नारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते, तर सर्वसाधारणपणे एक तयार झावळी मिळत असते. साधारणतः त्याचबरोबर बागेतील इतर गवतही उपलब्ध होत असते. या उपलब्ध झावळ्या व कचरा याचा वापर करून गांडूळ खत तयार करावे.
गांडूळ खतनिर्मितीसाठी सिमेंट टाकीचा वापर करावा. यामध्ये 1-1 या प्रमाणात शेण आणि कुजलेला पाचोळा यांचे थर द्यावेत. त्यावर पाणी शिंपडून ते ओले करावेत आणि त्यामध्ये 50 गांडुळे 10 किलो मिश्रण या प्रमाणात सोडावीत. सदर युनिटसाठी सावलीची व्यवस्था करावी. ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर आवश्यकतेनुसार वारंवार पाणी शिंपडावे. एक ते दोन महिन्यांत यांची वाढ होऊन जवळ जवळ 300 पटींनी गांडुळे वाढतात. सदर गांडुळे मोठ्या प्रमाणात खत करण्यासाठी वापरावीत.
गांडूळ खत हे खड्डा पद्धत व ढीग पद्धत या दोन्ही पद्धतीने करता येते. उपलब्ध घटकांनुसार सिमेंट टाकी बांधावी. टाकीत गांडूळ खत तयार होण्यास दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत वाफे ओले राहण्यासाठी त्यावर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. ज्या ठिकाणी गांडूळ खत तयार केले जाणार आहे तो भाग सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मंडप अगर छप्पर करावे. प्रतिटन 1000 गांडुळे सोडावीत. वापरण्यात आलेल्या झावळ्यांनुसार 70 टक्के गांडूळ खत 60 ते 75 दिवसांत तयार होते. त्या वेळी पाणी शिंपडणे थांबवावे. जेणेकरून गांडुळे खालच्या थरात निघून जातील. दोन आठवड्यांनंतर गांडूळविरहित वरच्या थरातील गांडूळ खत जमा करावे. ते चाळून घेऊन सावलीत वाळवावेत. तसेच खालच्या थरात जमा झालेली गांडुळे पुढील गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरावीत.
नारळ झावळीपासून तयार झालेल्या गांडूळ खतात 1.2 ते 1.8 टक्के नत्र, 0.1 ते 0.2 टक्का स्फुरद आणि 0.2 ते 0.4 टक्का पालाश अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. याचे आकारमान इतर सेंद्रिय खतांपेक्षा कमी असल्याने वाहतूक व वापरण्यासाठी सोपे जाते.
काथ्या निर्मितीमध्ये सोडणापासून काथ्या अलग केल्यानंतर त्याचा भुसा उरतो. हा भुसा काथ्या आणि भुशाचे प्रमाण पाहिले तर 1-2 असते. या भुशामध्ये त्याच्या वजनाच्या 10 पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे; परंतु या भुशात अगदी अल्प प्रमाणात नत्राचे प्रमाण असते. लिगनीन आणि फायटोटॉक्सिक पॉलिफिनॉल मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे याचा खत म्हणून वापर करावयाचा असेल तर त्यासाठी अगोदर त्याचे कंपोस्ट खत करावे. ताजे सोडण भुशामध्ये कर्ब - नत्राचे गुणोत्तर 100.1 एवढे असते.
संपर्क - 02352-235077
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी
सुहास पाटील, राधानगरी, जि. कोल्हापूर
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वा...
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...