অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दूध पचण्यातील अडचणी

ऑस्ट्रेलियामध्ये दूधपचनाच्या वेळचा दुधातील फॅटच्या संरचनेचा झाला प्रथमच अभ्यास



दुधामध्ये प्रथिने व त्यांच्या रचनेचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठामध्ये प्रथमच विस्तृतपणे करण्यात आला असून, दुधातील प्रथिनांचे पचना वेळी होणारे बदल जाणून घेण्यात आले आहेत. पचनाच्या वेळी दूध आणि त्यातील फॅट यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या रचनेविषयी स्पष्टताही मिळाली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये नवजात व अपुऱ्या दिवसांच्या बालकांसाठी, वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा नव्या प्रकारे औषधे शरीरामध्ये पोचविण्यासाठी दुधाचे नवे फॉर्म्युले विकसित करणे शक्य होईल. हे संशोधन ‘एसीएस नॅनो’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

दुधाच्या पोषकतेविषयी सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ‘दूध आणि त्याचे मानवी शरीरामध्ये होणारे पचन’ या विषयावर फारच कमी माहिती उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियन रिसर्च कौन्सिल (एआरसी) यांनी दिलेल्या आर्थिक पाठबळावर मोनाश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस येथील डॉ. स्टिफन सॅलेंटिनिग आणि प्रा. बेन बॉईड यांनी दूध व त्यातील फॅट यांच्या संरचनेमध्ये पचन संस्थेत होणारे बदल यांचा अभ्यास केला आहे. पचन होते वेळी दुधाच्या संरचनेमध्ये मोठे भूमितीय बदल होतात. त्यांच्या रचनांची माहिती उपलब्ध झाली आहे.

असे झाले प्रयोग


ऑस्ट्रेलियातील सिन्क्रोट्रॉन संस्थेतील आधुनिक यंत्राचा वापर करीत मानवी पचनसंस्थेची नक्कल एका काचेच्या डब्यामध्ये केली होती. त्यामध्ये मानवी शरीरात तयार होणारी विकरे वापरून गाईच्या एक ग्लास दुधातील फॅटवर प्रयोग करण्यात आले. दुधातील फॅट, पोषक घटक आणि पाण्याबरोबर त्यांच्या होणाऱ्या विविध संरचना यांच्या नोंदी घेण्यासाठी ‘एक्स रे स्कॅटरिंग बीम’चा वापर केला. या साऱ्या प्रक्रियेचा पचनाच्या क्रियेवर परिणाम होत असतो.

दुधातील फॅट निर्माण करतात विविध रचना


दुधातील फॅट हे दुधाच्या व दुग्धपदार्थांच्या चव, स्वाद आणि पोषकतेवर परिणाम करते. मात्र, अद्यापपर्यंत या फॅटची पचनाच्या वेळी असलेली संरचना नेमकी माहिती नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे शरीरातील पचनाच्या क्रिये वेळी स्त्रवणाऱ्या विकरांमुळे (त्यांना लिप्स असे म्हणतात) फॅटचे विघटन होते. त्यातून फॅटच्या अत्यंत गुंतागुंतीच्या भौमितिक रचना तयार होतात. या लहान आणि अत्यंत सुसंघटित अशा रचनांमध्ये औषधापासून अनेक घटकांचे वहन सरळ पचन संस्थेमध्ये करणे शक्य होऊ शकेल, असे डॉ. सॅलेंटिनिग यांनी सांगितले.

असे होतील या संशोधनाचे फायदे...


  • दूध हा पोषक आणि परिपूर्ण आहार असला तरी अनेकांना दूध पचविण्यामध्ये अडचणी येतात. विशेषतः नवजात बालकांना आईच्या दुधाची कोणत्याही कारणाने पूर्तता होत नसल्यास बाहेरील दुधाचा वापर करावा लागतो. या बालकांच्या पोषणातील अडचणी दूर करणे शक्य होणार आहे.
  • दुधाच्या पचनासाठी अधिक वेळ लागल्याने पोट भरल्याची भावना होऊन कमी पोषण होऊ शकते. अन्य खाद्य पदार्थ कमी खाल्ले जातात. तेही टाळणे शक्य होईल.
  • दुधाच्या पचनाच्या वेळी दुधामध्ये अनेक बदल होतात. त्याची माहिती उपलब्ध झाल्याने आपल्या आवश्यकतेनुसार दुधाचे विविध फॉर्म्युले तयार करता येतील.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate