অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गिनीफाउल पक्षीपालन

आफ्रिकेच्या पश्‍चिम भागात असलेल्या घाना देशात "व्हीएसओ' या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कृषी आणि पशुपालन विकासासंदर्भात काम सुरू आहे. या संस्थेमध्ये कार्यरत असलेले सचिन पटवर्धन यांनी या देशातील बोंगो जिल्हा पंचायतीच्या उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत गिनीफाउल पक्ष्यांचे संवर्धन आणि विक्री व्यवस्थापनाबाबत दिलेली माहिती...

"व्हीएसओ' या इंग्लंडस्थित आंतरराष्ट्रीय

स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आफ्रिकी देशात कृषी आणि कृषिपूरक उद्योगांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकरी आणि स्थानिक सरकारी संस्थांच्या बरोबरीने काम सुरू आहे. सध्या बोंगो जिल्हा पंचायतीच्या उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत गिनीफाउल या पक्ष्यांचे संवर्धन आणि विक्री व्यवस्थापनाबाबत आम्ही अभ्यास करीत आहोत. आपल्या देशात हा पक्षी फारसा परिचित नाही. या अभ्यासादरम्यान आलेले अनुभव आपल्या शेतकऱ्यांना निश्‍चित उपयोगी ठरतील. गिनीफाउल हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेच्या पश्‍चिम भागाच्या उष्ण व कोरड्या गवताळ प्रदेशांमध्ये आढळून येतो. या प्रदेशाला सव्हाना असे नाव आहे.

घानाचा उत्तर भाग हा सव्हानाचा एक भाग असून, येथील लोक प्रामुख्याने कोरडवाहू शेती करणारे आहेत. अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती आणि जोडधंद्याचे व्यवस्थापन केले जाते. ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, चवळी व बांबारा बिन्स ही येथील मुख्य पिके आहेत, परंतु आधुनिक तंत्र, तसेच सिंचन सुविधांच्या अभावामुळे येथील शेतीची उत्पादकता फारच कमी आहे, त्यामुळे बोंगो जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के जनता अजूनही पावसाळ्यानंतर देशाच्या प्रगत असलेल्या दक्षिण भागामध्ये मजुरीसाठी स्थलांतर करते. या लोकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी बोंगो जिल्हा पंचायतीच्या स्थानिक अर्थव्यवस्था विकास कार्यक्रमाने येथील लोकांसाठी पशू-पक्षिपालन व्यवस्थापनातील सुधारित तंत्रज्ञान पोचवण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात गिनिफाउल पक्षिपालन या पूरक व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

असे होते गिनीफाउल पालन


गिनीफाउल हा कोंबडीवर्गातील पक्षी असून, पश्‍चिम आफ्रिकेच्या सव्हाना भागामध्ये त्याचे मूलस्थान आहे. या पक्ष्याचे काही जंगली प्रकार येथील जंगलांमध्येही सापडतात. या भागातील शेतकऱ्यांकडे असलेल्या गिनीफाउलला अजूनही म्हणावे तसे पूर्णतः पाळीव करणे शक्‍य झालेले नाही, असे असले तरीही या भागातील शेतकऱ्यांचा गिनीफाउलपालन हा मुख्य जोडधंदा बनला आहे. या व्यवसायात घरातील सर्व सदस्य, महिला, मुले व पुरुष गुंतलेले आहेत. किमान दहा ते कमाल ३०० पर्यंत पक्ष्यांचे पालन हे शेतकरी करतात. येथील कुटुंब व समाजव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे घरातील महिलांकडे या पक्षिपालनाची विशेष जबाबदारी असते. मुले दहा वर्षांची झाली, की घरातील वडीलधारी मंडळी मुलांना पक्षिपालनाचे शिक्षण देऊन त्यांना स्वतंत्रपणे व्यवसाय करण्यास प्रवृत्त करतात. गिनीफाउलसोबत कोंबड्या, टर्की व बदकांचेही पालन केले जाते, परंतु गिनीफाउलची संख्या साधारणतः सर्वाधिक असते.

कमी पक्षी असलेले शेतकरी साधारणतः किरकोळ विक्रीतून आपल्या छोट्या गरजा भागवतात. अधिक पक्षी असलेले शेतकरी मुख्य व्यवसाय म्हणूनच गिनीफाउल पक्ष्यांचे व्यवस्थापन करतात. अर्धबंदिस्तपालन फायदेशीर गिनीफाउलचे पालन जरी मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी कुक्कुटपालनाप्रमाणे हा एक विकसित व्यवसाय नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गिनीफाउल हा पक्षी पूर्णतः बंदिस्त अवस्थेत पाळला जाऊ शकत नाही. बंदिस्त अवस्थेमध्ये ज्या प्रमाणात त्यावर खाद्याचा खर्च होतो, त्या प्रमाणात त्याची वजन वाढ होऊ शकत नाही. त्यामुळे गिनीफाउलचे पालन अर्धबंदिस्त अवस्थेमध्ये पालन करणे अत्यावश्‍यक ठरते. शेतकऱ्यांच्या शेताच्या परिसरात साधारणतः ५०० मी. अंतराच्या परिघामध्ये हे पक्षी खाद्य खाण्यासाठी फिरत राहतात. त्यामुळे त्यांची अंडीही बाहेर उघड्यावर घातली जातात. परिणामी त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अंड्यांचे नुकसान होते. रात्रीच्या वेळी पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी लहानशी खुराडी केलेली असतात.

