असे तयार करा नाडेप कंपोस्ट -
नाडेप कंपोस्ट तयार करण्यासाठी विटा, माती आणि सिमेंट वापरून 12 फूट लांब, पाच फूट रुंद व तीन फूट खोल या आकाराची टाकी तयार करावी. भिंतीची जाडी नऊ इंच ठेवावी. टाकी तयार करीत असताना चारही भिंतींना विटांच्या रुंदीच्या आकाराची छिद्रे ठेवावीत, त्यामुळे टाकीतील सेंद्रिय घटकांना पुरेशी हवा मिळते. शेण व पाणी यांचे घट्ट मिश्रण करून या भिंती आतून व बाहेरून लिंपाव्यात. या भिंती वाळल्यानंतर (साधारणतः दोन ते तीन दिवसांनी) टाकी उपयोगात आणता येते.
कंपोस्ट तयार करण्यासाठी लागणारी साधनसामग्री -
1) शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकांची धसकटे, तण, गवत, पिकांचे अवशेष, काड, खळ्यातील पदार्थ, पऱ्हाट्या, तुराट्या आणि गोठ्यातील शिल्लक धांडे, काड, उसाचे पाचट, चिपाड इत्यादी (एकूण 1400 ते 1500 किलो)
2) गाईचे शेण - 90 ते 100 किलो
3) शेतातील कोरडी गाळलेली माती - 1750 किलो
पिकांचे टाकाऊ अवशेष 1400 ते 1500 किलो + पाणी 1500 ते 2000 लिटर तसेच चांगल्या प्रतीचे नाडेप कंपोस्ट तयार करण्याकरिता जनावरांचे मूत्र मातीमध्ये मिसळावे. अशा तऱ्हेने पिकांचे अवशेष, शेण व मातीच्या उपलब्धतेनुसार लागतील तितके टाके तयार करावेत.
टाकी भरण्याची पद्धत -
नाडेप कंपोस्ट तयार करण्यासाठी सुरवातीस लागणारे सर्व साहित्य एकत्र आणून ठेवावे. हे साहित्य टाकीत भरण्याआधी आतील भिंतीवर शेण + माती यांचे मिश्रण शिंपडावे.
पहिला थर - यात वापरावयाचे शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकांचे अवशेष यांचा सहा इंच जाडीचा थर होईपर्यंत पसरावेत (यात तीन- चार टक्के कडुनिंब किंवा पळसाची हिरवी पाने वापरावीत.)
दुसरा थर - यामध्ये चार किलो शेण + 150 लिटर पाणी यांचे मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडावे.
तिसरा थर- शेतातील कोरडी गाळलेली माती 50 ते 60 किलो सारख्या प्रमाणात पसरावी आणि त्यावर पाणी शिंपडावे, जेणेकरून सर्व माती ओली होईल.
अशाप्रकारे तीन थरांचा एक थर समजून एका थरानंतर दुसरा थर देऊन पुन्हा टाकी अशारीतीने भरावी, की जेणेकरून टाकीच्या टोकापासून एक ते दीड फूट उंचवटा तयार होईल. वरील तीन थरांचा मिळून एक थर असे समजून टाकी पूर्ण भरण्याकरिता साधारणपणे 12 थर लागतात.
अशारीतीने टाकी भरल्यावर 400 ते 500 किलो मातीचा चिखल करून तीन इंच जाडीचा थर होईल असा पसरावा आणि त्यावर शेणाने लिंपावे. 15 ते 20 दिवसांनंतर ढीग नऊ इंच खाली दबतो. मग पुन्हा वरील पद्धतीने टाकी भरून शेणाने लिंपावे. एकूण 90 ते 120 दिवसांनंतर (पहिल्या भरणीपासून) नाडेप कंपोस्ट खत तयार होते. या पद्धतीमध्ये 3.5 ते पाच टन कंपोस्ट मिळते आणि त्यामध्ये 0.5 ते 1.0 टक्के नत्र, 0.5 ते 0.8 टक्के स्फुरद आणि 1.2 ते 1.4 टक्के पालाश असे अन्नद्रव्यांचे प्रमाण असते.
असे ठेवा व्यवस्थापन -
1) नाडेप कंपोस्ट तयार करीत असताना जास्त उन्हामुळे त्याला चिरा किंवा भेगा पडून त्यातील ओलावा कमी न होता टिकून राहावा म्हणून त्यावर शेणपाण्याचे मिश्रण शिंपडावे. जर फारच कडक उन्हाळा तापत असेल, तर त्यावर तात्पुरती सावली करावी. 2) कंपोस्ट खताला तीन ते चार महिन्यांत कथ्था रंग आल्यास चांगले नाडेप कंपोस्ट झाले असे समजावे. खताला खूप सुकू देऊ नये. साधारणपणे 15 ते 20 टक्के ओलावा
त्यात असावा.
कमी खर्चात करा गांडूळ खत निर्मिती -
गांडूळ खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरते छप्पर उभारून जमिनीवर गादी वाफे तयार करून त्यात मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची निर्मिती करता येते. खत निर्मितीसाठी आयसेनिया फेटिडा किंवा युड्रिलस युजिनी या गांडुळांच्या जातींचा वापर करावा.
गांडूळ खत तयार करताना गांडुळांचे उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी साध्या गवती किंवा बांबूच्या ताट्यांपासून तयार केलेल्या तात्पुरत्या छपराची आवश्यकता असते. पावसाळ्यात आत पाणी शिरू नये म्हणून छपराला प्लॅस्टिक किंवा ताडपत्री लावावी.
गांडूळ खत निर्मितीसाठी जनावरांचे शेण, बकऱ्या आणि मेंढ्यांच्या लेंड्या, शेतातील निरुपयोगी सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाज्या आणि फळांचे टाकाऊ भाग वापरावेत.
1) गांडुळांसाठी गादी वाफे (बेड) तयार करणे -
तात्पुरते छप्पर उभारल्यानंतर त्याखालील जागेवरील माती पाच ते सहा सें.मी. खोदून मोकळी करावी, त्यावर सात ते दहा सें.मी. उंचीचे, पाऊण ते एक मीटर रुंद आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये साधारणपणे 30 सें.मी. अंतर ठेवावे. गादी वाफा तयार करण्यासाठी उसाची वाळलेली पाने, चिपाड, वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा शेतातील इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थ यांचा प्रथम पाच ते सहा सें.मी. जाडीचा थर द्यावा, त्यावर कुजलेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा. अशा तऱ्हेने तयार केलेले गादी वाफे वर्षभर वापरता येतील.
2) गांडुळांसाठी खाद्य पदार्थांचे मिश्रण -
हे मिश्रण छपराच्या बाहेर मोकळ्या जागेत तयार करावे, त्यासाठी चार ते पाच दिवसांपूर्वी गोळा केलेले जनावरांचे शेण अर्धा भाग आणि घरादारातील किंवा शेतातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ अर्धा भाग घेऊन ते फावड्याच्या साहाय्याने एकत्र मिसळावे, त्यावर थोडे पाणी टाकून गोवऱ्या थापता येतील इतपत खाद्य मिश्रण तयार करावे.
3) खाद्य पदार्थांचे मिश्रण वाफ्यावर टाकणे -
तयार केलेले खाद्य मिश्रण लहान घमेल्याच्या साहाय्याने गादी वाफ्यावर पसरून द्यावे. त्यासाठी प्रथम दोन घमेले वाफ्यावर पालथे घालून, हे दोन्ही ढीग एकमेकांना जोडून राहतील याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुन्हा एक घमेले दोन्ही ढिगांच्या मधोमध वरील बाजूला टाकून तिसरा ढीग टाकावा. अशारीतीने लांबीच्या दिशेने खाद्य मिश्रण टाकत जावे.
4) खाद्य मिश्रणावर गांडूळ किंवा ताजे गांडूळ खत टाकणे -
साधारणपणे प्रत्येक पाच घमेले खाद्य मिश्रणावर 100 गांडुळे किंवा एक किलो ताजे गांडूळ खत (अंडी/ पिल्लेयुक्त) टाकावे.
5) खाद्य मिश्रणावर गवत किंवा जुनाट पोत्यांचे आच्छादन टाकणे -
गादी वाफ्यावर खाद्य मिश्रण टाकून झाल्यावर त्याच्या सर्व बाजू झाकण्यासाठी वाळलेले गवत किंवा जुनाट पोत्यांचा वापर करावा, त्यामुळे मिश्रण ओलसर राहील आणि पक्ष्यांपासून गांडुळांना संरक्षण मिळेल. हे आच्छादन मधूनमधून सारून खाद्य मिश्रणात गांडुळांची वाढ होते किंवा नाही हे पाहावे. शिवाय, आत गांडुळांचे नैसर्गिक शत्रू (उदा. बेडूक, उंदीर, साप, पाली वगैरे) आढळल्यास त्यांचे नियंत्रण करावे.
6) खाद्य -
खाद्य मिश्रण माफकपणे ओलसर ठेवण्यासाठी उन्हाळ्यात किमान दोन वेळा (सकाळी व संध्याकाळी) आणि इतर दिवसांत एक वेळा झारीने (आच्छादनावर) पाणी घालावे. हे पाणी वाफ्याच्या आजूबाजूला उतरणार नाही याची काळजी घ्यावी.
7) गांडूळ खत तयार झाल्यावर त्यापासून गांडूळ वेगळे करणे -
या पद्धतीप्रमाणे गांडूळ खत तयार होण्यासाठी सुरवातीला 40 ते 45 दिवस लागतात. पुढे हा कालावधी कमी होतो. शेवटच्या चार ते पाच दिवसांत खाद्य मिश्रणावरील आच्छादन बाजूला काढून पाणी शिंपडणे बंद करावे. जसजसे गांडूळ खत कोरडे होत जाईल, तसतसे गांडुळे गादी वाफ्यात शिरतील. त्यानंतर कोरडे खत गोळा करून ते रेती गाळण्याच्या चाळणीने (2.5 मि.मी.) गाळून घ्यावे. चाळणीवर जी गांडुळे जमा होतील, त्यांचा पुन्हा खत निर्मितीसाठी वापर करावा.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन