कोंबड्यांमधील रोगनिदानासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे...
कोंबड्यांमधील रोगांच्या निदानामध्ये शवविच्छेदन खूप महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे कोंबड्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे जवळपास सारख्याच प्रकारची असतात म्हणून त्यांना रोगनिदानात विशेष महत्त्व नसते. परंतु रोगांमुळे शरीरातील विविध अवयव, ऊतीमध्ये होणारे बदल हे संबंधित आजाराविषयी सूचक असतात. त्याआधारे अचूक रोगनिदान करून योग्य प्रतिबंध; तसेच औषधोपचार निवडता येतो.
शवविच्छेदनाचे महत्त्व
- शवविच्छेदन हे मुख्यतः मृत्यूचे कारण समजण्यासाठी केले जाते. त्यामुळे रोगनिदान करण्यासाठी योग्य दिशा मिळते. वेळेवर रोगनिदान झाल्यामुळे साथीच्या रोगांपासून इतर निरोगी पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करता येते.
- रोगाचे निदान झाल्यामुळे इतर निरोगी पक्ष्यांसाठी उपचार व लसीकरण करण्यासाठी योग्य दिशा मिळते.
- विविध संसर्गजन्य रोगांचा (उदा. मानमोडी, गंबारो, कोलिसेप्टिसेमिया) कोंबड्यांमध्ये प्रादुर्भाव होतो; परंतु काही वेळेस या रोगांची लक्षणे दिसत नाहीत. तेव्हा फक्त शवविच्छेदनच रोगनिदानात उपयुक्त ठरते.
- विमा काढलेल्या कोंबड्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार आवश्यक आहे. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी कोंबड्यांच्या मृत्यूमुळे झालेली नुकसानभरपाई देत नाही.
- सरकारी अनुदानावर विकत घेतलेल्या कोंबड्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे आवश्यक असते. त्याशिवाय कोंबड्यांच्या मृत्यूचा दाखला देता येत नाही. पर्यायाने शासनातर्फे मिळणारी नुकसानभरपाई मिळत नाही.
- नैसर्गिक आपत्तींमुळे (वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे, वाहून जाणे, जळून मरणे, गारपिटीमुळे मृत्यू) मृत्यू झाला असल्यास शवविच्छेदन करून ते सिद्ध करता येते. त्यानंतरच मिळणारा मृत्यूचा दाखला कुक्कुटपालकास नुकसानभरपाई मिळवण्यासाठी उपयोगी ठरतो.
- रोग संशोधनासाठी एखाद्या नवीन रोगाच्या प्रादुर्भावाने किंवा गूढ मृत्यूमुळे पशू-पक्षी दगावले असतील तर त्याच्या शरीरातून विविध अवयव, रक्त, विष्ठा इत्यादी नमुने शासकीय/ निमशासकीय, खासगी प्रयोगशाळेत पाठवून मृत्यूच्या कारणांचा तपास केला जातो. हे केवळ शवविच्छेदनाद्वारेच शक्य होते.
- कोंबडी आजारी पडताच किंवा रोगाची साथ येताच मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करूनच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुढील उपाययोजना करावी.
पी. व्ही. मेश्राम - 9594581239
( लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय. परळ, मुंबई येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.