीपीयू घेऊन एकूण १ लिटर द्रावण तयार करावे.

इथ्रेल (इथेफॉन)

हे संजीवक ग्रोथ इनहिबीटर्स (इथीलीन) या गटात मोडते. याचे रासायनिक नाव टू क्लोरोइथाईल फॉस्फोनिक  अ‍ॅसिड असे आहे.

उद्देश:

१.ऑक्टोबर छाटणीपूर्वी सुमारे दोन आठवडे १००० ते २५०० पीपीएम एवढया तीव्रतेच्या इथ्रेलची फवारणी केल्यास वेलीची पानगळ होण्यास मदत होते. यामुळे नेमक्या डोळयांवर छाटणी करणे सुलभ जाते. तसेच छाटणीनंतर काडीवरील डोळे लवकर फुटण्यास मदत होते.

२.द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरू लागल्यावर ५०० पीपीएम एवढया तीव्रतेच्या इथ्रेलली फवारणी घडावर करावी. यामुळे रंगीत जातींच्या द्राक्षांमध्ये सर्व मणी लवकर व एकसारखे पिकतात तसेच मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

द्रावण कसे तयार करावे

इथ्रेल हे संजीवक पाण्यात पूर्णपणे मिसळते याची तीव्रता ४०% असते.वेगवगळ्या पीपीएमचे इथ्रेलचे द्रावण पुढील प्रमाणे तयार करावे.

१००० पीपीएम = २५० मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी

२५०० पीपीएम = ६२५ मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी

२००० पीपीएम = ५०० मिली इथ्रेल + १०० लिटर पाणी

एनएए (napthaylin acetic acide)

हे संजीवक ऑक्झीन्स या गटात मोडते.

उद्देश:

वेलीवर घडांची संख्या मर्यादित असल्यास व इतर संजीवकांचा मात्रा योग्य प्रमाणात दिल्या असल्यास या संजीवकाचा वापर करण्याची गरज भासत नाही.घड फुलो-यातून बाहेर पडल्यापासून ते मणी तांदळाच्या आकाराचे होईपर्यतच्या काळात होणारी मणी गळ कमी करण्यासाठी २० पीपीएम एवढया तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी. तसेच मणी पिकण्यास सुरु होतांना १५ ते २० पीपीएम एवढया तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास मण्यावर लव (लस्टर )चांगली येते. द्राक्ष काढणीच्या अगोदर १० ते १५ दिवस अगोदर २० - २५ पीपीएम एवढया तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास द्राक्ष काढणीनंतरच्या हाताळणी मध्ये होणारी मणी गळ थांबविली जाते.

माहितीदाता: पृथ्वीराज गायकवाड

स्त्रोत: http://www.nashikgrapes.in/2011/04/blog-post_13.html

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate