कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. कोंबडीघरामध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जमीन मुरमाड असावी. पक्षिघरांसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. पक्षिघराची दिशा ही नेहमी पूर्व - पश्चिम असावी. पक्षिघर उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून घर उभारावे. सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ. फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फटू जागा मिळेल अशाप्रकारे घर उभारावे. पक्षिघराची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो. घराचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो. घराची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी. जुने पक्षी गेल्यानंतर ती धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते.
घरांना रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. घराच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी. घरांना लांबीच्या दोन्ही बाजूस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते. दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने ओव्हरहॅग पक्षिगृहात येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. घराची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते.
- डॉ. लोणकर, 9420243895
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...