निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सीपीपीयूचा वापर प्रामुख्याने केला जातो. सीपीपीयू (फोर क्लोर फेन्युरॉन) हे फिनाईल युरिया या समूहातील एक सायटोकायनीन आहे. सायटोकायनीनच्या वापरामुळे पेशी विभाजनाच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. सीपीपीयूचा वापर जीएसोबत केला, तर ही संजीवके प्रकाशसंश्लेषणासाठी सक्षम असलेल्या पानांतून कार्बोहायड्रेट किंवा अन्नद्रव्ये ही प्रभावीपणे आकर्षित करून घडापर्यंत पोचविण्याचे कार्य करीत असतात, तसेच मण्यांचा आकार, मण्यांचे वजन व घडाचे वजन यात वाढ होते.
निर्यातक्षम द्राक्षनिर्मितीमध्ये संजीवकांच्या वापरास अनन्यसाधारण महत्त्व आहे. निर्यात करण्यात येत असलेल्या जातींमध्ये प्रामुख्याने थॉमसन सीडलेस व तास-ए-गणेश या हिरव्या जातींचा समावेश होता, तसेच शरद सीडलेस या काळ्या जातीची निर्यात जवळच्या, तसेच अरब देशांना केली जाते.
युरोपीय बाजारपेठेसाठी द्राक्ष निर्यातीचे काही महत्त्वाचे निकष
1) रंग - द्राक्ष मण्यांचा रंग दुधाळ हिरवा व एकसारखा असावा. घडातील सर्व मणी एकसारख्या आकाराचे व कमीत कमी 17 मि.मी. व्यासाचे असावेत.
2) घडाचे वजन - 350 ते 750 ग्रॅम असावे.
3) शर्करा प्रमाण - 17 ते 19 अंश ब्रिक्स असावे.
4) शर्करा-आम्लता गुणोत्तर - 35 ते 40.
5) द्राक्षाचे पॅकिंग - एका पाऊचमध्ये एक किंवा दोनच घड असावेत. चार-पाच किलोच्या बॉक्समध्ये सर्व पाऊचमध्ये मिळून नऊ ते दहा घड असावेत.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सीपीपीयूचा वापर प्रामुख्याने केला जातो. सीपीपीयू (फोर क्लोर फेन्युरॉन) हे फिनाईल युरिया या समूहातील एक सायटोकायनीन आहे. सायटोकायनीनच्या वापरामुळे पेशी विभाजनाच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. सीपीपीयूचा वापर जीएसोबत केला, तर ही संजीवके प्रकाशसंश्लेषणासाठी सक्षम असलेल्या पानातून कार्बोहायड्रेट किंवा अन्नद्रव्ये ही प्रभावीपणे आकर्षित करून घडापर्यंत पोचविण्याचे कार्य करीत असतात, तसेच मण्यांचा आकार, मण्यांचे वजन व घडाचे वजन यात वाढ होते.
सीपीपीयूचे फायदे
- मण्यांचा आकार व फुगवण वाढवते व जीए कमी प्रमाणात वापरावे लागते.
- द्राक्षाची प्रत लक्षणीयरीत्या सुधारते.
- थॉमसन सीडलेस द्राक्षात तोडणीनंतर मण्यांची गळ कमी होते.
- मण्यांचा हिरवा, दुधाळ रंग टिकून राहण्यास मदत होते.
सीपीपीयूचे (0.1 टक्का) द्रावण तयार करणे -
तीव्रता (पीपीएम) +सीपीपीयू (मि.लि.) +पाणी (लिटर)
1 +100 +100
1.5 +150 +100
2 +200 +100
सीपीपीयूचा वापर
थॉमसन सीडलेस व तास-ए-गणेश
द्राक्षमणी तीन-चार मि.लि. व सहा-सात मि.मी. आकार असताना सीपीपीयू हे जी.ए.सोबत वापरावे. तीन-चार मि.मी. मणी आकार असताना 30 पीपीएम जी.ए.सोबत दोन पीपीएम सीपीपीयू द्यावे, तर सहा ते सात मि.मी. अवस्थेमध्ये 40 पीपीएम जी.ए.सोबत एक पीपीएम सीपीपीयू द्यावे, पण सीपीपीयूचा वापर करताना घडाच्या पोषणासाठी काडीवर कमीत कमी 15 पाने असावीत.
