वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावर झालेला आढळून येतो. ऋतूंचा विचार केला असता, उन्हाळा ऋतूमध्ये कोंबडी हा पक्षी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो, त्यामुळे प्रत्यक्षपणे मांसल व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात घट होते.
ज्या वेळी कोंबड्यांच्या सभोवतालचे तापमान 38 ते 40 अंश से.पर्यंत पोचते, त्या वेळी त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू लागतो. उष्णता कमी करण्यासाठी कोंबड्या तोंडाची उघडझाप करतात, त्याला धापा टाकणे असे म्हणतात. जास्त प्रमाणात धापा टाकल्यामुळे श्वसन संस्थेच्या कडेवर असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते. कोंबड्यांच्या सततच्या तोंडाची उघडझाप करण्याने श्वसनाचा वेग वाढतो, तसेच हृदयाच्या स्पंदनांमध्ये वाढ होते, त्यामुळे रक्तदाब वाढतो व यामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडू शकतात.
कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे आच्छादित भिंत व छताच्या शेडमध्ये ठेवावे. त्याचप्रमाणे शेडमध्ये हवा खेळती राहील अशा ठिकाणी व दिशेस शेडची बांधणी करावी. छताच्या पुढच्या बाजूला 24 इंच एवढ्या लांबीचे आच्छादन बसवावे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी छताची सफाई करावी व त्यास पांढऱ्या रंगाने रंगविणे फायदेशीर ठरते, तसेच छतावर वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, भाताचा कोंडा टाकावा व त्यास ओले ठेवावे.
दिवसातून तीन-चार वेळेस छतावर पाण्याची फवारणी करावी. असे केले असता शेडमधील तापमान कमी होऊन कोंबड्यांना थंडावा मिळतो. शेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे, जेणेकरून शेडमध्ये थंडपणा राहील व कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविता येईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेडमध्ये ताजी हवा खेळती ठेवणे फार महत्त्वाचे आहे. हवा खेळती न राहिल्यामुळे शिळी व दूषित हवा पक्ष्यांच्या शेडमध्ये तयार होते व त्या हवेत अमोनिया, ओलसर कार्बन- डाय- ऑक्साईड व धुळीचा शिरकाव होतो व कोंबड्यांवर ताण येऊ शकतो.
नैसर्गिक हवा शेडमध्ये खेळती ठेवण्यासाठी पंख्यांचा वापर करावा, जेणेकरून शेडमधील हवेची हालचाल वाढेल व आत असलेली अधिक उष्णता बाहेर टाकली जाईल. त्याचप्रमाणे शेडमध्ये तयार झालेली शिळी हवा बाहेर घालविण्यासाठी बाहेर हवा फेकणाऱ्या पंख्यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. उष्माघातावर मात करण्यासाठी आहारातील समतोल राखणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्यांच्या खाद्यांमध्ये अचानकपणे बदल करू नये. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना खात्रीशीर, स्वच्छ, थंड व मुबलक पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. याकरिता शेडमधील पिण्याच्या पाण्याची भांडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 35-50 टक्क्यांनी वाढवावी.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्यांच्या जास्त हालचालींमुळे त्यांच्या शारीरिक उष्णतेत वाढ होऊन, त्यांच्यावर उष्णतेचा ताण येऊ शकतो. हे टाळण्यासाठी कुक्कुटपालकाने व तेथील कामगाराने जास्त वेळा शेडमध्ये जाणे टाळावे. शेडमध्ये पक्ष्यांची अधिक गर्दी असेल, तर पक्ष्यांची घनता कमी करावी.
1) संपर्क - 02169 - 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
2) 022 - 24131180, 24137030, विस्तारित क्र. 136 (फक्त कार्यालयीन वेळेत.)
कुक्कुटपालन शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...