रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी. वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. त्या लसीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते. लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख याचा तपशील नोंद करून लस वापरावी.
वातावरणात सदैव विषाणू , जिवाणूचे अस्तित्व असते. पोषक वातावरण मिळाल्यास त्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटांत निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. प्रामुख्याने न्युमोनिया, रक्ती हगवण, पुलोरम, अफलाटॉक्सिन, टायफॉईड, पॅराटायफॉईड, कॉलरा, सीआरडी, मानमोडी, इन्फेक्शियस ब्राँकायटीस, गंबारो, इन्फेक्शियस लँरिगो ट्रॅकायटिस, देवी या रोगांचा प्रादुर्भाव कोंबड्यांमध्ये दिसतो. पक्ष्यांत संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लसीकरण यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याबाबत कुक्कुटपालक जागृत असला पाहिजे. त्याचप्रमाणे रोगाचा प्रसार कसा होतो, हेदेखील माहीत असणे गरजेचे आहे, तरच झालेल्या चुका दुरुस्त करता येतील.
रोगाचा प्रसार
- शेडमधील रोगबाधित पक्ष्यांच्या विष्ठेतून, नैसर्गिक स्राव यातून रोगकारक जंतू पक्ष्याचे खाद्य, पाणी दूषित करतात. असे पाणी इतर पक्ष्यांनी प्यायल्यास, त्यांना त्या रोगाची लागण होऊ शकते, त्याचप्रमाणे दूषित खाद्य खाल्ल्यास त्या रोगाचा प्रादुर्भाव इतर पक्ष्यांना होतो.
- शेड अस्वच्छ असल्यास, अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते.
- शेडमध्ये प्रत्येक पक्ष्यास योग्य जागा न मिळाल्यास, त्यांना स्वच्छ, शुद्ध हवेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पक्षी गुदमरून मृत्युमुखी पडू शकतात. गर्दीच्या वातावरणात पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.- शेड निर्जंतुक करूनच पक्षी शेडमध्ये सोडावेत.
- सर्व खाद्यभांडी, पिण्याची भांडी निर्जंतुक करून वापरावीत.
- निकृष्ट प्रतीचे खाद्य, कमी रोगप्रतिकारशक्ती हे लक्षात घ्यावे.
- शेडमधील लिटर ओले झाल्यास अशा वातावरणात रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. उदा. रक्ती हगवण.
- आजारी पक्षी आणि निरोगी पक्षी एकाच घरात असतील, तर रोगांचा प्रसार त्वरित होतो.
- रोगाचा प्रसार झालेल्या शेडमधील भांडी, उपकरणे, काम करणारे कामगार, त्यांच्या अंगावरील कपडे, त्याच्या वाहनाबरोबर बाहेरील जंतू दुसऱ्या शेडमध्ये येऊन रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- रोगाने मेलेले पक्षी जाळून टाकावेत. कारण शेडबाहेर टाकले तर कुत्रा, घारी, कावळे यांच्यामार्फत रोगाचा प्रसार होतो.
लसीकरण करताना घ्यायची काळजी
- रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी.
- लसीकरण करण्यासाठी नेताना रोगप्रतिबंधक लस बर्फ ठेवलेल्या भांड्यातूनच न्यावी.
- वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. त्या लशीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते.
- वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
- लसीकरणासाठी वापरलेली सिरिंज, सुया, भांडी स्वच्छ धुऊन निर्जंतुक करून घ्यावी.
- लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख याचा तपशील नोंद करून लस वापरावी.
- लस टोचल्यानंतर पक्ष्यांना थकवा येऊ शकतो. याकरता लस टोचण्यापूर्वी तीन दिवस अगोदर आणि लसटोचणीनंतर पाच ते सहा दिवस सर्व पक्ष्यांना पाण्यातून अँटिबायोटिक्स द्यावीत.
- उन्हाळ्यात लसटोचणीचा कार्यक्रम असेल, तर रोगप्रतिबंधक लस सकाळी किंवा रात्री टोचावी. म्हणजे पक्ष्यांवर ताण येणार नाही.
- रोगप्रतिबंधक लसीकरण फक्त सशक्त पक्ष्यांना करावे.
- एका वेळी एकच लस टोचावी. एकाच वेळी दोन किंवा तीन लस दिल्यास रोगप्रतिकारशक्ती तयार होणार नाही. उलट पक्ष्यात रिॲक्शन येऊन नुकसान होईल.
पाण्यातून लस देताना...
- काही वेळा पिण्याच्या पाण्यामधून काही रोगप्रतिबंधक लसीकरण केले जाते. अशा वेळेस लस ही पाण्यामध्ये समप्रमाणात विरघळली पाहिजे. प्रत्येक पक्ष्यास अपेक्षित लस मात्रा मिळाली पाहिजे, तरच पक्ष्यांमध्ये आपणास अपेक्षित रोगप्रतिकारशक्ती तयार होईल; अन्यथा लसीकरण केल्याचे समाधान मिळेल, पण अपेक्षित परिणाम मिळणार नाही.
- लसीकरणाअगोदर पक्ष्यांना भरपूर तहान लागली पाहिजे. पक्ष्यांना भरपूर तहान लागण्यासाठी पाण्याची भांडी रिकामी ठेवावीत.
- पाण्यात समप्रमाणात लस मिसळली जावी, यासाठी प्रथम दूधपावडर पाण्यात टाकून पातळ करा. दुधाच्या तयार झालेल्या गाठी पूर्णपणे विरघळाव्यात. जी लस द्यावयाची आहे, त्यावरील सूचनेप्रमाणे पाणी मिसळून हेच पाणी तहानलेल्या पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवावे.
- लसमिश्रित पाणी संपल्याशिवाय दुसरे पाणी पक्ष्यांना देऊ नका.
- लसमिश्रित पाणी थंड राहावे म्हणून त्यामध्ये बर्फाचे खडे टाकावेत.
स्त्रोत: अग्रोवन