क्र. +अवस्था +संजीवके व मात्रा +कार्य
- +3-4 मि.मी. मणी आकार +30 पीपीएम जी.ए. - 2 पीपीएम सीपीपीयू +मणी आकार व देठाची जाडी वाढवणे
- +6-7 मि.मी. मणी आकार +40 पीपीएम जी.ए. - 1 पीपीपीएम सीपीपीयू +मणी आकार वाढवणे
शरद व फ्लेम सीडलेस
द्राक्ष मणी तीन ते चार मि.मी. व सहा ते सात मि.मी. आकार असताना 40 पीपीएम जी.ए.सोबत 0.5 पीपीएम सीपीपीयू वापरावे. त्यामुळे मण्यांचा आकार व्यवस्थित मिळतो व घडातील मण्यांना एकसारखा रंग येतो.
सीपीपीयू वापरताना घ्यावयाची काळजी
- सीपीपीयूसोबत जी.ए.शिवाय कोणतेही संजीवक अथवा कीड-रोगनाशक मिसळू नये.
- स्टिकर वापरल्यास मण्यांच्या खालच्या बाजूस डाग पडण्याची शक्यता असते.
- सीपीपीयू अथवा जीएचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास मण्यांचे देठ आणि घडांचा दांडा कडक होतो, तसेच मण्यांची साल जड होते.
- सीपीपीयूचा वापर द्राक्ष बागेत करताना वेलीवरील काड्यांची वाढ जोमदार असायला पाहिजे, तसेच वेलीत पूर्वीचा अन्नसाठा भरपूर असणे आवश्यक आहे.
- वेलीवर पानांची व घडांची संख्या योग्य असेल तरच सीपीपीयूचा वापर करावा. जर प्रमाणापेक्षा जास्त घड असल्यास सीपीपीयूचा वापर टाळावा, अन्यथा द्राक्ष पक्व होण्यास उशीर लागतो.
- सीपीपीयू व जी.ए. एकत्रित द्रावणामध्ये घड बुडविल्यानंतर घड हलक्या हाताने झटकावा. द्रावणाचे ओघळ मण्यांना चिकटून राहिल्यास मण्यांच्या खालच्या बाजूस तांबूस रंगाचे गोलसर डाग पडतात.
- काढणी उशिरा व फुगवण पाहिजे असल्यास मणी सहा ते सात मि.मी. आकाराचे असताना 1.5 ते 2 पीपीएम या प्रमाणात सीपीपीयूचा वापर जी.ए.सोबत करावा.
- सीपीपीयूचा वापर झाल्यानंतर घड सावलीत राहतील असे व्यवस्थापन करावे. कॅनॉपी कमी असेल तर लगेच शेडनेटचा वापर करावा.
- रंगीत द्राक्ष जातींमध्ये जर सीपीपीयूचे प्रमाण जास्त झाले तर एकसारखा रंग येत नाही व द्राक्षाचा दर्जा बिघडतो. त्यामुळे जास्त प्रमाणातील वापर टाळावा.
- सीपीपीयूचा वापर केल्यानंतर द्राक्ष मण्यांची पक्वता हलक्या जमिनीत अंदाजे एक ते दोन आठवडे, तर भारी जमिनीत दोन ते तीन आठवड्यांपर्यंत लांबू शकते. जर हवामान थंड असेल तर हा कालावधी वाढू शकतो.
- घडांच्या पुढे कमीत कमी 10 ते 12 पाने असल्यास सीपीपीयूचा वापर करावा. कॅनॉपी कमी असेल तर सीपीपीयू वापरामुळे वेलींवर अनिष्ट परिणाम होतात.
- सीपीपीयू वापरासाठी द्राक्ष बागायतदारांमध्ये संभ्रम आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या कंपन्यांचे सीपीपीयू एकत्र वापरले जात आहेत. सीपीपीयू कोणत्याही एकाच कंपनीचे असेल याची खात्री करून योग्य प्रमाणात वापरावे.
सीपीपीयूचा दक्षतापूर्वक वापर केल्यास वेलींचे आयुष्यमान, उत्पादकता, उत्पादनाची प्रत तसेच निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी मदत होईल.
साठवण
- सीपीपीयू हे अत्यंत ज्वालाग्राही असल्यामुळे जास्त तापमानात अथवा आगीपासून दूर ठेवावे.
- सीपीपीयूची साठवण शक्यतो कोरड्या व थंड जागेत करावी.
- लेबलवर दिलेल्या सूचना वाचून त्यांचे पालन करावे.
स्त्रोत: अग्रोवन