साधारणतः शेतकरी सकाळी सहा वाजता पक्ष्यांना बाहेर खाद्य खाण्यासाठी सोडतात. त्यांच्या खुराड्यामध्ये थोडीफार पाण्याची व्यवस्था केली जाते. काहीवेळा शेतातील खाद्यटंचाईच्या काळात सकाळी व रात्री त्यांना खुराड्यामध्ये खाद्य दिले जाते. उत्पन्नवाढीसाठी काही शेतकऱ्यांनी सुधारित पक्षी व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे. यामध्ये पक्ष्यांना त्यांच्या खुराड्यामध्ये अंडी घालण्याची सवय लावणे, पोषक आहार देणे, सुधारित अंडी उबवणी तंत्राचा वापर केला जातो. सुधारित तंत्रामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवणे शक्‍य झाले आहे. साधारणतः सहा ते आठ महिन्यांचे पक्षी विक्रीसाठी योग्य होतात. जेथे पक्ष्यांचे चांगले व्यवस्थापन असते, तेथे चार ते सहा महिन्यांमध्ये पक्षी विक्रीयोग्य होतात. साधारणतः स्थानिक, तसेच ख्रिसमस, ईस्टर व ईद या सणांच्या वेळेस पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. व्यावसायिक शेतकरी या दरम्यान आपले पक्षी विक्रीयोग्य होतील अशा पद्धतीने वाढवतात. अर्धबंदिस्त पद्धतीमुळे या पक्षी व्यवस्थापनात भांडवली गुंतवणूक कमी असते आणि व्यवसायात आर्थिक नुकसानीची वेळ फार कमी येते.

काही शेतकरी तीन ते चार महिन्यांचे पक्षी विकत घेऊन ते बाजारयोग्य करण्याचा व्यवसाय करताना दिसून येतात. गिनीफाउलचे काही नैसर्गिक व मानवी शत्रू आहेत. कोंबड्यांमध्ये आढळणारे गंबोरो, न्यू कॅसल, कॉक्‍सिडिऑसिस, लकवा हे रोग गिनीफाउल पक्ष्यांमध्येही आढळून येतात. जंत व खनिजांची कमतरता हेही गिनीफाउलचे उत्पन्न कमी करणारे प्रमुख घटक आहेत. कोंबडीप्रमाणे हा पक्षी खुडूक होत नसल्यामुळे अंड्यांचे किफायतशीर उत्पन्न घेणे शक्‍य असले, तरी सध्यातरी अंडी देण्याचा फक्त पाच महिन्यांचा कालावधी ठेवला जातो. त्याचबरोबरीने पारंपरिक पद्धतीने गिनीफाउलचे व्यवस्थापन होत असल्याने अंड्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकरी पक्षी योग्य किंमत मिळताच विकून टाकतात; परंतु सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी गिनीफाउलचा अंडी देण्याचा कालावधी वाढविला आहे, तसेच त्यांच्या अंड्यांचे नुकसान कमी केले आहे.

स्थानिक बाजारपेठेचे स्वरूप


गिनीफाउलची विक्रीव्यवस्था कुक्कुटपालन क्षेत्राप्रमाणे विकसित नसली, तरी स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याची स्थिर विपणन व्यवस्था अस्तित्वात आहे. स्थानिक भागातील व्यापारी विविध ग्रामीण बाजारपेठांमध्ये जाऊन पक्ष्यांची खरेदी करतात आणि मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवतात. काही मोठे शेतकरी स्वतंत्रपणे मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांना आपले पक्षी पाठवतात, परंतु त्यातील महत्त्वाचा दोष म्हणजे ते येथील वजनावर आधारित नसून, व्यापारी व शेतकरी परस्पर चर्चेने त्यांचे दर ठरवतात. येथे काही व्यावसायिक गिनीफाउलचे मांस सुकवण्याच्या, तसेच गोठवण्याच्या व्यवसायात आहेत. हे व्यावसायिक शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करतात. शहरातील रेस्टॉरंट व कबाबनिर्मिती करणारे उद्योजक गिनीफाउलची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात. गिनीफाउलच्या मांसामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते, तसेच त्याला दिल्या जाणाऱ्या आहारात रासायनिक घटकांचा वापर अतिशय कमी असतो; तसेच ते चवीमध्ये चिकनपेक्षा उजवे असते. या कारणांमुळे त्यांची किंमत कायम अधिक असते, त्यामुळे बाजारामध्ये अन्य मांसासोबत गिनीफाउलच्या मांसाला स्पर्धा करावी लागत नाही.

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate